जोडीली मायबहिण घर तुझं वरल्या आळी

पाव गुजाला संध्याकाळी ।

तुझा माझा भाऊपणा जन आणील डोळ्यांत

गुजाचा करु झाडा चल माझ्या तूं मळ्यांत ।

तुझा माझा भाऊपणा जात मैनेची वाईली

एका ताटात जेवण्याची हौस मनात राहिली ।

सासरवासिनीची ती का मजला येती मया

देवानं मला दिली तुझ्यासारखी अनूसया ।

सासर्‍याला जाती तुझा बामनी अवतार

घोडं धरलेला भ्रतार ।

सासर्‍याला जाती तुझा बामनी सजावजा

जेण पासोडी संगं ने जा ।

सासर्‍याला जाते पुढे बंधुजी मागे पिता

आहे भाग्याची माझी सीता ।

समोरल्या सोप्यां तिला हलकडी प्रकारची

माझी ती भैनाबाई राणी लाडकी भ्रताराची ।

बारीक बांगडी गोर्‍या हाताला चमक्या देती

शरदीनी भैनाबाई हौशाकंताची राणी लेती ।

थोरल्या घरची सून वाडयाबाहेर कशी जाऊं

चुडया माझ्या राजसाचं इष्ट मैतर सारं गांवू ।

सरज्याची नथ नथ अखूड दांडया मधी

बंधु सोनार वाडयामधी ।

सरज्याची नथ, नथ आखूड तिचा दांडा

भावज गुजरीच्या माझ्या नथ शोभती गोर्‍या तोंडा ।

पाची पक्क्वान्नाचं ताट बटाटयाची मी करते भाजी

माझ्या बंधूच्या भोजनाला शिरापुरी मी करते ताजी ।

शेजारणीबाई ऊसनं द्यावं लाडू

माझ्या बंधूच्या भोजनाला अतां कवाशा कळ्या पाडूं ।

माझा ग भाऊराया वाटे सर्वांना हवा हवा

आहे मथुरेचा खवा ।

माझा भाऊराया मनी मी आठवीन

पोटात साठवीन रात्रंदीन ।

हितगूज बोलत चंद्र ढगाच्या आड गेला

पित्या माझ्या दौलताचा नाही गुजाचा झाडा झाला ।

बाराही वर्ष झाली बहिण भावाच्या माहेराला

सावळ्या बंधूराया तुझं माहेर तुझं तुला ।

मला घेतलं लुगडं साडेवीसाचं हिरवंगार

बंधु माझ्या त्या चतुरानी केलं माहेर डौलदार ।

लुगडयाची घडी, घडी पहाते मी दिव्याज्योती

हौशा बंधूला विचारती आंत जरीच्या काडया किती ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel