ऐका जमाखर्चाची धणी । नरदेह मुद्दल जमा धरूनी । बाकी साल हल्लीं उगवणी । शून्य घालुनी संसारा ॥ १ ॥

सनवत चौर्‍यांयशी लक्ष योनी । बाकी व्याज काया तेरीज मिळुनी । लक्ष लाउनी गुरुचरणीं । वसूल करावा नरदेहीं ॥ २ ॥

नरदेह साल मजकूर । रुजू साल गुदस्त पूर्व संस्कार । सद्‍गुरुकृपा निर्विकार । सालें भरली उगविली ॥ ३ ॥

संचित क्रियमाण विचार । पुण्यपाप स्वर्ग नरकद्वार । वेदशास्त्र पुराण निर्धार । स्वहित सार देखिलें ॥ ४ ॥

अहंभाव बाकी ठेविली । ती सद्‍बुद्धि नाहींशी केली । विवेक विचारानें पाहिली । वसूल केली नरदेहीं ॥ ५ ॥

जन्म जातक व्यवहार । हा संसृतीचा श्रृंगार । प्रेम पत्र ह्रदय सुंदर । अक्षय सार खतावणी ॥ ६ ॥

जातक जन्म मोफाई केली । सुखदुःख इच्छा फळें नेमिली । ऐशी शिल्लक चुकविली । जन्मान्मांतरींची ॥ ७ ॥

स्वधर्म खर्च केला । फल त्याग रुजू पाहिला । आला ब्रह्मार्पणीं मजुरा केला । फाटा ओढिला सुरनिसें ॥ ८ ॥

विचार सुरनीस नेमाचे । सावधान एकचित्ताचे । वर्म सुरू केलें सद्‍गुरूचें नांव अविद्येचें पुसिलें ॥ ९ ॥

विवेक आत्मवर्ग स्वामींचा । वडील बंधु सुरनीसांचा । झाडा पाहे प्रवृत्ति निवृत्तीचा । अंतर्यामीं विकसतो ॥ १० ॥

ध्यान पाख निशीं स्वयें पाख । ज्ञानचक्षु होय सुरेख । निजरूपी जाली उल्लेख । देखिले देख स्वयें जालें ॥ ११ ॥

एवं नरदेह जमा झाडियासी आला । ज्ञान अज्ञान बाकी झाडा झाला । पुढें शिलकेशी चुकला । जमाखर्च केला स्वानंदें ॥ १२ ॥

ऐसा जमाखर्च संसार वावो । जै जनार्दन कृपा करी तैं हो । नाहीं बद्धमुक्त संदेहो । समूळ वावो गुरुकृपें ॥ १३ ॥

ऐसा हा विश्वरूप जनार्दन । एकी एका सेवक कारकून । प्रवृत्ति निवृत्ति रस देऊन । व्यापार केला अद्वैतीं ॥ १४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel