संत मत्तय ह्याचे शुभवर्तमान

 —–मत्तय १—–

अब्राहामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या वंशावळीची नोंदः
अब्राहाम इसहाकाचा जनक, इसहाक याकोबाचा जनक आणि याकोब यहुदाचा व त्याच्या भावांचा जनक झाला.
यहुदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेस हेसरोनाचा जनक आणि हेसरोन आरामाचा जनक झाला.
आरामाला अम्मिनादाब झाला; अम्मिनादाब नहशोनाचा जनक झाला आणि नहशोन सलमोनाचा जनक झाला.
सलमोनाला रहाबेपासून बवाज झाला; बवाजाला रूथेपासून ओबेद झाला आणि ओबेद इशायाचा जनक झाला.
इशाय दावीद राजाचा जनक झाला; आणि दाविदाला जी पूर्वी उरियाची बायको होती तिच्यापासून शलमोन झाला.
शलमोन रहबामाचा जनक, रहबाम अबियाचा जनक आणि अबिया आसाचा जनक झाला.
आसाला यहोशाफाट झाला; यहोशाफाट हा योरामाचा जनक आणि योराम उज्जियाचा जनक झाला.
उज्जिया हा योथामाचा जनक झाला; योथाम आहाजाचा जनक आणि आहाज हिजकियाचा जनक झाला.
१०आणि हिजकिया मनश्शेचा जनक, मनश्शे आमोनाचा जनक आणि आमोन योशियाचा जनक झाला.
११आणि त्यांना बाबेलात नेले त्यावेळी, योशिया हा यखन्याचा व त्याच्या भावांचा जनक झाला.
१२आणि त्यांना बाबेलास आणल्यावर यखन्याला शलतिएल झाला आणि शलतिएलाला जरुब्बाबेल झाला.
१३आणि जरुब्बाबेल अबिहुदाचा जनक झाला; अबिहूद हा एल्याकिमाचा जनक आणि एल्याकीम हा अज्जुराचा जनक झाला.
१४आणि अज्जुर हा सादोकाचा जनक झाला; सादोक हा याखिमाचा जनक आणि याखीम हा एलिहुदाचा जनक झाला.
१५एलिहूद एलाजराचा जनक, एलाजर मत्तानाचा जनक आणि मत्तान याकोबाचा जनक झाला.
१६आणि याकोब योसेफाचा जनक झाला. जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला त्या मरियेचा हा पती.
१७अशा प्रकारे सर्व पिढ्याः अब्राहामापासून दाविदापर्यंत चौदा पिढ्या, दाविदापासून बाबेलात नेईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलात नेल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.

१८आता, येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झालाः त्याची आई मरिया ही योसेफाला वाग्दत्त झाली होती तेव्हा, दोघे एकत्र येण्याअगोदर, ती पवित्र आत्म्याकडून गरोदर असल्याचे दिसून आले; १९तेव्हा तिचा पती योसेफ हा नीतिमान मनुष्य असल्यामुळे त्याला तिचा लोकांत अपमान करणे बरे वाटले नाही, आणि त्याने तिला गुप्तपणे सोडण्याचा विचार केला. २०आणि तो ह्या गोष्टीवर विचार करीत असता, बघा, परमेश्वराचा दूत त्याला स्वप्नात प्रगट झाला आणि त्याला म्हणाला,
दावीदपुत्र योसेफा, तू आपली पत्नी मरिया हिला आपल्याकडे आणायला भिऊ नको, कारण तिच्या पोटी जो गर्भ राहिला आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. २१तिला पुत्र होईल, आणि तू त्याचे येशू हे नाव ठेव. कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील.
२२हे सर्व ह्यासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याकडून जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने असे म्हटले आहे की,
    २३बघा, कुमारी गर्भवती होईल,
    तिला पुत्र होईल,
    आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.
ह्याचा अर्थ आमच्याबरोबर देव असा आहे.
२४मग योसेफ झोपेतून उठल्यावर त्याने  परमेश्वराच्या दूताने त्याला सांगितल्याप्रमाणे केले आणि आपल्या पत्नीला आपल्याकडे आणले २५आणि ती आपल्या पुत्राला जन्म देईपर्यंत त्याचा तिच्याशी संबंध नव्हता. आणि त्याने त्याचे येशू हे नाव ठेवले.

—–मत्तय २—–

आता, हेरोद राजाच्या दिवसांत, यहुदियातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर, बघा, पूर्वेकडून यरुशलेमला मागी लोक आले; आणि ते विचारू लागले,
यहुद्यांचे राजे जन्मले आहेत ते कुठं आहेत? कारण आम्ही पूर्वेस त्यांचा तारा बघितला आणि आम्ही त्यांना नमन करायला आलोत.
हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला; आणि त्याच्याबरोबर सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले. मग त्याने लोकांच्या वरिष्ठ याजकांना व शास्त्र्यांना एकत्र जमवून विचारले,
ख्रिस्त कुठं जन्मला पाहिजे?”
आणि ते त्याला म्हणाले,
यहुदियातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्यानं असं लिहिलं आहे, आणि तू बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सरदारांत मुळीच कनिष्ठ नाहीस, कारण तुझ्यामधून एक अधिपती येईल, आणि तो माझ्या राष्ट्राचा, इस्राएलाचा मेंढपाळ होईल.
मग हेरोदाने त्या मागी लोकांना एकान्ती बोलवून, तो तारा दिसल्याचा काळ त्यांच्याकडून काळजीपूर्वक विचारून घेतला व त्याने त्यांना बेथलेहेमला धाडले व म्हटले,
जा आणि मुलाचा नीट शोध करा आणि तुम्हाला शोध लागल्यावर मला निरोप द्या, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.
राजाचे ऐकल्यावर ते निघाले, आणि बघा, त्यांनी पूर्वेस बघितलेला तारा, मूल होते तेथे येऊन, वर थांबेपर्यंत त्यांच्या पुढे जात राहिला. १०आणि त्यांनी तो तारा बघितला तेव्हा त्यांना फार मोठा आनंद होऊन ते आनंदित झाले.
११आणि ते घरात आले, आणि त्यांनी मुलाला त्याच्या आईजवळ म्हणजे मरियेजवळ बघितले, तेव्हा ते पालथे पडले व त्यांनी त्याला नमन केले. आणि आपल्या थैल्या उघडून त्यांनी त्याला सोने, ऊद व बोळ ह्या देणग्या अर्पण केल्या. १२आणि त्यांनी हेरोदाकडे परत जाऊ नये म्हणून त्यांना स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्‍या मार्गाने आपल्या देशाकडे गेले.

१३आणि ते गेल्यानंतर, बघा, परमेश्वराचा दूत योसेफाला स्वप्नात प्रगट झाला व त्याला म्हणाला,
ऊठ, मुलाला आणि त्याच्या आईला बरोबर घेऊन मिसरात पळून जा, आणि मी तुला सांगेन तोपर्यंत तिथं रहा; कारण ह्याला नष्ट करायला हेरोद ह्या मुलाचा शोध करील.
१४तो उठल्यावर, त्याने रात्री, मुलाला आणि त्याच्या आईला बरोबर घेतले आणि तो मिसरात गेला. १५आणि हेरोदाच्या मृत्यूपर्यंत तो तेथे राहिला; म्हणजे, प्रभूने संदेष्ट्याकडून जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने असे म्हटले आहे की,
मी माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले आहे.
१६मग, मागी लोकांनी आपल्याला चिडवले हे हेरोदाने बघितले तेव्हा तो फार संतापला, आणि त्याने मागी लोकांकडून काळजीपूर्वक विचारून घेतलेल्या काळाप्रमाणे बेथलेहेमात व त्याच्या सभोवतालच्या सर्व प्रांतात माणसे पाठवून दोन वर्षे व खालील वयाच्या सगळ्या मुलांना ठार मारले. १७तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले; त्याने असे म्हटले आहे की,
    १८रामात रडण्याचा आणि मोठ्या आक्रोशाचा
आवाज ऐकू आला;
    राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे
    आणि सांत्वन करून घेऊ इच्छीत नाही
    कारण ती नाहीत.
१९पण हेरोद मेल्यानंतर, बघा, परमेश्वराचा दूत मिसरात योसेफाला स्वप्नात प्रगट झाला २०व त्याला म्हणाला,
ऊठ, आणि मुलाला आणि त्याच्या आईला बरोबर घेऊन इस्राएलाच्या देशात जा; कारण मुलाचा जीव घेऊ पाहणारे मेले आहेत.
२१तेव्हा तो उठला, त्याने मुलाला व त्याच्या आईला बरोबर घेतले व तो इस्राएलाच्या देशात आला. २२पण जेव्हा त्याने ऐकले की, यहुदियात अर्खेलाव हा त्याचा बाप हेरोद ह्याच्या जागी राज्य करीत आहे, तेव्हा तो तिकडे जायला भ्याला; पण स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे तो गालिलाच्या भागात गेला; २३आणि नासरेथ नावाच्या गावी येऊन राहिला. म्हणजे त्याला नासोरी म्हणतील हे संदेष्ट्यांकडून सांगितले होते ते पूर्ण व्हावे. 

—–मत्तय ३—–

त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान हा यहुदियाच्या रानात घोषणा करीत येतो, आणि म्हणतो, पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.
कारण,
   रानात ओरडणार्‍याचा आवाजः
    प्रभूचा मार्ग तयार करा,
    त्याच्या वाटा नीट करा,
असे म्हणून ज्याच्याविषयी यशया संदेष्ट्याकडून सांगितले होते तो हा होय.
हा योहान उंटाच्या केसांचा झगा वापरी व त्याच्या कमरेभोवती कातड्याचा कमरबंद असे; आणि टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. तेव्हा यरुशलेम आणि सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा सर्व प्रांत त्याच्याकडे आला व त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
पण जेव्हा त्याने परोश्यांपैकी व सदोक्यांपैकी पुष्कळ जणांना त्याच्या बाप्तिस्म्यासाठी येताना बघितले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
अहो तुम्ही सर्पिणीच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळायला कोणी तुम्हाला सावध केलं? तर पश्चात्तापाला शोभतील अशी फळं द्या आणि अब्राहाम आमचा पिता आहे असं आपल्या मनात म्हणायचा विचार करू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, देव ह्या दगडांमधून अब्राहामाची मुलं उठवायला समर्थ आहे.
१०आणि आताच झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; म्हणून जे चांगलं फळ देत नाही असं प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकलं जाईल.
११मी तर, पश्चात्तापासाठी, तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं करतो; पण माझ्या मागून जो येणार आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे; मी त्याच्या वहाणा उचलायला लायक नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं आणि अग्नीनं करील. १२त्याच्या हातात त्याचं सूप आहे; तो आपलं खळं नीट स्वच्छ करील, आणि आपले गहू कोठारात साठवील पण भूस तो न विझणार्‍या अग्नीत टाकील.

१३मग येशू योहानाकडून बाप्तिस्मा घ्यायला गालिलातून यार्देनेकडे येतो. १४पण त्याने त्याला अडवल्यावर म्हटले,
मलाच तुझ्याकडून बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे; आणि तूच माझ्याकडे येतोस?”
१५पण येशूने उत्तर देऊन त्याला म्हटले,
आता येऊ दे; कारण, आपण असं सर्व न्यायीपण पूर्ण करावं हे उचित आहे.
मग त्याने त्याला येऊ दिले. १६आणि येशूचा बाप्तिस्मा होताच तो सरळ पाण्यातून वर आला; आणि बघा, आकाश उघडले आणि त्याने बघितले की, देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरत त्याच्यावर येत होता. १७आणि, बघा, आकाशातून एक वाणी म्हणाली,
हा माझा प्रिय पुत्र आहे,
ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.

—–मत्तय ४—–

त्यानंतर सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. आणि त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केल्यावर, त्याला त्यानंतर भूक लागली. आणि परीक्षक येऊन त्याला म्हणाला,
तू जर देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडाच्या भाकरी व्हाव्यात म्हणून आज्ञा कर.
पण त्याने उत्तर देऊन म्हटले,
“ ‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, पण देवाच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक शब्दाने वाचेल असं लिहिलं आहे.
तेव्हा सैतान त्याला पवित्र नगरात नेतो; मग त्याने त्याला मंदिराच्या एका वरच्या टोकावर उभे केले, आणि तो त्याला म्हणतो,
तू जर देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक; कारण असं लिहिलं आहे की, मी तुझ्याविषयी आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईन आणि तू आपला पाय दगडावर आदळू नयेस म्हणून ते तुला आपल्या हातांवर घेतील.
येशू त्याला म्हणाला,
पुन्हा असं लिहिलं आहे की, तू आपला देव परमेश्वर ह्याची परीक्षा करू नकोस.
पुन्हा सैतान त्याला एका फार उंच डोंगरावर नेतो, आणि, त्याला जगातली सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवतो; आणि त्याला म्हणतो,
तू जर पालथा पडून मला नमन करशील तर मी तुला हे सर्व देईन.
१०तेव्हा येशू त्याला म्हणाला,
अरे सैताना, इथून नीघ, कारण असं लिहिलं आहे की, तू आपला देव परमेश्वर ह्याला नमन कर आणि केवळ त्याचीच उपासना कर.
११मग सैतान त्याला सोडतो; तेव्हा बघा, देवदूत आले व त्याची सेवा करू लागले.

१२आणि योहान अटकेत ठेवला गेला आहे हे त्याने ऐकले तेव्हा तो गालिलात गेला.
१३मग त्याने नासरेथ सोडले, आणि, तो जबलून व नफताली ह्यांच्या हद्दीतल्या समुद्रकाठावरील कपर्णहूमला येऊन राहिला. १४म्हणजे यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; त्याने असे म्हटले आहे की,
    १५जबलून प्रांत आणि नफताली प्रांत,
यार्देनेच्या पलीकडील
समुद्रकाठचा परजनांचा गालील -
    १६जे लोक अंधारात बसले होते त्यांनी
मोठा प्रकाश बघितला,
    आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसले होते त्यांच्यावर प्रकाश उदय पावला आहे.
१७येशू तेव्हापासून घोषणा करून सांगू लागला,
पश्चात्ताप करा; कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.

१८आणि येशू गालील समुद्राच्या किनार्‍यावरून चालला असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना बघितले; कारण ते कोळी होते. १९तेव्हा तो त्यांना म्हणतो,
तुम्ही माझ्यामागं या आणि मी तुम्हाला माणसं धरणारे कोळी करीन.
२०तेव्हा, लगेच, त्यांनी आपली जाळी ठेवली आणि ते त्याच्यामागे गेले. २१तो तेथून पुढे गेल्यावर त्याने जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान ह्या दुसर्‍या दोन भावांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर मचव्यात आपली जाळी नीट करताना बघितले आणि त्याने त्यांना बोलावले. २२तेव्हा, लगेच, त्यांनी मचवा सोडला व आपल्या बापाला सोडले आणि ते त्याच्यामागे गेले.

२३आणि येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांत सर्व प्रकारचे आजार व सर्व प्रकारचे रोग बरे करीत सर्व गावोगाव फिरला.
२४तेव्हा सूरियात त्याची कीर्ती पसरली, आणि ते सर्व आजार्‍यांना, नाना रोगांनी व यातनांनी पछाडलेल्यांना, तसेच भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती मनुष्यांना त्याच्याकडे घेऊन आले; आणि त्याने त्यांना बरे केले. २५आणि गालील, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया व यार्देनपार येथील लोकांचे मोठाले घोळके त्याच्या मागोमाग जात राहिले.

—–मत्तय ५—–

आणि त्याने लोकांचे घोळके बघितले तेव्हा तो एका डोंगरावर गेला; आणि तो खाली बसला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले; मग त्याने आपले तोंड उघडून त्यांना शिकवले आणि म्हटले,
जे आत्म्यानं दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.
जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल.
जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल.
जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया केली जाईल.
जे अंतःकरणानं शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र म्हटलं जाईल.
१०नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.
११जेव्हा माझ्याकरता लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, आणि, प्रत्येक प्रकारची वाईट गोष्ट तुमच्याविरुद्ध खोटी सांगतील तेव्हा तुम्ही धन्य; १२आनंद करा आणि हर्षित व्हा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे; कारण तुमच्या आधी जे संदेष्टे झाले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
१३तुम्ही पृथ्वीचं मीठ आहा; पण मीठ जर निचव झालं तर त्याला कशानं खारट करणार? मग ते बाहेर फेकलं जावं आणि लोकांच्या पायी तुडवलं जावं ह्याशिवाय ते उपयोगी नाही.
१४तुम्ही जगाचा प्रकाश आहा. डोंगरावर वसलेलं नगर लपत नाही. १५किंवा कोणी दिवा पेटवून तो मापाखाली ठेवीत नाहीत, पण दिवठणीवर ठेवतात; आणि तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. १६तुमचा प्रकाश लोकांपुढं असा प्रकाशित होऊ द्या की, त्यांनी तुमची चांगली कामं बघून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावं.
१७मी नियमशास्त्र किवा संदेष्टे नष्ट करायला आलो असं समजू नका; मी नष्ट करायला आलो नाही, पण मी पूर्ण करायला आलो. १८कारण, मी तुम्हाला सत्य सांगतो, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातला एक बिंदू किवा फाटा पण नाहीसा होणार नाही. १९म्हणून जो कोणी ह्या लहान आज्ञांतली एखादी मोडील, आणि लोकांना तसं शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात लहान म्हटलं जाईल, पण जो त्या आचरील आणि शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठं म्हटलं जाईल. २०कारण, मी तुम्हाला सांगतो, शास्त्र्यांपेक्षा आणि परोश्यांपेक्षा तुमचं नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्ही येणार नाही.
२१तुम्ही ऐकलं आहे की, प्राचीन पिढ्यांना हे सांगितलं होतं, खून करू नको; आणि जो कोणी खून करील तो न्यायाच्या शिक्षेस पात्र होईल. २२पण मी तुम्हाला सांगतो की, जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्यायाच्या शिक्षेस पात्र होईल, जो आपल्या भावाला राका म्हणेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. पण जो अरे मूर्खा म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. २३म्हणून जर तू वेदीपुढं आपलं अर्पण घेऊन आलास आणि तुला तिथं आठवलं की, तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे २४तर तुझं अर्पण तिथंच वेदीसमोर सोडून जा, आपल्या भावाशी आधी समेट कर, आणि मग ये आणि आपलं अर्पण सादर कर. २५तुझा वादी तुझ्याबरोबर वाटेवर असतेवेळीच लवकर त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर वादी तुला कदाचित्  न्यायाधिशाच्या हाती देईल, न्यायाधीश कामदारांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात टाकला जाशील. २६मी तुला सत्य सांगतो, तू शेवटची दमडी फेडल्याशिवाय तिथून बाहेर येणार नाहीस.
२७तुम्ही ऐकलं आहे की, हे सांगितलं होतं, व्यभिचार करू नको. २८पण मी तुम्हाला सांगतो की, जो एखाद्या स्त्रीकडे तिची वासना धरून पाहील त्यानं आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे. २९आणि तुझा उजवा डोळा जर तुला अडथळा करीत असेल तर तो उपटून काढ आणि आपल्याजवळून फेकून दे. कारण तुझा एक अवयव नष्ट व्हावा, आणि तुझं संपूर्ण शरीर नरकात टाकलं जाऊ नये हे तुझ्या हिताचं आहे. ३०आणि तुझा उजवा हात जर तुला अडथळा करीत असेल तर तो कापून टाक आणि आपल्याजवळून फेकून दे, कारण तुझा एक अवयव नष्ट व्हावा, आणि तुझं संपूर्ण शरीर नरकात टाकलं जाऊ नये हे तुझ्या हिताचं आहे.  
३१आणि हेही सांगितलं होतं, जो आपल्या बायकोला सोडील त्यानं तिला सोडचिठ्ठी द्यावी. ३२पण मी तुम्हाला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय सोडतो तो तिला व्यभिचारिणी करतो, आणि तिला सोडल्यावर जो तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.
३३पुन्हा, तुम्ही ऐकलं आहे की, प्राचीन पिढ्यांना हे सांगितलं होतं, खोटी साक्ष देऊ नको, पण तू आपल्या शपथांची परमेश्वराला फेड कर. ३४पण मी तुम्हाला सांगतो की, शपथ मुळीच घेऊ नको; आकाशाची नको कारण ते देवाचं आसन आहे, ३५पृथ्वीची नको, कारण ते त्याचं पदासन आहे, यरुशलेमची नको, कारण ते त्या महान राजाचं नगर आहे.  ३६किंवा आपल्या मस्तकाचीही शपथ घेऊ नको, कारण तू एक केसदेखील पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. ३७पण तुमचं बोलणं हो तर हो, आणि नाही तर नाही, असं असावं; ह्याशिवाय जे अधिक आहे ते वाइटापासून येणार आहे.
३८तुम्ही ऐकलं आहे की, हे सांगितलं होतं, डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात. ३९पण मी तुम्हाला सांगतो, वाइटाविरुद्ध उलटू नका, पण जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारील त्याच्याकडे तू दुसराही वळव. ४०आणि कोणी तुझ्यावर फिर्याद करून जर तुझी बंडी घेईल तर त्याला अंगरखापण घेऊ दे. ४१आणि जो तुला मैलभर जायला वेठीस धरील त्याच्याबरोबर तू दोन मैल जा. ४२जो तुझ्याजवळ मागतो त्याला दे; आणि ज्याला उसनं घ्यायला पाहिजे त्याच्यापुढून मागं फिरू नको.
४३तुम्ही ऐकलं आहे की, हे सांगितलं होतं, तू आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर आणि आपल्या वैर्‍याचा द्वेष कर. ४४पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा; ४५ह्यासाठी की, तुम्ही आपल्या पित्याचे पुत्र व्हावं, कारण तो वाइटांवर आणि चांगल्यांवरही आपला सूर्य उदयास आणतो, तसाच तो नीतिमानांवर आणि अनीतिमानांवरही पाऊस पाडतो. ४६कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केलीत तर तुमचं प्रतिफळ काय? जकातदार तेच करतात ना? ४७आणि तुम्ही केवळ आपल्या बांधवांना सलाम करता तर इतरांपेक्षा अधिक काय करता? जकातदार तेच करतात ना? ४८म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel