३३११

सांडी मांडी नको करूं । वाउगा भरूं श्रमाचा ॥१॥

जेथें तेथें धावें मन । करा खंडन तयाचें ॥२॥

नका घालुं गोंवागुंती । तेणें फजिती मागें पुढें ॥३॥

एका जनार्दनीं भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥

३३१२

देहीं शत्रु वसती दुर देशीं । येतां बहु दिवस लागती तयांसी ॥१॥

बाह्म शत्रुंचें अल्प दुःख । मनःशत्रुंचें वर्म अशेख ॥२॥

आसनीं शयनीं एकान्तीं । जपीं अथवा ध्यानस्थिती ॥३॥

ऐशिया पणाचे भुलले हावे । एका जनार्दनीं नेणती देवें ॥५॥

३३१३

मनें ब्रह्मादिकां केलीसे थोकडी । तेथें परवडी कोण मानवाची ॥१॥

इंद्रिय न चाले मनाविण देखा । मनाची मनरेखा नुल्लंघवे ॥२॥

शस्त्रें तें न सुटे जळ तें न बुडे । ऐसे ते पोवाडे मनें होतीं ॥३॥

एक जनार्दनीं मन तें स्वाधीन । करितां सर्व यज्ञ हातीं जोडे ॥४॥

३३१४

मना दुजीं बुद्धि नको बा ही । संतसमागमीं राही । यापरतें कांहीं । दुजें नको सर्वथा ॥१॥

मीपणाचा ठावो । टाकीं हा संदेहो । पडसी प्रवाहो । वाउगाची शिणसी ॥२॥

बहुत मतमतांतरे । कासया शिणसी रे आदरें । संतचरणीं झुरे । रात्रंदिवस मानसीं ॥३॥

कायिक वाचिक सर्वथा । भजे भजे पंढरीनाथा । एका जनार्दनीं तत्त्वतां । संतचरणीं लीन होय ॥४॥

३३१५

दुजियाची निंदा नको रे करूं मना । चिंती या चरण संताचिया ॥१॥

होउनी उदास गाई सदा नामक । बैसोनि निष्काम एकान्तासी ॥२॥

एकान्तीसी गोडी शंभु जाणे जोडी । आणिक परवडी न कळे कांहीं ॥३॥

एका जनार्दनीं रामनाम सार । करितां उच्चार आळस नको ॥४॥

३३१६

मना नको नको हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी येतां जातां ॥१॥

कल्पना सोडोनि संतासंगें राहें । सर्व सुख आहे त्यांचे पायीं ॥२॥

ज्याचिया दरुशनें शोक मोह जळे । पाप ताप पळे काळभय ॥३॥

जवळीच दिसे भावितां भावितां । एका जनार्दनीं ध्यातां सुख मोठें ॥४॥

३३१७

मना सांडीं विषयखोडी । लावीं विठ्ठलेशीं गोडी ॥१॥

आणिक न लगे साधन । एकलें मन करी उन्मन ॥२॥

विठ्ठल विठ्ठल सांवळा । पाहें पाहे उघडा डोळां ॥३॥

एका जनार्दनीं शराण । मनाचि होय विठ्ठल पुर्ण ॥४॥

३३१८

अरे अरे मना । कांहीं करी विचारणा ॥१॥

शरण विठोबासी जाई । मन राही भलते ठायीं ॥२॥

वाउगा तुंचि सोस । मना न करी सायास ॥३॥

येतो काकुळती । एका जनार्दनीं प्रीति ॥४॥

३३१९

न करीं तळतळ मना । चिंती चरणां विठोबाचें ॥१॥

राहे क्षणभरी निवांत । न करीं मात दुजीं कांहीं ॥२॥

संतचरण वंदी माथां । तेणें सर्वथा सार्थक ॥३॥

एका जनार्दनीं मात । मना ऐकें तूं निवांत ॥४॥

३३२०

आणिक साधनीं नको गुंतुं मना । धरी या चरणीं । विठोबाच्या ॥१॥

वाउगा बोभाट कासया खटपट । पंढरीची वाट सोपी बहु ॥२॥

एका जनार्दनीं कायावाचामनें । सतत राहणें संतापायीं ॥३॥

३३२१

आणिकांची आस नको करूं मना । चिंती तूं चरणा विठोबाच्या ॥१॥

वाचे नाम गाये वाचे नाम गाये । वाचे नाम गाये विठोबाचे ॥२॥

करकटीं उभा चंद्रभागें तटीं । पुंडलिकापाठीं धरूनी ध्यान ॥३॥

ठेविले चरण दोन्हीं विटेवरी । वाट पाहे हरी भाविकाची ॥४॥

एका जनार्दनीं उभारुनी बाह्मा । आलंगीत आहे भोळे भोळे ॥५॥

३३२२

अंतरींचा भाव दृढ धरी मना । सेवीं तूं चरणा विठोबाच्या ॥१॥

आणिक नको कष्ट कांहीं । राममुखीं गायी सदा नेमें ॥२॥

आकार निराकार सर्वही व्यापक । तो उभा सम्यकक समपदीं ॥३॥

एका जनार्दनीं वाहूनियां आण । विठ्ठलाचे चरण ध्यावे आधीं ॥४॥

३३२३

वाउगी उपाधी न करी रे मना । चिंती या चरणा राघवाच्या ॥१॥

अंतकाळीं सखा कोणी नाहीं दुजा । पुत्र पत्‍नी वोजा न ये कामा ॥२॥

चालतांचि देह म्हणती माझा माझा । अंतकाळ पैजा यम बांधी ॥३॥

एका जनार्दनीं सर्व हें मायिक । शाश्वत तें एकक श्रीरामनाम ॥४॥

३३२४

मना तूं एक माझी मात । श्रीविठ्ठली न धरी कां रें हेत ॥१॥

कांहीं पडतां जड भारी । वाचे म्हणे विठठल हरी ॥२॥

तुज ही खूण निर्वाणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥

३३२५

मना ऐक हे विनंती । तूं न करी दुजी खंती । विठ्ठलावांचुनी प्रीती । दुजी नको आणिक ॥१॥

वाउगा तूं न करी सोस । दृढ घालीं तूं कास । धरीं पां विश्वास । विठ्ठलचरणीं ॥२॥

सांडीं माझें आणि तुझें । वाउगें नको वाहुं वौझें । निपजती बीजें । संतचरणी सकळ ॥३॥

हेंचि साधनांचें सार । विठ्ठलमंत्र उच्चार । एका जनार्दनीं वेरझार । येणें तुटें समूळ ॥४॥

३३२६

मना निश्चय तूं करी । म्हणे जाईन पंढरी ॥१॥

नेमधर्मक हाचि माझा । पंढरीवांचूनि नाहीं दुजा ॥२॥

सर्व तीर्थाचें माहेर । विटे उभा कटीं कर ॥३॥

आवडीनें धरा भाव । एका जनार्दनीं भेटे देव ॥४॥

३३२७

भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल विटेवरी ॥१॥

मना जाय तेथें मना जाय तेथें । मना जाय तेथें पंढरीये ॥२॥

पुरतील काम निवारेल गुंती । आहे ती विश्रांति संतसंगें ॥३॥

आषाढी कार्तिकी सोहळा आनंद । मिळालासे वृंद वैष्णवांचा ॥४॥

एका जनार्दनीं आनंदी आनंद । तेणें परमानंद डुल्लतसे ॥५॥

३३२८

विठ्ठल पंढरपुर निवासी । विठ्ठल उभा भिवरेसी । विठ्ठल पुंडलिकापाशीं । भक्ति प्रेमेशीं तिष्ठत ॥१॥

जाई जाई मना तेथें । सुखें वैष्णव नाचती जेथें । ब्रह्मानंदपद दरुशनमात्रें । देत आहे भक्तांसी ॥२॥

सुलभ सुलभ मंत्रराज । शंभु जाणे निजबीज । एका जनार्दनीं गुज । सांगतसे भाविकां ॥३॥

३३२९

लाभें लाभ हातासी ये । हेचि गोय धरीं मना ॥१॥

वाउगा सोस नको वाहुं । सुखें गाऊं विठ्ठला ॥२॥

नको नको श्रम पसारा । सैरावैरा धांवुं नको ॥३॥

निवांत सेवों हरिकीर्तना । एका जनार्दनीं म्हणे मना ॥४॥

३३३०

निवांतपणें मना चित्तीं तूं चरण । आणिक कल्पना न करीं कांहीं ॥१॥

चिंतीं पां विठ्ठल कायावाचामनें । संसारबंधन तुटेल तेणें ॥२॥

संसाराची वार्ता नुरेचि पां कांही । आणिकक प्रवाहीं पडुं नको ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठलनामीं छंद । मना तूं गोविंद आठवीं कां रे ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel