असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा ।
आपंगिले जिद्दी जाहलो त्या वेगळा ।
मायबाप माझे म्हणती मज माझ्या बाळा ।
शेवटी मोकलिती देती हाती काळा ॥१॥
संत तुम्ही मायबाप माझी राखा काही दया ।
लागतो मी वारंवार तुमचिया पाया ॥धृ. ॥
इंद्रीये माझी न चलती क्षणभरी ।
गुंतलो मायामोहे या संसाराचे फेरी ॥
अंथरूण घातले इंगळाचे शेजेवरी ।
कैशी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥२॥
मायबाप संत तुम्ही उपकार करा ।
जगी जो नांदतो जनीं जनार्दन तो खरा ॥
तयाचिया चरणावरी मस्तक निर्धारा ।
एका जनार्दनी करी विनंती अवधारा ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.