अर्जदस्त अर्जदार बंदगी । बंदेनवाज साहेब आलेकम् सलाम । कायापुरीकर जिवाजीपंत सुभेदार । बुधाजीपंत फडणीस । परगणे शरीराबाद । हकीकत । सरकारची रजा घेऊन निघाले । तों स्वार होऊन किल्ले कायापूर येथें दाखल जाहले । दरोबस्त अंमलदार सर्व सरकारकामास वाकब नव्हते । ऐशियास परगणें मजकूरचें कायापुरांतील उखडे रुजू झाले । सदरहु परगणा व जमातदार । सरकारचे पुढारी लोक यांचीं नांवें । पाटील कुळकर्णी । शेटे महाजन । देशमुख देशपांडे । यांची खालीं लिहिल्याप्रमाणें नांवें । दंभाजी शेटे । कामाजीराव महाजन । मनाजीराव देशमुख । ममताई देशमुखीण । रसनाईक पाटलीण । केसाजीपंत कुळकर्णी । जराजीराव देशपांडे । हे फार हरामजादे आहेत । कचेरींत जोम धरून बसतात । सरकारचे काम सुरू होऊं देत नाहींत । दंभाजी शेटे यानीं संत बाजारांतील भावाचा बिघाड केला । आयुष्य धान्याचे माप शुद्ध भरीत नाहींत । बाळपणांत क्रीडा । तारुण्यांत स्त्रीसंग । वृद्धपणीं चिंता । याप्रमाणें माया चालू केली । भस्म रुद्राक्षमाळा । पादुका जटा वल्कलें कंथा दंडकमंडलु । यांचा मात्र सुकाळ केला । या योगानें खरा परमार्थ बुडाला । देह अभिमान वाढविला । कामाजीराव महाजन । यानें आपले पांच बंधु आपण सरकारचे रिसाल्यावर ठेविलें । त्यांतील भ्रम । हट्ट । द्वेष । अधैर्य । साहस । अविवेक । असत्य । कौटिल्य । परोत्कर्ष । सहनत्व । हे दहा बारगीर । हाताखालीं घेऊन । तपस्वी व्रतेम नागविलें । विवेकाचें ठाणें उठविलें । योग याग जप तप ध्यान आष्टी समाधी चतुर्विध पुरुषार्थ हे कायापुरींतून बाहेर घालविले । व्याभिचाराचा गोंधळ फार केला । मनाजीराव देशमुख आपले मतें परस्पर कारभार करितात । स्त्रीसुनांमध्ये द्युत धन याचा अंगिकार केला । त्या योगानें प्रजा आपआपला धर्म विसरल्या । ममतई सरदेशमुखीण इनें आपल्या स्वपराक्रमानें संपूर्ण परगणा जर्जर केला । सर्व लोक मायाजाळांत गुंतविलें । परमार्थाविषयीं एकासही फडकूं देत नाहीं । रसनाई पाटलीण इणें खाण्यावर दृष्टी दिली आहे । केसोपंत काळे कुळकर्णी । जराजीराव देशपांडे । यांनी आपल्या जातीत फितूर केला । काळ्याचें पांढरें झाले । आणि पांढरीचा वसूल करविला । ऐसे आम्ही थोड्या दिवसांत वाकब होऊन । सरकारची कामगिरी करीत होतों । तों तुमचा नवज्वर चोपदार आला । त्यानें अशी करणी केली कीं । यमाजी भास्कर सरसुभेदार । यांची मागून तल्लब येणार आहे । त्यांनीं त्रिदोषाची रवानगी केली । त्या धास्तीनें तमाम परगणा ओस पडला । सदरहू तपशील । शिरपूर थरथरां कांपूं लागलें । डोळसवाडी उजाड जाहली । नाकपूर वाहूं लागले । कानपूर ओस पडलें । दिवेलागणी मोडली । मुखनगरातील व्यापार बंद जाहले । रसनाई पाटलीण वांकडी पडली । तगादा करावा तर कांहींच बोलत नाहीं । दंताळवाडीची कचेरी बरखास्त जाहली । मानपुरानीं पड घेतली । उरगांव धडधड करितें । याच्यानें लावणी होत नाहीं । पायगांवाचे मेटे बसलें । कंबरवाडी बसून राहिली । दोन गांवे तर पार उजाड झाली । त्याचा तपशीलवार । गांडापूर कर्जदार झालें । तें अखंड शंखनाद करी । त्याच्यानें अर्ध क्षण धीर धरवत नाहीं । लिंगपूर स्थानभ्रष्ट झालें । ऐंशी परगण्याची किर्द बुडाली । पुराण रानें वोस पडलीं । त्यांत नवज्वर चोपदार हुजुर न्यावयाची उतावीळ करिती । हुजूर यावे तर परगणे मजकूरचा कांहीं वसूल झाला नाहीं । यमाजीपंत कूरसीस करितील त्या धासतीने उगीच बसलो । आम्हांस तर सरकारच्या पायावेगळा आश्रय नाहीं । हजार अन्यायी । याजवर बुधाजीपंताचा अर्ज कीं । रयत बिघडल्यामुळें या त्रासानें जिवाजीपंताचा सुभेदार निघून जाण्याचें बेतांत आहेत । त्यास सरकारनें । त्याजवर कृपा करून । तत्त्वज्ञान पेनशन देऊन । ब्रह्मपुरींत रहावयास जागा द्यावी । बंदगी रोशन होय । एका जनार्दनीं अर्जदस्त

॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
maday@gmail.com

2428389992

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारुडे


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत