५१

हंसत तुझी बोली, नटत तुझी चाली

सया पुशित्यात, कोन माऊली याला व्याली

५२

चालतो झडाझडां वाट लागते लवणाची

बोली मंजूळ मोहनाची

५३

जीवाला एवढी माय कशाला लाविलीस ?

उंबराच्या फुलावानीम सुरत कशाला दाविलीस ?

५४

तोडीला चंदन वाया जाईना कुटका

हौशा तुझ्या गुणाचा लागला चटका

५५

सांगुन धाडिते, माझ्या शिपाई रंगील्याला

हाती कंदील घेऊनी यावं बंगल्याला

५६

बसाया बसकुर देते शेलारीवर पाट

आला जिव्हाळा माझा दाट

५७

तांबडया मंदिलाची लालाई रसरशी

सख्याला दृष्ट झाली, सुभेदाराच्या वाडयापाशी

५८

सुरतेच मोती ठेविलं पाकीटांत

रायाला दृष्ट झाली ग नाटकांत

५९

सावली परतली दारीच्या लिंबार्‍याची

किती वाट पाहू गावा गेलेल्या हंबीराची

६०

परसुंदारीच्या मोगर्‍याची सावली परतली

वाट पहाण्याची सीमा झाली

६१

सावली परतली दारीच्या घेवडयाची

किती वाट पाहू राजविलासी केवडयाची

६२

सोप्याची साउली गेली जोत्याखाली

वाट पहाण्याची सीमा झाली

६३

किती वाट पाहूं, पिवळी झाली काया

सख्या कठिन केली माया

६४

वाट किती पाहुं शिणले डोळे कोरा

कुंठ गुंतला राजमोहरां ?

६५

वाट किती पाहूं डोळे झाल्याती रंगराव

कुठं गुंतला भीमराव

६६

गावाला गेले बाई वाट पहाते रंगील्याची

चित्रं कोमेली बंगल्याची

६७

माझे दोन्ही डोळे सख्याच्या गांवाकडे

कधी राजस दृष्टी पडे ?

६८

गावाला गेले धनी, मोजिते आठवडे

चित्त माझं वाटेकडे

६९

गावाला गेले बाई, वाटतं भणाभणा

बैठकीचा जागा सुना

७०

गावाला गेले बाई, जाणं असलं कसलं ?

आकडी दूध ते नासलं

७१

गावाला गेले बाई, मागची न्हाई सई

दुध नासुन झालं दही

७२

गावाला गेला सखा, वाटेना गेल्यावानी

रूप चांदीच्या पेल्यावानी

७३

गावाला गेलं धनी, जीव तिकडे माझा सारा

पाऊसामागे वारा

७४

गावाला गेलं धनी, न्हाई मला सांगितलं

अन्याव माझं काय झालं

७५

गावाला गेला बाई गेला मझा येलदोडा

सपनांत येतो, त्याच्या मंदिलाचा तिढा

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel