समोरच्या सोप्या जेन टाकिते चकराचं

माझ्या ग बंधवाचं स्नेही मैतर वकिलाचं ।

समोरच्या सोप्या उभे काचेचे गल्लास

चतुर माझा बंधु पाणी पिणार विलास ।

सरीलं दळण माझ्या गीताच्या छंदाखाली

चतुर माझा बंधु लेतो अबीर गंदाखाली ।

तेल्या बुत्याची कावड मुंगी घाटात झाली छाया

चतुर बंधुजींनी पहिलवानांनी दिल्या बाह्या ।

तांबोळ्याची मैना पानं मोजिती चौदाचौदा

चतुर माझा बंधु पान खाणार पोरसवदा ।

तांबूळ्याची मैना तुझा ओसरीसाठी ओट

माझ्या ग बंधुजीला पान खाण्याचा छंद मोठा ।

एकामागं एक गाडया चालल्यात नवू

चतुर माझा बंधु व्यापारी भारी गहू ।

सातार्‍या शहारामधी छत्री कुणाची झळकली

चतुर बंधुजीची स्वारी पगाराला गेली ।

झडा झडा चालं तुझ्या चालीनं चालवना

चतुर माझा बंधु तहान लागली बोलवेना ।

गोंडाळ्या हातायाला ह्याला बांगडी लागे थोडी

चतुर माझा बंधु राजवर्खीची लावा जोडी ।

लोकाच्या बंधुवाणी माझा बंधुजी नव्हे नारी

किती गडनी तुला सांगू शहामृगाला माया भारी ।

मावळता दीस झाडाझुडात दंग झाला

चतुर बंधुजीच्या खंड नांगरा पडला ।

दिवस मावळला दिवसापासी माझं काय

चतुर बंधुजीची दिवा लावून वाट पाय ।

भरली तिन्हीसांज दिवा लावून उभी रहाते

चतुर माझा बंधु तुझ्या राज्याची हवा पहाते ।

माहेराच्या देवा तुला नाही मी विसरत

चतुर बंधुजीचा येल जाऊ दे पसरत ।

हात मी जोडीते तुला सांगते श्रीहरी

चतुर माझा बंधु आहे जहाजाची दोरी ।

सरलं द्ळण सरलं म्हणाया लाज वाटं

चतुर बंधुजीच्या कणगी भरल्यात तीनशेसाठ ।

सरलं दळण एवढं उरतं कुठं ठेऊ

बंधु बळताला शिडया लावू ।

गावोगावचे पाटील कोरेगावच्या बाजारी

चतुर बंधुजीची खुर्ची मनसुबाशेजारी ।

सुखाला भरतार दुःखाला बाबाआई

सयाला किती सांगू बंधु वैद्याच्या गावी जाई ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel