ऋषींना किती ज्ञान असते, त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी श्रीकृष्णपुत्र सांब यास स्त्रीवेश देऊन, पोट वाढवून गरोदर स्त्रीचे सोंग दिले व ऋषींपुढे उभे करून या ’स्त्रीला मुलगा होणार की मुलगी?’ असे विचारले. यादव आपली कुचेष्टा करीत आहेत, हे ओळखून ऋषींनी रागावून शाप दिला, की ’याच्या पोटातून जे निघेल, त्यानेच यादवकुळाचा नाश होईल.’
हे ऐकताच यादव भयभीत झाले. त्यांनी सांबाचे पोट सोडले, तर त्यातून मुसळ बाहेर पडले. यादवांनी त्याचे बारीक तुकडे करून समुद्रात फेकले. ते तुकडे एका माशाने गिळले आणि तो मासा लुब्धेक नावाच्या एका कोळ्याला सापडला. त्याने मासा चिरल्यावर त्यातून मुसळाचे तुकडे व मुसळाला खाली बसवलेले लोखंड बाहेर आले. लुब्धकाने लाकडाचे तुकडे समुद्रकिनारी नेऊन फेकले, तर त्या लोखंडापासून बाणाचे टोक तयार केले. इकडे त्या लाकडी तुकड्यांना अंकुर फुटून ते वाढतच गेले व तेथे पाणकणसांचे मोठे वन तयार झाले.
आपला अवतारसमाप्तीचा काळ जवळ आला, हे जाणून श्रीकृष्णाने सर्व यादवांना द्वारका सोडून प्रभास येथे जाण्यास सांगितले. त्यांनी तसे केल्यावर या पवित्र द्वारकेत कुणा पाप्यांनी येऊन राहू नये म्हणून श्रीकृष्णांनी द्वारका समुद्रात बुडवून टाकली व स्वतःही प्रभास येथे आले. एकदा सर्व यादव जलक्रीडा करण्यासाठी समुद्रावर आले असता, मुसळापासून उगवलेली पाणकणसे एकमेकांवर फेकून मारू लागले; पण त्या आघाताने सर्व यादव मृत झाले.
हा अनर्थ पाहून श्रीकृष्ण एका पिंपळवृक्षाखाली शोक करीत बसले होते. दुरून एका शिकार्‍याला श्रीकृष्णाचा पाय दिसला. त्याला हरणाचे डोळे चमकत आहेत असे वाटून त्या मुसळाच्या लोखंडापासून बनविलेल्या टोकाचा बाण त्याने श्रीकृष्णाच्या पायावर सोडला. त्या बाणाने श्रीकृष्ण घायाळ झाला. पूर्वीच बोलावल्याप्रमाणे अर्जुन त्याला भेटायला गेला. त्याने बाणाने गंगोदक वर काढून श्रीकृष्णास पाजले व लगेच श्रीकृष्णाने देह ठेवला.

अशा प्रकारे ऋषींच्या शापानुसार मुसळाने यादव कुलाचा नाश केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel