अर्जुन उवाच

अघ्यात्मिक गुह्यहि हें देवा उपदेशिले तुवा मजला ॥

त्या योगानें माझा हा मोह सर्व नष्ट कीं झाला ॥१॥

भूतोत्पत्ती नाशहि विस्तारें तूंच मजसि सांगितलें ॥

कमल पत्राक्ष त्वांच तव अविनाशी महात्म्य ऐकविलें ॥२॥

परमेश्वर तूं अससी वर्णिलेस आपणांस तूं जैसें ॥

पुरुषोत्तम इच्छी मी पहावया ईश्‍वरी रुप कैसे ॥३॥

तव रुप पहायाला योगेश्‍वर शक्य मी तुला भासे ॥

अविनाशी रुप तुझे दावी मज ईश्‍वरा असें कैसें ॥४॥

श्री भगवानुवाच

पार्था ही ममरुपे हजारो आकृतीच बघ आतां ॥

प्रकार बहू तयांचें अनंत दिव्ये तयांत की बघता ॥५॥

आदित्य रुद्र वसुही अश्‍विनीकुमार मरुत ही सारे ॥

आश्‍चर्ये दुसरी ही भारत कधिही न देखिली त्वां रे ॥६॥

एकत्र आज येथें माझ्या देहीं चराचर बघ तूं ॥

गुडाकेश दुसरें ही जे कांहीं इच्छितोस बघणे तूं ॥७॥

शक्‍य न रुप पहाया हें तूं मम तव अशाच नेत्रांनीं

दिव्य नेत्र यास्तव मी देतों बघ रुप ईश्‍वरी त्यांनी ॥८॥

संजय उवाच

त्या योगेश्‍वर हरिने राजा ऐसे वदून पार्थाला ॥

दावियलें मग अपुलें तें परम ईश्‍वरी रुप तयाला ॥९॥

अनेक मुखरुप-चितें देखावे अद्‌भुत बहुहि तयांत ॥

दिव्य भूषणेंही बहु शस्त्रे दिव्यहि उभारलीं बहुत ॥१०॥

दिव्य वस्त्र पुष्पें धर दिव्य उटि युक्‍त आश्‍चर्ये भरला ॥

सर्वतो मुख अशा त्या देवा अर्जुन पाहता झाला ॥११॥

गगनांत सहस्त्र सूर्य एका कालींच जर उगवतील ॥

साम्यतेस देवांच्या तेजाशीं अंश समच होतील ॥१२॥

देव देव ईशाच्या देहामध्येंच एक वटलेल्या ॥

अर्जुन पाही विश्‍वा नानाविध रुप युक्‍त असलेल्या ॥१३॥

विस्मय फारच वाटे रोमांचें युक्‍त धनंजय झाला ॥

मस्तक लवून देवा हस्ता जोडून बोलता झाला ॥१४॥

अर्जुन उवाच

देवा तव देही या पाहे मी या समस्त अमरांना ॥

सर्वांनाही पाहे इतरास विशेष भूत संघाना ॥१५॥अ

कमलासनींच बैसे ब्रह्मदेव तोहि यांत मज दिसतो ॥

सर्पहि अनेक दिसती नित्य कर्म निष्ठ दिव्य ऋषि गण तो ॥१५॥ब

अनेक उदरे नेत्रहि हस्त मुखेंही अनेक कीं तुजला ॥

पाहे मी या रुपीं देवा सर्वत्र तुज अनंताला ॥१६॥अ

अंत परंतु नच कळे तव आदी मध्यही असे कसला ॥

न कळे हे ही देवा विश्‍वेश्‍वर विश्‍वरुप कीं मजला ॥१६॥ब

सुदर्शन गदा किरीट भूषविती ज्या तव स्वरुपास ॥

तेजःपुंज अशी तुज सर्व दैदीप्य ज्योति युक्‍तास ॥१७॥अ

दुस्तर निरीक्षणाला सर्व दिक्प्रकाश तुज अतर्क्याला ॥

बघतो मी दीप्‍त अग्नि भास्कर सम दिव्य तेज युक्‍ताला ॥१७॥ब

तूं योग्य जाणणेला अविनाशी ब्रह्म जें तेहि तूंच ॥

आधार मुख्य अससी विश्‍वा या सर्व माधवा तूंच ॥१८॥अ

अव्यय तूंच असोनी सनातन धर्महि रक्षिता तूंच ॥

वाटे मज भगवंता सनातन पुरुष तोहि अससि तूंच ॥१८॥ब

आदि मध्य अंत कुठे नसुनी देवा अनंत शक्‍ति तुला ॥

हस्तहि अनंत असुनी नेत्र असति सूर्य चंद्र हे ज्याला ॥१९॥अ

प्रज्वलित अग्नि सम मुख तेज जयाचें तापविते विश्‍वा ॥

वाटे या तवरुपीं बघतों कीं मी अशा तुला देवा ॥१९॥ब

पृथ्वी स्वर्गा मधले अंतर सगळे दिशा तशा दाही ॥

या रुपें देवा तूं व्यापिसी सर्वास एक या देही ॥२०॥अ

पाहून महात्मा हे अद्‌भुत उग्र स्वरुप तव असलें ॥

भीती बहु वाटोनी पाताळ स्वर्ग मृत्यु घाबरलें ॥२०॥ब

देवांचे हे संघहि या तव रुपामधेच कीं शिरती ॥

काहीं तर भीतीनें अंजलि जोडोन तुजशि ते स्तविती ॥२१॥अ

ऋषिगण बहूप्रकारें स्तुति करुनी ते तुला प्रभो स्तविती ॥

कल्याणार्थ जगांच्या म्हणति मुखानें स्तुतीसह स्वस्ती ॥२१॥ब

आदित्य रुद्र वसुही साध्य तैसेच अश्‍विनीकुमर ॥

विश्‍वे देव तसे ते मरुद्‌गणासहित सर्वही पितर ॥२२॥अ

गंधर्व यक्षहि तसे राक्षस तेवीच सिद्ध समुदाय ॥

तव रुपा या बघुनी वाटे सर्वांस फार आश्‍चर्य ॥२२॥ब

महा बाहो मुखें बहू नेत्र अनंत उरु पाय मांडया या ॥

उदरें दाढा भ्याले मजसह जनहि विक्राळ रुपा या ॥२३॥

आकाशाला पोचे तेजस्वी जे अनेक वर्णांनी ॥

उघडे मुख असलेलें रुपयुक्‍त हे अनंत नेत्रांनीं ॥२४॥अ

विष्णो व्याकुळ बघुनी रुपा तव हृदय ममहि बहु होई ॥

धीर धरिना कांहीं तैसें तें शांतिलाहि नच घेई ॥२४॥ब

प्रलय काल अग्नीसम विकराळ दंष्ट्र युक्‍त मुखा बघुनी ॥

जगन्निवास देवेश हो प्रसन्न भुले मी न शांति मनीं ॥२५॥

द्रोण कर्ण भीष्म गुरु धृत राष्ट्र पुत्र नृपाल समुदाय ॥

यांच्यासह अमुचेही असती जे मुख्य ते योधराय ॥२६॥

विकराळ दंत भीतीदायक तव मुखी शिरति बहू वेगें ॥

दंतामध्ये अडली कांहींची दिसती चूर्ण मुख्यांगें ॥२७॥

जलौघ जसे नदीचे वेगानें उदधिचे कडे जाती ॥

प्रज्वलित तव मुखीं या सर्वलोक वीर हे तसे घुसती ॥२८॥

प्रज्वलित अग्नि मधे जातो नाशां पतंग अति वेगें ॥

लोक तसेच तव मुखीं नाशासाठीच जाति हे वेगें ॥२९॥

विष्णो चतुर्दिशांनी प्रज्वलित मुखें ग्रसून विश्‍वास ॥

चाटसि ओठा तुझा प्रकाश तेजें भरीच जगतास ॥३०॥

हो प्रसन्न, देवेशा नमितो तूं उग्र कोणते सांग ॥

प्रवृत्ति तव नच समजे इच्छा कीं जाणणे अंतरंग ॥३१॥

श्री भगवानुवाच

लोकनाश कर्ता मी वृद्धिंगत काळ मी असें जाण ॥

लोकांच्या संहारा झालों मी या स्थळास अवतीर्ण ॥३२॥अ

योद्धे येथें जमले राहे न, तयात एकहि जिवंत ॥

नाकारिशी जरी तूं करणेंचें युद्ध याच समरात ॥३२॥ब

सज्ज होई यासाठीं मिळवी यश येत जे लढाईनें ॥

शत्रू जिंकुनि भोगी समृद्ध राज्यचि मिळेल युद्धानें ॥३३॥

सर्वा या योद्‌ध्याना वधिलें पूर्वींच मी असें जाणे ॥

सव्यसाचि आता तूं यांच्या नाशा निमित्त कीं होणे ॥३३॥ब

द्रोण भीष्म कर्णाला जयद्रथ आदि करुन सर्वही वीर ॥

मी त्या वधिलेंच असे पार्था त्या आप्‍तासह समर कर ॥३४॥अ

या युद्धांत तुला यश येईल हे जाण निश्‍चये करुनी ॥

आप्‍त-वधास्तव कांहीं दुःख करावे मुळी न तूं मनीं ॥३४॥ब

संजय उवाच

केशव सांगे जे तें वचन तयाचेंच सर्व ऐकून ॥

थरकांपतो किरीटी होवोनी अंजलीहि जोडोन ॥३५॥अ

नमस्कार कृष्णाला पुनरपि करुनी सद्‌ग-दीत कंठाने ॥

पूर्ण नम्रपणानें बोले परि ते आतीच भीतीनें ॥३५॥ब

अर्जुन उवाच

तव गुण कीर्तन करिता जगता आनंद होतसे फार ॥

त्यानें तुमचे विषयीं जगताचे प्रेमही बहू थोर ॥३६॥अ

भ्यालेले राक्षसही घेउनि जीवा चहू दिशें पळती ॥

कर्मनिष्ठ असलेले सिद्धांचे संग हे तुला नमती ॥३६॥ब

देवा तूं श्रेष्ठ बहू निर्मियलें तूच रे विरिंचीला ॥

महात्मा संघ मग ते सिद्धांचे ही कसे न नमति तुला ॥३७॥अ

देवांचा देवहि तूं जगन्निवास हि तूं तूंच अनंत ॥

सत्‌ असत्‌ अक्षरहि तूं अससी तूं ब्रह्मश्रेष्ठ सर्वात ॥३७॥ब

आदि देव अससी तूं पुराण पुरुष देव तूं अससी ॥

आश्रय स्थान देवा आहेसच पूर्ण तूच जगतासी ॥३८॥अ

ज्ञाताही ज्ञेयहि तूं देवा जे परमपद देहि ते तूच ॥

अनंत रुपा जग हें तव रुपें व्यापिशी सर्व तूच ॥३८॥ब

वायू यम वरुण चंद्र अससी तूं तेवि तू विघाताही ॥

जातवेद देवातू ब्रह्मदेव जनक तू पितामह ही ॥३९॥अ

प्रणाम मम तव पायीं भगवंता हे सहस्त्र ही राहो ॥

वदणे मज पुनरपि हें नमन तव पदीं सहस्त्र वेळा हो ॥३९॥ब

समोरुन नमन तुला हे पृष्ठभागा कडून तुजसि नमन ॥

हे सर्व नमन तुला बाजूनी सर्व नम्र मन करुन ॥४०॥अ

वीर्य अनंता तुल हे पराक्रमहि देव तव अपार असे ॥

वस्तू-व्यापी यास्तव नांव तुजसी सर्व हेंच योग्य असें ॥४०॥ब

सखा मी तुज समजुनी महिमा ही तव मुळीं न ओळखुनी ॥

संबोधिले तुला मी मित्र कृष्ण यादवादि नावानी ॥४१॥अ

मोठेपण तव देवा अज्ञानानें मुळीं न ओळखलें ॥

ऐसे वर्तन माझें प्रेमानेंही असेल कीं घडलें ॥४१॥ब

थट्टा तव करणेला फिरतां निजतांहि बसत उठतांना ॥

भक्षण पानहि करितां मी तव केले असेल अपमाना ॥४२॥अ

समक्ष किंवा मागें अच्युत घडला असेल अपमान ॥

देवा त्य सर्वांची करी क्षमा दे विनंतिला मान ॥४२॥ब

चराचरहि विश्‍वाचा तूंच पिता पूज्यहि तया तूंच ॥

ज्ञानाला देणारा विश्‍वाचा श्रेष्ठ जो गुरु तूंच ॥४३॥अ

तुलना देवा तुजसी करणेला एकही त्रिलोकात ॥

नाहीं ऐसें असता श्रेष्ठ कसा सापडेल तो त्यांत ॥४३॥ब

याकरिता हे देवा नमस्कार युक्‍त शीर्ष नमवून ॥

समर्थ पूज्य तुला मी विनवी रक्षी मला कृपा करुन ॥४४॥अ

पुत्रापराध सोशीती प्रेमी तसे प्रिय जनांचे ॥

मित्रच मित्राचे तुज सोसणे शक्‍य मदापराधाचे ॥४४॥ब

पूर्वीच पाहिलेल्या रुपा पाहून मोद कीं बहुत ॥

होई परि हे मम मन करितें हें उग्र-रुप कीं व्यथित ॥४५॥अ

यास्तव जगन्निवासा मजला तव पूर्व रुप तें दावी ॥

देवेशा तूं मजवर त्या रीतीनें कृपा तव करावी ॥४५॥ब

चक्र किरीट गदेला धारण कर्त्या तव स्वरुपाला ॥

बघणेची इच्छा ही आतां होई याच मम मनाला ॥४६॥अ

सहस्त्र बाहू आतां घेई तूं त्याच पूर्व रुपाला ॥

दावी तूं त्या रुपा विश्‍वमूर्ते चार हस्त जयाला ॥४६॥ब

श्री भगवानुवाच

प्रसन्न तुजवर होउनि रुपा या अर्जुना तुला मीच ॥

परम श्रेष्ठ असें हें दावियलें शक्‍तिनें हि माझ्याच ॥४७॥अ

सर्वात्मक तेजोमय रुप अनंत आद्य माझे हे ॥

तुजविण पूर्वी कधिही पाहिले मम स्वरुप न कोणी हे ॥४७॥ब

वेधाध्ययनें किंवा यज्ञानें वा तसेंच दानानें ॥

कर्माचरणानें वा उग्र अशाहि तपश्‍चर्येनें ॥४८॥अ

तुजविण इतर न कोणी जगी शक्‍य असे मज पाहायाला ॥

कुरु-प्रवीरा ऐशा रुपा जो मी धरितसे त्याला ॥४८॥ब

गोंधळू नको कांही भीती कसली नको मुळी तुजला ॥

वाटे जी तव मनाला पाहून या मम उग्र रुपाला ॥४९॥अ

सोडी भीती मन तव शांत करी चित्तही तसें अपुलें ॥

ऐसे करुन माझे बघ तूं आता स्वरुप हे पाहिले ॥४९॥ब

संजय उवाच

अर्जुना असें वदुनी त्या समयी त्याच उग्र रुपानें ॥

आपुले रुप पहिले दावियलें त्यास वासुदेवानें ॥५०॥अ

पार्था आश्‍वासन दे घाबरला जो अतीच भीतीनें ॥

सौम्य स्वरुप धरुनी शांतविलें पार्थ मन महात्म्यानें ॥५०॥ब

अर्जुन उवाच

मानुष रुपाला तव जनार्दना सौम्य फार देखोनी ॥

शुद्धीवर मी आलो आली माझ्या तशीच शांति मनीं ॥५१॥

श्री भगवानुवाच

दर्शनास दुर्मिळ जे रुपा तूं पाहिलेस मम ऐशा ॥

ज्याचे दर्शन घेण्या इच्छा वाटे सदैव कीं त्रिदशा ॥५२॥

वेदानें दानानें यज्ञाने वा न तपश्‍चर्येने ॥

शक्यरुप दिसणे ते दिसले तुजसी तशाच रीतीने ॥५३॥

अर्जुन परंतु पाहे रुप मम दिसे अनन्य भक्‍तीने

ज्ञान-प्रवेश दर्शन मम ठायी शक्य मात्र भक्‍तीने ॥५४॥

कर्म करी मज करिता मत्परायणहि असून मम भक्‍ती ॥

अनन्य भावें करुनी सोडी जो सर्वथैव आसक्‍ती ॥५५॥अ

प्राण्यासह वैर नसे ऐसा जो या जगामधे मिरवी ॥

वागे पुरुष असा जो या कृत्यें पांडवा मजसि मिळवी ॥५५॥ब

सारांश

शा.वि.

अध्यात्मा उपदेशिलेंस मजला आतां तुझें इश्‍वरी ॥

रुपा घेइ असे वदे विजय तो होई तसा श्रीहरी ॥

भ्याला पार्थ तया म्हणे प्रभुवरा घे मूळ जे शांत ते ॥

तैसे घे परि तो म्हणे दिसत की भक्‍ती करी त्यास ते ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel