सासर्‍याचे बोल जसे मीरचीचे घोस

जातीवंताचे लेकी पूस ।

सासर्‍याचे बोल नको सांगूस आईपाशी

तिचं मन दुखवीशी ।

सासर्‍याचे बोल जसा विषाचा तो पेला

तुझ्यासाठी मी गोड केला मायबाई ।

माझं घर थोर केर लोटता लोटना

सभा बसली ऊठेना सासूबाईंची ।

दुरुन दिसते मला वाटते माझी आई

चुलती काकूबाई येत आहे ।

माहेरी जाताना वहिनी पायांनी पाट सारी

तुझ्या राणीला गर्व भारी भाऊराया ।

माहेरी जाताना वहिनी गुजरी डोळे मोडी

तुझ्या चोळीची काय गोडी भाऊराया ।

दे रे देवा मला बापासारखा सासरा

कंठयाखाली तो दुसरा चंद्रहार ।

दे रे देवा मला आईसारखी सासूबाई

कमळी अंबाबाई पुजीयीली ।

दे रे देवा मला बहिणीसारखी नणंद

कमळी गोविंद पुजीयीला ।

दे रे देवा भावासारखा तो दीर

कमळी रघुवीर पूजीयीला ।

आई बापांच्या राज्यामधी आम्ही दुधावरच्या साई

भावाच्या राज्यामधी शिळ्या ताकाला सत्ता नाही ।

नेसी पिवळा पितांबर हाती सोन्याचा बिलवर

मैना निघाली सासरी लेक बाबांची तालीवार ।

राजहंस पाखरु पानमळ्याच्या बसतीत

सासूचा सासुरवास सोसील्यान काय होतं ।

आईबापांच्या जिवावर दुनिया भरली दिसती

कुळा तुझ्या नांव येतं सईबाई ।

वाजत गाजत चाले रस्त्यानं वरात

जन बोलती निघाली सून सत्तेच्या घरात ।

जिवाला वाटतं तुपासंगं खावी घारी

सासू माझे मालनी मला पाठवा माहेरी ।

बाळ सासर्‍याला जाते तिच्या ओटीला कोवळी पानं

संगं मुराळी पैलवान ।

बाळ सासर्‍याला जाते, आडवा लागतो बाजार

हौशा तिचा बंधु संगं खजिन्या गुजर ।

बाळ सासर्‍याला जाते तुझं सासर लांब पल्ला

फिर माघारी भेट मला ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel