एवढया उन्हाच्या रकामंदी ऊन लागीतं रकारका

ताईता बंधु माझा आला विल्लास पाठीराखा ।

सांगली शहरामंदी नवं इंजान जोनपाटा

वाजतो खटाखटा त्यात बंधूचा निम्मा वाटा ।

पंढरीच्या वाटं तुळशी आल्यात हुरडयाला

सोन्याच्या गोफणीन विठु हाणीतो भोरण्याला ।

पंढरपूरामधी उंच दुकान अत्तराचं

राज्य अखंड भ्रताराचं ।

पिताजी पितांबर बया गौळण वाहती गंगा

ताईता बंधु माज्या चल तीर्थाला पांडुरंगा ।

पंढरीला जातो भैन भावंड आम्ही दोघं

बंधु माज्याला किती सांगू तीर्थ घडेल मनाजोगं ।

पालख पाळयिना तू का हालीव तुळसीबाई

पोटीची माजी बाळ नव्हं ती मैना हाई ।

सावित्री भावजयी खाली बसूनी कुंकू लाव

सत्यवान बंधुजी ग साता नवसाचा माझा भाऊ ।

सावित्री भावजयी तू ग भाग्याची साजणी

सत्यवान बंधूसाठी करी देवाची विनवणी ।

समोबीरच्या सोप्या सासूबाईंची पावईल

तुमच्या पोटीचं रत्‍नदेव रत्‍न चुकून धावईल ।

थोरल माझं घर पुढ पायरी मोरायाची

करणी हावशा दिरायाची ।

धाकले दीर बाई मला पाठच्या भावावानी

कत दिरायाची जोडी रामलक्ष्मुनावानी ।

पंढबीरीच कुंकू मला महिन्याला लागे शेर

जावा ननंदाचं माझ घर ।

पांढरी माझी चोळी दशी बळीच्या पक्क्वानी

धुंडीली पेट उनाच्या रकामंदी हावशा भ्रतारांनी ।

तोडला चंदन वाचा जाईना कुटका कुटका

हावशा चुडराज तुमच्या गुणाचा मला चटका ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel