१२६.

भरल्या बाजारात आल्याती तान्ह्या म्हशी

उभा बंधुजी ,दलाल्या बाईपाशी.

१२७

लोकाच्या बैलाला काय पाहातां वाकुनी

बैल पाखर्‍या माझा गेला दावण झाकुनी

१२८.

बैलाला दृष्ट झाली ,झालीया येशीमंदी

लिंब डाळींब, बंधुच्या खिशामंदी

१२९.

बैल अंजिर्‍याचा पिवळा दिसे माथा

बंधुजीन त्याला ,जेजुरी नेला होता.

१३०.

बैलामंदी बैल , बैल मदन दिसणीला

मोती लाविल वेसणीला.

१३१.

बैलाला दृष्ट झाली पेठेच्या वाण्याची

दृष्ट उतरीते बैलासंगट धन्याची

१३२.

दृष्ट मी काढीते , मीठमोहर्‍या मिर्च्या तीन

धन्या बैलाची एक शीण.

१३३.

बैलामंदी बैल हौशा गुनाच

नका जुंपू उन्हाचा

१३४.

बैलाची नांव ,मोर्‍या पुतळ्या , चिन्त्तामणी

बंधु रघुनाथ माग झुले हौशा धनी.

१३५.

सकाळच्या पारी गाईची लांबड

माझ्या गवळ्या झाली साजंड

१३६.

गईच्या गाईराख्या , गई राखावी देखणी

हौशा बंधु तिचा धनी ,पाठ्चा चिंतामणी

१३७.

गाईनी भरला गोठा, म्हशीनी भरला वाडा

आलाअ गवळी माझा, त्याला वाट सोडा.

१३८.

सकाळच्या पारी हात जोडिते डोंगराला

खोंड खिलारी नांगराला.

१३९.

गईचा गईराख्या , म्ह्शीचा बाळनंदी

तान्हा माझा पावा वाजवी पाणंदी

१४०.

गईचा गईराख्या , म्हशीला गडी ठेवा

बाळ वासरांमागे लावा.

१४१.

गईचा गईराख्या , म्हशी ढानक्या गेल्या पिका

गवळी अजाण मारु नका.

१४२

नेनत्या गुराख्याच काठी धोतर माळावरी

गाई पांगल्या गोळा करी

१४३.

गाईला झाली खोंड , म्हशीला झाल्या रेडया

लावु जोत्याला भोरकडया

१४४.

म्हशीराख्या दादा म्हशी चरती उभा बांध

माझा गवळी गोरा चांद

१४५.

सकाळच्या पारी हात भरिला अमृतानं

आदंन दिल्या गाई , पिता माझ्या सम्रतानं

१४६.

पहाटेच्या पारामंदी हात भरला लोनियानं

वापबयाच्या पुनियानं

१४७.

पहाटेच्या परामंदी रवीबारडीला आलं गोंड

माझ्या बाळाबाई नवशीक

१४८.

पहाटेच्या पारामंदी रवीबारडीला आलं गोंड

माझ्या गवळनीला राजदंड

१४९

पहाटेच्या पारमंदी भरला रांजन मारी लाटा

माझ्या गवळ्याचा खर्च मोठा

१५०.

घुसळन घुसळते पाच फेराला आल लोणी

माझ्या गवळनीची भरज्वानी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel