३४१४.
हिरण्यकश्यपाचे पोटीं । भक्त जगजेठी प्रल्हाद ॥१॥

सदा वाचें नारायण । छंद आन नाहीं दुजा ॥२॥

एका जनार्दनीं पाहुनी पिता । क्रोधें तत्वतां बोलत ॥३॥

३४१५.

वायां जन्मलें हें पोर । सदा हरी उच्चार करितसे ॥१॥

न कळे आपुली पैं याती । येणें धरिली हरिभक्ति ॥२॥

एका जनार्दनीं निर्धार । याचा आमुचा वैराकार ॥३॥

३४१६.

करी विचार मानसीं । काय उपदेश पुत्रासी ॥१॥

नावडीचें राज्य धन । सदा पुत्रीं गुतलें मन ॥२॥

काय जन्मला पामर । एका जनार्दनीं भूमीभार ॥३॥

३४१७.

बोलावुनी एकांतासी । सांगे विद्याअभ्यासासी ॥१॥

सकळ विद्यांचें जीवन । मनीं धरी नारायण ॥२॥

एका जनार्दनी जाण । सदा घोकी नारायण ॥३॥

३४१८.

नारायणीं बैसला भाव । दुजा ठाव शून्य दिसे ॥१॥

काया वाचा आणि मन । गुंतला प्राण नारायणी ॥२॥

एका जनार्दनीं हेत । बैसला चित्तांत सर्वदा ॥३॥

३४१९.

पिता क्रोधें पुसे बाळा । काय शिकला तें सांगें ॥१॥

येरु म्हणे नारायण । काहीं यावांचून मी नेणें ॥२॥

एका जनार्दनीं ऎकतां मात । जाहला संतप्त मानसीं ॥३॥

३४२०.

ऎसा पुत्र असोनि काय । जो नारायणासी ध्याय ॥१॥

मुख्य आमुचा जो वैरी । त्यासी चिंती हा निर्धारीं ॥२॥

बाळ नोहे केवळ काळ । एका जनार्दनीं लडिवाळ ॥३॥

३४२१.

सांगे स्त्रियेसी एकांतीं । पुत्रें मांडिली भगवद्वक्ती ॥१॥

यासी आतां करावें काय । शिकविलें ऎको न जाय ॥२॥

एका जनार्दनीं मन । येणें धरिला नारायण ॥३॥

३४२२.

माता म्हणे प्रल्हादासी । वडिलें शिकविलें नायकशी ॥१॥

कांहीं नायकशी शिकविलें । विद्याभ्यास वहिलें ॥२॥

एका जनार्दनीं ऎकुनी मात । प्रत्युत्तर तया देत ॥३॥

३४२३.

सर्व विद्यांचा जो धनी । मोक्षदानीं चिंती तो ॥१॥

मज आणिकांचे नाहीं काम । माझा सखा पुरुषोत्तम ॥२॥

मायबाप सर्व गोत । एका जनार्दनीं भगवंत ॥३॥

३४२४.

ऎकोनियां पुत्राचें वचन । मातेनें वर्तमान कथियेलें ॥१॥

तेणें तया क्रोध भरलासे मनीं । दूतालागुनी तत्क्षणीं आज्ञा केली ॥२॥

एका जनार्दनीं करिती यातना । परी नारायणा आठवीत ॥३॥

३४२५.

नानापरी दूत मारिती निष्ठूर । शस्त्रांचें दुस्तर धाय हाणती ॥१॥

अग्नींत घालिती पाणीये बुडविती । ढकलोनियां देता पर्वतशिखरी ॥२॥

एका जनार्दनीं रक्षी नारायण । कोण करीं विघ्न तया भक्ता ॥३॥

३४२६.

विषाची पाजिती पुरीं ढकलिती । परि निर्भय तो चित्ती घेत नाम ॥१॥

संतप्त होउनी पुसताती बाळा । काय वेळोवेळां आठविसी ॥२॥

एका जनार्दनीं नाम जपे होटीं । मानीच चावटी बोल त्याचे ॥३॥

३४२७.

क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥

येरु म्हणे जळीं स्थळीं काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥

एका जनार्दनीं ऎकातांचि मात । मारितसे लाथ स्तंभावरी ॥३॥

३४२८.

दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥

धांवूनियां हरी आडवा तो घेतिला । ह्रुदयी विदारिला हस्तनखीं ॥२॥

एका जनार्दनीं भक्ताचे रक्षण । स्वयें नारायण करितसे ॥३॥

३४२९.

अवतार नरहरी । केली दैत्याची बोहरी ॥१॥

प्रल्हादासी आलिंगन । स्वयें देत नारायण ॥२॥

भक्तवचनाचें मान । एका जनार्दनीं सत्य जाण ॥३॥

३४३०.

स्तंभ फ़ोडीत कटकट । दाढा व्यंकट विकट । उध्दट वीर विकट । नरकेसरी ॥१॥

जिव्हा लळलळित लटलट । धुरधुरीत कंठ । श्वासें नासापुट उतट । पिंगट जटाजूट दाट ॥२॥

बाण सणसणाट । वज्र दणद्णाट । नखें तिखें तिकट बोट । रागें फ़ोडी पोट ॥३॥

हात तट सुभट भट । नेत्र गरगराट । चंद्र सूर्य गरगराट रे ॥४॥

शब्द कट कट । साधनीं कष्ट फ़ुकट । एका जनार्दनीं नामें वैकुंठपीठ रे ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel