१५१.

घुसळन घुसळते पाच फेराला आल लोणी

माझ्या गवळनीची घरज्वानी

१५२.

गई हंबरती वासरं साद देती

वाडा हंबरती वासरं साद देती.

१५३.

सकाळच्या पारी रविबाईचा गोमकार

माझा गवळ्याचा शेजार.

१५४.

कोन वाडा पुसती पिताजी गवळ्याचा

दुरुन.दाविते दारी चौरंग अगुळीचा

१५५.

लक्ष्मीआई आली , आली उठत बसत

वाडा गवळ्याचा पुसत

१५६.

लक्ष्मीआई आली , तांब्यान ताक प्याली

माझ्या गवळ्य भास दिली.

१५७.

जाते माहेराला पानंदी बसते

वाडी गवळ्याची आनंदी दिसते

१५८.

उगवला नारायेन , उभ वसरीबाईला

बाळका गनपती सोड वासरं गाईला.

१५९.

सकाळच्या पारी म्हशीखाली रेन्दा

माझ्या गवळ्याला सोभतो गवळी धंदा.

१६०.

सकाळी उठुनी स्वारी गोठयाकडे गेली

धनियांना पाहुनी जोडी गाईची हंबरली

१६१.

तिन्हीसांजा झाल्या दारी घंगाळ वाजती

घरधनियांचे बैल दाणा खाती.

१६२.

भरली तीनसांजा दिसा सोडली कासर

सोड गाईला वासर

१६३.

भरली तीनसांज दिवा लावावा राहीबाई

गवळी पाजितो तान्ह्या गाई.

१६४.

भरली तीनसांज दिवा लावावा सवाशिणी

गाई आल्याती मोकाशिणी.

१६५.

भरली तीनसांज दिवा लावावा तुळशीपाशी

बंधुजीचे बैल हंबरती वेशीपाशी

१६६.

भरली तीनसांज गाई आल्या गोठीत

दूध बाळाच्या वाटीत.

१६७.

तीनसांजा झाली , गईअवासरं सोडा सोडा

राया नंदाला दूध काढा.

१६८.

भरली तीनसांज दिव्याला ताकीत

बाळ आला लक्ष्मी हाकीत

१६९.

भरली तीनसांज दिव लावु आडभिंती

दावणीचे बैल आले किती

१७०.

भरली तीनसांज गुरांढोरांचा वकूत

दिली बाळाला ताकीत.

१७१.

भरली तीनसांज ,दिवा लावावा सवंदरी

बंधुजीच बैल आल्याती गावंदरी

१७२.

भरल्या तीनसांजा दिवा लावी कोठे कोठे

घरधनियाचे चिरेबंदी गाईगोठे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel