जोहार जी मायबाप जोहार । मी एकनाथ महार । सांगतों सारासार विचार । तो ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

गांवामधीं कुळें पांच साराचा । पंचवीस तयांचा विस्तार । जिवाजीचें ठाणें खबरदार । बैसलें की जी मायबाप ॥ २ ॥

गांवास असती चौदा वेशी । खिडक्या शोभती बावीस त्यासी । बुरुज तेरा चौपासी । राखीं द्वारीं बैसले की० ॥ ३ ॥

पांचांचा हा विस्तार । पंचवीस प्रजेचा बडिवार । तेथें जिवाजी हुद्देदार । सारा कारभार करिती की० ॥ ४ ॥

जिवाजीनें करूनि विचार । घेतले हातीं सहा कामगार । दासीसह परिकर । काम करूं लागले की० ॥ ५ ॥

सहा जे ठेविले कामगार । त्यांनीं गांवाचा केला नाहीं विचार । जिवाजीस अष्टाधिकार । देऊनि स्वाधीन केला की० ॥ ६ ॥

ऐसे जहाले सर्व एकाकार । पडला गांवांत अंधकार । शेटे महाजन सरदार । जाती निघून की० ॥ ७ ॥

एका जनार्दनीं म्हणे । जिवाजीचें वोस पडले ठाणें । आलें यमाजीचें धांवणें । नेलें धरून की जी मायबाप ॥ ८ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel