सुबान संतूबाई तुज्या न्हानीची वलीमाती

माजी भैनाबाई माजी गर्बीन येती जाती ।

भैन भावांडं एका डब्याबींतलं मोतीं

मावली बाई माजी भरनी गंगला आली व्हती ।

सासू सासर्‍याचे घर, घर दीर नणंदाचं

पृथ्वीच्या मोलाचं ग लेणं दिलं भ्रताराचं ।

सासू सासरे माझ्या घराचे भूषण

कपाळी कुंकू भरजरीचे निशाण ।

सासरी सासूरवास मला नाही केला

किर्ती मिळावी तुम्हांला सासूबाई ।

सासू सासर्‍याचा मला सहवास चांगला

आपुल्या वाडयांत वेल जाईचा लावला ।

शिंदेशाही तोडे केलेत दसर्‍याला

हौस माझ्या सासर्‍याला ।

लक्ष्मी लक्ष्मी हाका मारतो सासरा

अपुल्या वाडयात दिवा लावावा दुसरा ।

वडीलपणाची मानमान्यता आहे थोर

वहिनी म्हणती नणंदा दीर ।

वडीलपणाची मानमान्यता आहे बहू

दीर सावळ्याला कशी नावाने बोलावू ।

घर माझे मोठे शंभर येती जाती

सावळा दीर घरी नाही सांगू मी किती ।

सासरी सासूरवास सोसेल तसा सोसावा

आब राखावा माहेरच्यांचा ।

बाप हा ईश्वर माय बाई पार्वती

पुढे नंदी शोभा देती बंधुराज ।

दुरुन दिसते माझ्या माहेराची शोभा

भाईराया माझा ऊंच ओसरीला उभा ।

अक्षता टाकिते मी पृथ्वीच्या पाठीवरी

भाईराया माझा सुखी असो कुठे तरी ।

आयुष्य मी चिंतीते माहेराच्या आळीला

सांगते भावजयी तुझ्या चुडा ग चोळीला ।

माझं ग माहेर जशी गोकूळाची वजा

सांगते बाळराजा कृष्णाजी मामा तुझा ।

दिवाळीची साडी चोळी संक्रांतीचा तीळ लाडू

सांगते भावजयी माझी आशा नको मोडूं ।

काळी चंद्रकळा पितांबराच्या मोलाची

बहीण भावाच्या तोलाची ।

काळी चंद्रकळा काजळाची वडी

घेणार्‍याची दृष्ट काढी ।

लेक जाती सासर्‍याला चुलती म्हणती जाग बया

आईची वेडी माया लांब जाती घालावाया ।

लेक जाती सासर्‍याला आता सासर लांब पल्ला

आता माझी बाई कवा येशील सांग मला ।

जिवाला जड भारी आयाबायांनी भरला वाडा

मावली आली माझी तुम्ही बायांनो वाट सोडा ।

जिवाला हुरहूर का ग वाटत होती बाई

ताईत माझा बंधू लईदीं झालं आला न्हाई ।

जिवाला हुरहूर काल परवाच्या धरुनी

बंधुराज माझा गेला गावाच्या वरुनी ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel