पंढरीची बाई कुंकू मी ग एकटी कशी लेवू

यक्षदेवी पद्‌मावती आधी तिलाच मान देवू ।

पंढरीचं कुंकू मला महिन्याला लागी शेर

जावा नंदाचं माजं घर ।

सरलं दळयानू माज्या सुपात येडी गंगा

द्रुपति वव्या गाती तुला पिरतीच्या पांडुरंगा ।

चवघी आम्ही जावा पाचवी माझी सासू

नंद कामीनी मदी बस माज्या चुडयाला शोभा दिस ।

माझ्या ग अंगणात कुनी सांडीला दहीभात

माजा तो बाळराज बाळ जेवीला रघुनाथ ।

सदरी सोर्‍यामंदी नारुशंकर तांब्या लोळे

सावळा बाळराज नातू जावळीचा खेळे ।

शेजी तू आईबाई तुजा संभाळ सोनचाफा

माजा अवकाळ बाळराज बाई मोडील त्येचा चाफा ।

बाळ चालतं रांगयीतं बाळ धरीतं धोतराला

माज्या त्या बंधुजीला कन्या सोबती चातुराला ।

लुगडयाची घडी बाई यीना ग माझ्या मना

पित्या माज्या दवलता बापा नेसू दे तुज्या सुना ।

लुगडयाची ग घडी दोनी पदर रामसीता

घडी घालतो माझा पिता नेस म्हनीती माझी माता ।

लुगडयाची ग घडी म्या का टाकीली बाकावरी

माजा रुसवा बापावरी ।

काळी ती चंद्रकळा दोनी पदर रेशमाचे

माज्या ग बाळकाचे चाटी मैतर निपानीचे ।

काळी ती चंद्रकळा दोनी पदर सारयीक

हौशा कांताची पारयीक ।

भरील्या बाजारात बंदु ओळखी पैल्या तोंडी

हाती छतरी पिवळी दांडी ।

भरल्या बाजारात चोळी फुटानं मला दीती

बयाच्या माज्या बाळा तुला गोटानं दावू किती ।

बारिक बांगडी बारा आन्यानं लेती जोडी

बंदु हसत चंची सोडी ।

बारीक बांगडी मला भरुसी वाटली

हौवश्या भ्रतारानं तार पुन्याला पाटवीली ।

बारिक बांगडी गोर्‍या हातात चमक्या मारी

माजा तो बाळराज केस कुरळ मागं सारी ।

माळ्याच्या मळ्यामंदी माळी मळ्यात येऊ दीना

माजा तो बाळराज फुलं जाईला राहू दीना ।

सोन्याची अंगठी ग अंगठी कशानं झिजयिली

पित्या माझ्या त्या गुजरानं रास गव्हाची मोजीयीली ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel