सासूचा सासुरवास नंदाचा जयजयकार

तढी मी नांदती बाई तलवारीची धार ।

सासू ग सासरे तुले चौघेजण देर

गवळण पारबता मही भाग्याची गऊर ।

सासू शिकावते सुनाले शानपन

लानाले देर तुहे लागते वागवन ।

सून सावित्रा उचल पंक्‍तीचे डवणे

जेऊनी उठले तुहे नंदोई शहाणे ।

सून सावित्रा उचल पंक्‍तीच्या पत्रावळ्या

जेऊन उठल्या नंदा तुझ्या लेकुरवाळ्या ।

सून सावित्रा उचल पत्रावळाच्या पंगती

जेऊन उठले तुह्या चुडयाचे सांगाती ।

सासूसासर्‍याचा आशीर्वाद घेन सुने

त्याहीच्या आशीर्वादानं फयाची नाही उने ।

सासर्‍याले गेली माजी मयना गुनाची

मले सय होती तिच्या आडानपनाची ।

सासर्‍याले गेली गेली हासत खेळत

बाई माज्या मयनाले नाही अजून कळत ।

मह्या दारामंधी सांडलं कुंकू पानी

नव्यानं भैना माजी सासर्‍याले गेली तान्ही ।

सासर्‍या चालली मैना लाडाचा ग फोड

नवाळी माजी मैना चुलते मागं पुढं ।

सासर्‍या चालली मैना माजी ग लाडाची

लेका अर्जुनाची वरी सावली ताडाची ।

सासरी जाते येळी घाडा लागला चरणी

बाई माझ्या नेनंतीच्या उभ्या मैनाच्या गडणी ।

सासरी जाते येळी सयाले पुसा ना

नवाळी माजी बाई हरण गळ्याची सुटा ना ।

शिंपीन शिव चोळी शिव आखूड बाह्याची

नवाळी माजी बाई मैना सासरी जायाची ।

सासरी जाते येळी बाप म्हने जाय बया

आईची येडी माया लांब येती समजाया ।

सासरी जाते येळी माय धरती पोटाशी

मयना माजे बाई कदी हरणे भेटशी ।

सासर्‍याले जाते पुडला पाय मागे घेते

नादान माजी बाई मांगे मुर्‍हायी मांगते ।

दिवाळी दसरा माज्या जिवाले आसरा

आत्याबाई माजे मूळ पाठवा उशीरा ।

सासू आत्याबाई पाया पडू द्या वांग्यात

दिवाळीचं मूळ मले जाऊ द्या टांग्यात ।

सासू आत्याबाई पाया पडू द्या पायरी

दादा आले मुये मले जायाचे माहेरी ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel