शिवछत्रपतींची कीर्ती । गाऊ दिनरात्री ।

येईल मग स्फूर्ति । जाई भयभीति पार विलयाला ।

बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा इमला बांधून धन्य तो झाला ।

पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥ध्रु०॥

असंख्य तारे तेजबलानें शोभविती आकाशाला ।

परि शुक्राचा तारा एकच खेचुनि घेतो डोळ्याला ॥

दाहकता सूर्याची भरली शिवरायाच्या मूर्तीत ।

तशि मोहकता चंद्राची ती भरुनि राहिली देहांत ॥

वटवृक्षाची विशालता ती कडुलिंबाची कडवटता ।

आम्रफळाची रसाळता ती बाभळिची ही कंटकता ॥

अथांग गंभिरता दरियाची सरोवरची गोडी ती ।

हिमालयाची असे भव्यता उदारता पृथिवीची ती ॥

वैराग्याची शोभा दिसली शिवरायाच्या वृत्तींत ।

सत्पुरुषांचें दर्शन होते शिवरायाच्या प्रतिमेंत ॥

हयपति गजपति धनपति राजा पति सर्वांचा जरि झाला ।

त्यागी जीवन नित्य तयाचे नमन असो त्या शिवबाला ॥१॥

चाल

जुलमाचे घोर थैमान माजले सारे ॥

वीरत्व लोपले भ्याड झाले हो सारे ॥

थरथरती अन्यायापुढे लोक हो सारे ॥

चाल

अशा वेळीं जन्माला आला । एक बाळ धीर देण्याला ।

जिजाईच्या पोटीं जन्मला । शिवराय नावानं बाळ चमकुं लागला ।

जिजाईनं धर्म शिकविला बाळ शिवबाला । दादाजी कोंडदेव गुरु राष्ट्रकार्याला ।

पारतंत्र्य दूर करण्याचा निश्चय केला ॥ बाळ आठ वर्षाचा झाला ।

तेव्हा तेज त्याचे पसरले चारी बाजूला ॥

खाटकाच्या सुर्‍याखालून सोडवल एका गायीला ॥२॥

चाल

रोहिडेश्वरई शपथ घेतली राज्य हिंदवी करण्याला ।

तोरण गड सर करुनि बांधले तोरण त्यानें किल्ल्याला ॥

जुलूम लोकांवरचे सारे हळुहळु त्यानें थांबविले ।

जीवावरचे सारे धोके धैर्यबळानें संपविले ॥

चाल

सूर्य असा हा हळुहळु चढला ।

अंधार सारा लोपून गेला ।

घुबडांचा घूत्कार थांबला ॥

चाल

अफझल, फाझल, शिद्दी जोहार शाहिस्ताही हारविला ।

औरंगजेबाला पार चकविले, आग्‍र्याहुन सुटुनी आला ॥

लहानपणापासून संकटें अशी आलि बळि घेण्याला ।

तरी त्या वरती मात करोनी शिवाजी आला उदयाला ॥३॥

चाल

शिवरायाच्या मनोमंदिरी होति देवता जिजाई माता !

स्फूर्ति देवता । सत्त्व देवता । तुळजापुरची भवानी माता ।

युद्ध देवता । शौर्य देवता । रामदास गुरु राष्ट्रदेवता । तुकाराम वैराग्यदेवता ॥

चाल

१६७४ सालीं । रायगडावरी अभिषेक झाला राजाला ।

हर्षली धरती शिवाजी राजा गरिबांचा वाली झाला ॥

शिवछत्रपतीचें नाव दुमदुमे जगतीं ॥

चाल

खडा केला भित्रा माणूस । झुंज देण्याला ॥ जी ॥

भ्याडपणा गेला विलयाश । ढाल-तलवार हाती घेतली ।

थरकांप सुटला शत्रुला । त्यानें दिला न्याय सर्वाला ।

माणुसकी मंत्र हा झाला । मग तो जुलुम कोणीही केला ।

तरी त्याचा नाश त्यांनीं केला । असा छत्रपती जगतांत कोणी नच झाला ॥४॥

चाल

बंधुंनो ऐका या वेळां । जिवाजीचे गुण बाणावे ।

विचार हा करा । महाराष्ट्र मोठा होऊ दे ।

नीतिचा झरा ॥ माया ममता वसुंधरेची ।

भेदक दृष्टी गरुडाची । विरक्तता ती वृक्षाची ।

राष्ट्रभक्ति ती, ती त्याची ॥ प्रेमळता ही गोमातेची ।

झेप असे ती चित्त्याची । निर्मला ती त्या संताची ।

तळमळ होती मातेची । अशा गुणांची एक संगती ।

शिवरायाच्या अंगी दिसती ॥

चाल

रामकृष्ण जे कुणी पाहिले जे झाले द्वापारांत ।

कलियुगांत पुरुषोत्तम झाला असा आमुच्या लोकांत ॥५॥

फणस दिसे काटेरी परि तो आंत असे अति गोड गरा ।

वरुनि दिसे तो कडा कोरडा आंत परी अति रम्य झरा ॥

छत्रपती हा राष्ट्रपती हा राष्ट्रोधारक जगिं झाला ।

मानवतेचा खरा पुजारी षड्‌गुण-संपत्ती त्याला ॥

सर्व धर्म सारखेच त्याला भेदभाव नच चित्ताला ।

जुलुमाचा परि कट्टा शत्रू जुलूम त्यानें चिरडीला ॥

राज्य टाकिले शिवरायानें रामदासांच्या झोळींत ।

असे थोर हे मन राजाचे तोड नसे या जगतांत ॥

मुसलमान ही कैक धुरंधर होते त्याच्या सेवेंत ।

सर्वधर्म ते समान मानुनि राज्य चालवी प्रेमांत ॥

शिवरायाचे गुण हे सारे अंगिं बाणवुन या काळा ।

स्मारक त्याचें मनीं करावे हेच खरे पूजन त्याला ॥

पुतळे देतिल सुख डोळ्यांना, घडवतील गुण तुम्हांला ।

छत्रपतीसम व्हावें मोठे तेच विभूषण सर्वांला ॥

वर्णन किती करुं शिवरायाचें पुरें कधिं नच होणारे ।

जे जे कांही असे चांगलें तें तें येथें दिसणारे ॥

दैवी संपदा पार्थिव देहा इथे राहिली येउनिया ।

भाग्य आमचें म्हणुन लाभला आम्हाला हा शिवराया ॥

सज्जन रक्षण दुर्जन ताडन हेच कार्य त्या पुरुषाला ।

महाराष्ट्राच्या भव्य मंदिरी माता दैवत शिवबाला ॥

मातृभक्त गुरुभक्त शिवाजी तसाच जनता भक्त खरा ।

असे शिवाजी राजे जन हो सदा स्मरा तुम्ही सदा स्मरा ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel