याज्ञवल्क्यमुनींचा संसार सुखात चालला होता. त्यांना दोन बायका होत्या. थोरली मैत्रेयी अन्‌ धाकटी कात्यायनी. दोघींबरोबर संसार करुनही तो त्यांच्या परमार्थांच्या आड कधी आला नाही. संसाराच्या शीतल छायेतही त्यांची परमार्थाची उग्र तपश्‍चर्या चालू होती. विषयोपभोगाची सीमा कोठे संपते आणि त्याच्या मर्यादेची सरहद्द कोठे लागते याची त्यांनी कल्पना होती. ते विरागी होते; पण संसाराला विटलेले नव्हते. संसारात असूनही ते त्यापासून अलिप्‍त होते. कमळ पाण्यात असतं पण तरीही ते अलिप्‍त असतं ना, त्याप्रमाणे ! त्यामुळेच त्यांच्या संसाराला संतोषाची झालर होती. आनंदाची आणि तृप्‍तीची किनार होती.
संसारसुखाचा आस्वाद घेता घेता अनेक वर्षे उलटली. याज्ञवल्क्य मुनींना वार्धक्याची चाहूल लागली. त्यांनी ओळखलं, आता संन्यास घेऊन परमपद प्राप्‍त करुन घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी संसारातले लक्ष आणखी कमी केले. ईशचिंतनातच ते जास्त रमू लागले. ही गोष्‍ट कात्यायनीच्या लक्षात आली. एके दिवशी तिने विचारले,"नाथ, अलीकडे आपण पूर्वीसारखे संसारात रमत नाही. अति अलिप्‍त असल्यासारखे वाटता."
"तू म्हणतेस ते खरं आहे. आता वार्धक्य आलं. संन्यास घ्यावा असं माझ्या मनात येतं आहे."
"संन्यास !"
"त्यात एवढं आश्‍चर्य वाटण्यासारखं काय आहे, कात्यायनी ? आपल्या धर्मशास्त्राप्रमाणेच मी आचरण करीत आहे."
"स्वामी, मला धर्मशास्त्र काय कळणार ! मी आपली साधी संसारी स्‍त्री. आपल्या सहवासाचं भाग्य लाभलं. जीवन धन्य झालं. आपली संगतसोबत कायम लाभावी अशी इच्छा आहे. याच पर्णकुटीत आपल्या सान्निध्यात हे डोळे मिटावेत, असं वाटतं."
एवढयात मैत्रेयी आली. कात्यायनी बोलायची थांबली. तिने विचारले, "अगं, कात्यायनी, बोलायची अशी थांबलीस का ? बोल ना. मी का कुणी परकी आहे का ? नाथ, काय म्हणतेय ही ?"
"ही काहीच म्हणत नाही. म्हणतोय ते मी."
"काय ? मलाही सांगावं."
"बरं झालं तू आलीस. तुझ्याशीही बोलायचंच होतं. तुझीही अनुमती घ्यायची होती."
"कशासाठी ?"
"मी संन्यास घ्यायचं म्हणतो आहे."
"स्वामींचा विचार योग्यच आहे. त्याला माझी अनुमती कशाला ?"
"अगं, मैत्रेयी ! नाथ आपल्याला सोडून जाणार..संन्यास घेणार. तुला काहीच वाटत नाही त्याबद्दल ?" सद्‌गदित स्वरानं कात्यायनीने विचारलं. "म्हणून हिची अनुमती नाही." याज्ञवल्क्यांनी सांगितलं.
"तसं नाही हं ! आपल्या कोणत्याही गोष्‍टीला मी आजपर्यंत विरोध केला आहे का ? पण याबाबतीत मला जे वाटलं ते मी सांगितलं. याचा अर्थ..."
"मी तुझ्याजवळ कायम राहावं असं तुला मनापासून वाटतं. हो ना ?"
"हं--"
ते ऐकून मैत्रेयी खळखळून हसली आणि कात्यायनी मात्र गोंधळली. आपलं काय चुकलं हेच तिला कळेना. मग मैत्रेयीने तिला अनेक गोष्‍टी सांगितल्या. त्यावर ती म्हणाली,"पण मी त्यांना विरोध थोडाच केला होता ?"
"दोघींची अनुमती आहे असं मी मानू ना ?"
दोघींनीही होकार दिल्यावर याज्ञवल्क्य पुढे म्हणाले, "तर मग आणखी एक गोष्‍ट केली पाहिजे. माझ्यापाशी जी धनदौलत आहे, ती तुम्हा दोघींना वाटून देतो. म्हणजे मी गेल्यानंतर तुमच्यात त्यावरुन वादविवाद होणार नाहीत. तुम्ही गोडीगुलाबीने राहू शकाल."
"नाथ--" मैत्रेयीने हाक मारली.
"बोल, तुला काही सांगायचं आहे ?"
"आपण संपत्तीची वाटणी करणार हे योग्य आहे; पण मला एक प्रश्‍न पडला आहे."
"प्रश्‍न ? त्यात प्रश्‍न पडण्यासारखं काय आहे ?"
"नाथ, आपण ही संपत्ती आमच्या स्वाधीन कशासाठी करीत आहात ?"
"मी गेल्यावर तुम्हाला उत्तम तर्‍हेने आयुष्य घालविता आलं पाहिजे. संपत्तीशिवाय संसार सुखाचा कसा होईल ? मैत्रेयी, या संसारात राहायचं म्हणजे धन पाहिजे. ते नसेल तर, दारिद्रयापेक्षा मरण बरं असं वाटायला लागतं. तुमचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानात जावं अशी माझी इच्छा आहे. यासाठी मी ही संपत्ती तुमच्या स्वाधीन करतो आहे."
"तुमचं म्हणणं अयोग्य आहे असं मी कसं म्हणू ? पण नाथ, मला एक सांगा, संपत्ती मिळाली तरी खरं सुख मिळेल का ?"
"मैत्रेयी !" मैत्रेयीचा सूचक प्रश्‍न ऐकून याज्ञवल्क्यांच्या तोंडून आश्‍चर्याने शब्द गेले. ती पुढे म्हणाली,
"नाथ, आपण आपल्याजवळचीच काय पण सार्‍या पृथ्वीवरील संपत्तीही आम्हाला देऊ शकाल. आपला तो अधिकार आहे. सामर्थ्यही आहे. पण नाथ ! धन-धान्यांनी सुशोभित, परिपूर्ण असणारी ही सारी वसुंधरा जरी मला प्राप्‍त झाली, तरी त्यामुळे मी अमर होऊ शकेन का ? मला अमरत्व मिळेल का ?"
मैत्रेयीचा तो प्रश्‍न ऐकून याज्ञवल्क्यांचे हृदय आनंदाने उचंबळून आले. पत्‍नीचा अधिकार त्यांना माहीत होता. प्रसन्नतेने ते म्हणाले, "धन्य मैत्रेयी, धन्य आहे तुझी ! तुझ्याकडून मी अशाच प्रश्‍नांची अपेक्षा करीत होतो. तुझी ज्ञानजिज्ञासा, जीवनसाफल्याची असणारी ओढ पाहून मला आनंद होतो. तुझा अभिमान वाटतो."
"नाथ...उगीच स्तुती पुरे हं ! स्तुती करता करता माझा प्रश्‍न मात्र विसरुन जाल."
"विसरेन कसा ? मैत्रेयी, तू म्हणतेस ते खरे आहे. द्रव्याने खरे सुख, खरा आनंद--ज्याला आत्मानंद म्हणतात तो--तुला मिळणार नाही. श्रीमंतांच्यासारखे तुझे जीवन विलासी होईल, परंतु अमृतत्व देण्याचं सामर्थ्य द्रव्यात मुळीच नाही."
"जर द्रव्याने अमृतत्व मिळत नसेल, तर ते घेऊन मी काय करु ? नाथ, अशा द्रव्याचा मला काय उपयोग आहे ? जर द्रव्याने हे सारं मिळत असतं तर आपण त्याचा त्याग का केला असता ? आपल्याला अशी वस्तू, असं ज्ञान माहीत आहे की, ज्याच्यापुढे ही धनदौलत, हे संसारसुख तुच्छ आहे. मला ही चंचल संपत्ती नको. मला शाश्‍वत अखंड राहणारी, जी दुसर्‍यांना दिली तर कमी न होता वाढतच राहते अशी संपत्ती द्या. ते वैभव तुमच्याजवळ आहे. त्यामुळेच मोठमोठे राजेरजवाडे, श्रीमंत आणि ऋषिमुनीही आपल्याला ’खरे संपत्तिवान’ म्हणून मान देतात. म्हणून नाथ, मला तुमच्या जवळ असणार्‍या, अमृतत्व मिळवून देणार्‍या संपत्तीचा लाभ करवून द्यावा. ते ज्ञान मला द्या."
"वाहवा !! मैत्रेयी, तू खरंच अति प्रिय असं भाषण केलंस. बस इथं. तुला अमृतत्व कसं मिळेल याचं ज्ञान सांगतो. नीट लक्षपूर्वक ऐक. त्याच्यावर विचार कर, आणि तसं आचरण कर."
असे सांगून याज्ञवल्क्याने मैत्रेयीला उपदेश करायला सुरुवात केली - "मैत्रेयी ! पती आपल्या पत्‍नीवर किंवा पत्‍नी आपल्या पतीवर प्रेम का करतात याचा कधी तू बारकाईने विचार केला आहेस का ? पत्‍नीला पती प्रिय असतो तो, तो पती आहे म्हणून नव्हे; तर तो आपल्याला आनंद देतो, आपल्याला सुख देतो म्हणून प्रिय असतो. तीच गोष्‍ट पत्‍नीची ! पती तिच्यावर प्रेम करतो ते त्याला, त्याच्या आत्म्याला सुख मिळत असते म्हणून ! आई आपल्या कमी गुणवान वा कमी रुपवान मुलावरही प्रेम करते. मैत्रेयी, बारकाईने विचार केलास तर तुला कळून येईल की, त्या प्रेमाचं मूळ त्या मुलात नसून, आईच्या त्याच्याविषयीच्या ’माझे’ या भावनेत असते. सर्व प्रकारच्याच प्रेमाला हा नियम लागू आहे. मग ते प्रेम बहीण-भावांचे असो, धनावरील प्रेम असो, नाहीतर आणखी कोणावरील असो. जगातील ज्या वस्तूबद्दल वा व्यक्‍तीबद्दल आपल्याला आपलेपणा वाटतो, त्या वस्तूवर वा व्यक्‍तीवर आपण प्रेम करतो. जेथे आपलेपणाची भावना आहे तेथेच प्रेम असते. काही लोकांचे केवळ स्वतःवरच प्रेम असते, कारण त्याला वाटतं, हे सारं जग केवळ माझ्याच सुखासाठी निर्माण झालेले आहे. काही लोकांचे प्रेम फक्‍त आपल्या कुटुंबावर असते; तर काहींचे आपल्या ज्ञातीवर ! काही लोक आपल्या देशावर मनापासून प्रेम करतात तर काही काही महात्मे असे असतात की, त्यांचे प्रेम सार्‍या विश्‍वावर असते. त्यांचे मन विशाल झालेले असते. पूर्ण विकसित झालेले असते, ’वसुधैव कुटुंबकम्‌ अशी त्यांची वृत्ती झालेली असते.
मैत्रेयी ! आता तूच सांग मूळची प्रेमभावना ही एकच असली तरी प्रत्येकाच्या प्रेमाप्रेमात असा फरक का पडतो ? काही जण अगदी संकुचित स्वरुपाच्म प्रेम करतात तर काहींच्या प्रेमाला आकाशाएवढी व्यापकता का आलेली असते ?"
याज्ञवल्क्यांचा तो रसाळ वाक्‌प्रवाह चालू होता. मैत्रेयी एकरुप होऊन शब्द न शब्द आपल्या हृदयाच्या अंतरहृदयात साठवत होती. मध्येच विचारलेल्या प्रश्‍नावर ती म्हणाली, "नाथ, आपणच आपल्या अधिकारवाणीने, अमृतवाणीने कथन करावे. आपले शब्द मी अंतःकरणात जपून ठेवीत आहे." त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,"मैत्रेयी, प्रेमाप्रेमात हा जो फरक पडतो त्याचं कारण उघड आहे. ज्या मनुष्याचे आपल्या स्वतःवर प्रेम असते, त्याला स्वतःच्या देहापलीकडचे काही दिसत नाही. त्याच्या आपलेपणाच्या वर्तुळाचा मध्यबिंदू तो स्वतःच असतो; आणि त्याचा परीघही तो स्वतःच असतो. तो आत्मकेंद्रित असतो. जो कुटुंबावर प्रेम करतो. त्याला मी म्हणजे माझे कुटुंब वाटते. त्याच्या आपलेपणाची व्याप्‍ती कुटुंबापर्यंत वाढलेली असते. हीच गोष्‍ट ज्ञाती, देश, यांनाही लागू आहे. काही महात्मे उच्च कोटीतील असतात. त्यांच्या ’मी’ चा विस्तार हा विश्‍वाएवढा असतो. त्यामुळे सार्‍या विश्‍वाबद्दलची आत्मीयता, प्रेम त्यांच्या मनात निर्माण होते. हे सारे विश्‍व म्हणजे मी अशी त्यांची भावना निर्माण होते. असा त्यांना अनुभव येतो. त्यामुळे ते जी जी कृत्ये करतात, ती ती जगाच्या विश्‍वाच्या कल्याणासाठी करतात. सर्व भूतमात्रांच्या हितासाठी त्यांचा देह चंदनासारखा झिजत असतो. हा सर्व ठिकाणी असणारा ’मी’ म्हणजे दुसरा--तिसरा कोणी नसून आपलाच अंतरात्मा होय, व तो सर्वव्यापक असा आहे. म्हणून या अंतरात्म्याच्या जाणिवेवर, ज्ञानावर सर्व गोष्‍ती अवलंबून असतात. आपले या अंतरात्म्याचे ज्ञान जितके संकुचित अथवा व्यापक असते, तेवढे आपले प्रेमही संकुचित किंवा व्यापक बनते. म्हणून आत्म्याचे खरे दर्शन आपल्याला झाले पाहिजे. त्यातून परमात्म्याचे ज्ञान होईल आणि ते ज्ञान झाले म्हणजे प्रेमातील स्वार्थबुद्धी नाहीशी होऊन ते अधिकाधिक निःस्वार्थी, शुद्ध बनत जाईल. स्वार्थी प्रेम अंती दुःखदायक असते. कारण ज्याला आपण आपले प्रेम अधिक शुद्ध, निःस्वार्थी म्हणजेच व्यापक करण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. परमात्मा हाच सर्वत्र भरलेला असून त्याच्या व्यतिरिक्‍त बाकी सारे नाशिवंत आहे हे समजावून घेऊन, परमात्मा जेव्हा आपल्या प्रेमाचा विषय होईल तेव्हा ते प्रेम दुःखद होणार नाही. कारण हा परमात्मा अविनाशी आहे.
मैत्रेयी ! हा परमात्मा जळी, स्थळी सर्वत्र भरलेला असल्याने, आपले डोळे ज्या ज्या वस्तू पाहतील त्या त्या वस्तूत हा परमात्मा पाहण्याचा प्रयत्‍न करावा. आपण जे जे ऐकू त्यांत या परमात्म्याचे गुण ऐकण्याचा प्रयत्‍न करावा. मनाने ह्याच आत्म्याचे म्हणेज परमात्म्याचे चिंतन करावे. आपल्याला त्याचाच ध्यास लावून घ्यावा. या अशा आत्म्यापासूनच विश्‍वनिर्मिती झाली असल्याने, या आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे सर्व जगाचे ज्ञान होते. मैत्रेयी, हेच अमृतत्व आहे. तू या उपदेशाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्‍न कर. हा उपदेश हीच माझी आध्यात्मिक संपत्ती आहे. ती मी तुलाही दिली आहे."
याज्ञवल्क्यांची अमृतस्त्रावी वाणी थांबली होती. मैत्रेयी भारावून गेली होती. ती एका वेगळ्याच आनंदात रंगून गेली होती. याज्ञवल्क्य तिच्या दृष्‍टीने तिचे केवळ पती राहिले नव्हते, गुरुही झाले होते. तिने त्यांना भक्‍तिभावाने नमस्कार केला. त्यांनीही मोठया प्रेमाने आणि आनंदाने आपला वरदहस्त तिच्या मस्तकावर ठेवला. त्या दिव्य स्पर्शाने ती एका आगळ्यावेगळ्या स्वानंद सागरात विहरु लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel