१.

रानी निघाली माहेरा, भरतार आंब्यातळी

कधी येसी चंद्रावळी

पीर्तीच्या भाव कंथ, धरितो पदराला

रानी, नगं जाऊस माहेराला

पीर्तीचा कंथ बोले, रानी खाली बैस

जातीस माह्यारा, मला कठीण जाती दीस

काळी चंदरकळा, जरीचा पदर

तिथं भरताराची गुंतली नदर

माडीवर माडी गिलावा लालीलाल

धनियांचा रंगमहाल

पिकल्या पानाचा इडा सुकून गेला ताटी

रुसला राजस कशासाठी

रूसला भरतार, समजावूं कसा

घालीन प्रीतफांसा

कापी बिलवर कशानं पिचला

हात कंथाच्या उशाला मी दिला

लांब लांब बहालं शेजेच्या खाली शेंड

कंथ उशाला देई दंड

१०

छ्प्पर पलंगावर वेलच्यालवंगाचा सडा

घरधनियांना मी झोपेत दिला इडा

११

गोठपाटल्याचा हात कंथाच्या उशाखाली

हलवून जागी केली

१२

भरताराचं सुख हंसत सांगे वालू

मुखीच्या तांबुलानं सर्जे नथीचं झालं लालू

१३

तुझ्या जीवासाठीं जीव माझा इकीन

सोनं ताजव्या जोखीन

१४

पाच परकाराचं ताट, झाकीत दोन्ही हात

सख्या पाहाते तुझी वाट

१५

पाहांटेच्या पारामंदी, कोंबडा माझा वैरी

बांग देतुंया दुहेरी

१६

रायासाठी माझा जीव थोडाथोडा

सख्या पायात घाला जोडा

१७

चईताचं ऊन लागतं माझ्या जीवा

छ्त्री उघडा सदाशिवा

१८

टपालवाला आला जीवांत नाही जीव

हौशा राजसाच पत्र वाचून मला दाव ?

१९

पराया मुलुखाचं कांही कळंना बातबेत

घालावी खुशाली कागदात

२०

दृष्ट म्हणू झाली पान्यापरास पातळ

डोळं सख्याचं उथळ

२१

मोठंमोठं डोळ तुझ्या डोळ्याची मला भीति

खाली बघून चालूं किती

२२

मोठंमोठं डोळं , माझ्या सख्या रतनाचं

वाची कागद वतनाच

२३

मोठंमोठं डोळं, तुझ्या डोळ्याची मला गोडी

सुरमा ल्यायाला देते काडी

२४

मोठंमोठं डोळं अस्मानी तारा तुटे

तुझ्या डोळ्याची भीड वाटे

२५

मोठंमोठं डोळं, जशी लिंबाची टोपणं

रूप लालाच देखणं

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel