आम्ही चौघी भैनी एका रंगाच्या साडया नेसू

ऊंच पायरीवर बसू आम्ही थोरांच्या लेकी दिसू ।

माझ्या जीवाला भारी जड खडी साखर घोटयीना

बंधु उशाचा उठयीना पाणी डोळ्याचं तुटयीना ।

काय पाटच्या पार्‍यामंदी दिस उगवुनी दारी आला

येवढया हळदी कुंकवाला म्या का पदर पसरीला ।

सासू सासयीरा आंबा लावून दिला त्यांनी

बाळ माझ्याला दिली लेक आंबा उत्तम पाहूयीनी ।

उन्हाच्या रखामंदी गाडी जुंपली रेडयायाची

जोती सागर देवायांनी दिली दवड घोडयायाची ।

उन्हाळ्याचं ऊन काळ्या खडकाची होत लाही

हौवशा भ्रताराची गोर्‍यापणाची गत कायी ।

समोर सोप्यावर कुणी ठेवीला तांब्यापेला

बंधु वकील पाणी प्याला ।

उन्हाच्या रखामध्ये कुठं निघालं माझं सोनं

कवळ्या छातीला लागं ऊन घाम पुसीते पदरानं ।

वैराळ सादवितो ल्याग बायांनो नवी तर्‍हा

बंधु निजला जागा करा ।

वैराळ सादवितो, तो का सादवी वैल्यावेशी

बया राहिली परदेशी छंद सांगू मी कुणापाशी ।

बंधुजीचं बाळ माझं मला म्हणीतो आत्या आक्का

कडी घेऊनी घेते मुका ।

जोंधळ्या परायास वाढवते मी ग तूरी

लेका परायास लेक मला हाय प्यारी ।

थोरलं मोठं जातं मला बघून पळईतं

बयाचं दूध माझ्या मनगटी खेळईतं ।

कामामधी काम दळण अवघड

गाण्याच्या नादावर ओढावा दगड ।

माहेरच्या वाटे कोन चालतो तोलाचा

हौशा बंधू माझा हिरा झळके मोलाचा ।

बंधुजी पावईनं येताचं गाजतात

घोडीचं घासदाणं, माझ्या घंगाळी भिजतात ।

आला बंधूजी पावईना, माझ्या जावाल धगा धगा

शिंगी अवकाळ नवी जागा ।

पिवळी पितांबर मला पुशितो सारा गाव

सावळा बंधुराज म्यांग लुटीला बाजीराव ।

पिकलं उंबीयीरं सारा डोंगर दरवळतो

नटवा बंधु माजा पाड कशाचा विचारतो ।

तुज्या जीवासाठी जीव माझा हार्‍या हुर्‍या

का म्हणून सुकलास माझ्या शेतीच्या राजगीर्‍या ।

सारविल्या भींतीवर काढते चित्तार

बंधूचं बहिणीला आलया पत्तार ।

नदीच्या काठायाला बेट फुटतं उन्हाळ्याचं

माझ्या हुरद्यात फुलतं माह्यार जिव्हाळ्याचं ।

सुकमार माझी बाई का लागली रडायाला

कुण्या ग पापिय नं लाविली दळायाला ।

सासू का सासर्‍यानं धाकल्या ननंदेनं

लावली दळायाला थोरल्या जावेनं ।

वढना जड जातं हालना जड तळी

घामेजली माझी बाई फुलात चाफेकळी ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : इतर


महाराष्ट्राचे शिल्पकार
देवी आरती संग्रह
कविता संग्रह
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
ओवी गीते : स्त्रीजीवन
भारताची महान'राज'रत्ने
 भवानी तलवारीचे रहस्य
कविता संग्रह : संजय सावळे 4
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे