शिपाई शिलेदार हाती बंदूक आयन्याची

सावळा बंधु राजा रजा मागतो महिन्याची ।

वाटवरल्या मळ्यामंदी आल्या गेल्याची उस्तवारी

बंधु धाकटा कारभारी ।

बारीक गळा एवढा नका गाऊस मोटेवरी

तांब्याच्या घागरी उभ्या गौळणी वाटेवरी ।

बंधुजी सासुरवाडी जातो हायी इथून बारा कोस

त्याला नटाई लागं दीस ।

पाची प्रकाराचं ताट वाटी तुपाची कुठं ठेवूं

माझ्या तू बंधुराजा चल प्रीतीच्या दोघं जेवूं ।

मध्यान पालटली मला उचकी लागली

माझ्या त्या बंधुजींनी कुरी तासाला उभी केली ।

माहेराला जाते आडवं येत्याती भाऊभाचं

माझं माहेर दैवाचं ।

सोपा माळी बांधुनी जोतं आलया आकाराला

शेला रुमाल सुताराला ।

बंधुजी बांधी माळी भावा पडला विचार

लावा गवंडी सुतार ।

बंधुजी बांधी माळी मोठी ढेलज नाही जागा

परसदारानं तुम्ही वागा ।

सांगूनी मी धाडी बाळा माझीया सासूईला

संभाळ कर बाई तिच्या डोईच्या केसाईला ।

नदीच्या पलीकडं लेक देवूनी झाली वेडी

आंब्या दादाला हात जोडी ।

लेकीचा जन्म बाई जसा गारवीचा सोपा

आईबापानं केली जोपा ।

नांदाई गेली बाळ वाट लागली मुरमाची

माझी तू बाळाबाई बोटं सिनली इरुद्याची ।

सासरी जाती बाळ बाप म्हणे जा ग बाई

जन्म दिलेली माझी आई मागं हंबरीती गाई ।

सासरि जाती बाळ पुढं बंधूजी मागं पती

माझी तू बाळाबाई मधी चांदणी शोभा देती ।

नांदाई जाती बाळ बाप बघीतो खालीवर

माझी तू बाळाबाई सत्ता चालेना तूजवर ।

नांदाई जाती बाळ तुला कश्याला गाडीघोडं

आलं मोटार वाडयापुढं ।

नांदाई जाती बाळ घोडं लागलं चढणीला

माझी ती बाळाबाई हात करी गडणीला ।

पाण्याच्या जाळीमदी मगर माशाचा बंगला

लेकीच्या जन्माला धनी असावा चांगला ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel