श्री भगवानुवाच

पार्था मन मम ठायी आधारहि धरुनी योगाला ॥

आचरितां केवी मिळशी ऐक निःसंशय पूर्णपणें मजला ॥१॥

शास्त्रीय ज्ञान तसे ब्रह्मज्ञानहि अनुभविक सांगेना ॥

ज्ञातच ती तुज होता समजा याचे जगांत उरले ना ॥२॥

एकदाच सहस्त्री मिळवाया पुरुष सिद्धिला झटतो ॥

सहस्त्र सिद्धात अशा क्वचितचि तत्वता मजसि जाणे तो ॥३॥

माझ्या प्रकृतीमध्ये बुद्धी मन अहंकार ही ताठ ॥

भूमी वायू अग्नी जल गगन असें प्रकार हे आठ ॥४॥

महाबाहु ही कनिष्ट माझी प्रकृती श्रेष्ठ दुजी आहे ॥

जीव भूत ती प्रकृती जी या जगतास सर्वदा वाहे ॥५॥

या दोघा प्रकृती-नी भूते निर्माण सर्वही होती ॥

जग सर्व निर्मितो मी संहारहि मजकडून ती होतीं ॥६॥

श्रेष्ठ मजहून दुजे धनंजय मुळी नसेच या जगती ॥

विश्‍व सर्व मज मध्ये एका सूत्रांत मणि जसे असती ॥७॥

कौंतेय जली रस मी ॐ कार श्रुतींत सूर्य चंद्राची ॥

प्रभा शब्द गगनीचा पौरुषहि पुरुषाचे असे मी ची ॥८॥

पृथ्वीतिल सुगंध मी आग्नीचे तेजही मीच आहे ॥

भूतांचे जीवन मी तापसांचे ही मीच तप आहे ॥९॥

सनातन बीज मजसी भूतांचे पार्थ असें तूं समज ॥

बुद्धिमतांची बुद्धि तेजस्वी जनांचेंच मी तेज ॥१०॥

बल मी बलवानांचे वासना विषयसक्‍ति वगळून ॥

धर्मा न आड येई भारत तो भूत काम मी जाण ॥११॥

सात्त्विक राजस तामस सर्वहि मजपासुनीच हें समज ॥

मजमध्ये सर्वहि ते त्यांमध्यें मी नाहीं हें उमज ॥१२॥

त्रिगुणात्मक वस्तुनी हें सर्वहि विश्‍व मोहिले आहे ॥

कोणी न ओळखी मज अव्यय मी त्रिगुण बाहय आहे हें ॥१३॥

त्रिगुणात्मक मम माया दिव्य अति कठीण ही तरायाला ॥

मजलाच शरण्येती तेचि तरति दुस्तराहि मायेला ॥१४॥

मायेने ज्ञान-नष्ट होऊनि जे बुद्धि आसुरी वरिती ॥

नराधम दुराचारी मूढचि ते मजसि शरण न येती ॥१५॥

अर्जुन भरत श्रेष्ठा पुण्यात्मे भजक चार वर्गाचे ॥

रोगी मोक्षेच्छूही द्रव्येच्छू ज्ञानियाच जातीचे ॥१६॥

सम भावे ज्ञानी जो नित्य भजे मजसि जाण एकाला ॥

श्रेष्ठ तोच मी त्याला, आवडतो तोहि मजसि आवडला ॥१७॥

श्रेष्ठ भक्‍त चार परी ज्ञानी आत्मा असेच मज वाटे ॥

उत्तम गति मी, माझा आश्रय करि चित लावि मम वाटे ॥१८॥

अनंत जन्मा नंतर विश्‍वहि जाणार वासुदेवात ॥

ज्ञानी हे जाणोनी मज मिळे दुर्लभ मीच अत्यंत ॥१९॥

प्रकृती बद्ध होउनि मोह वशहि बहुत वासनानी जे ॥

भजती ईच्छित देवा नियमे प्रेरित वासनांनी जे ॥२०॥

ज्या ज्या उपास्य देवा श्रद्धेनें पूजणेस इच्छी जो ॥

भक्‍ती त्याची करितो दृढ मी त्या देवतेस तोच भजो ॥२१॥

श्रद्धा दृढ होता मग इच्छित देवास तोच अधिक भजे ॥

निर्मी काम्य फले मी देतो मी त्यास इच्छितो तो जे ॥२२॥

नाशवंत फल मिळतें मूढ मज अन्य देव पूजकाना ॥

भजती मजला ऐसे मम भक्‍त मिळविती मज न अन्यांना ॥२३॥

अविनाशी अनुपम ही अव्यक्‍त श्रेष्ठ निर्गुणा मजला ॥

निर्बुद्ध न ओळखुनी म्हणती ते सगुण रुप की मजला ॥२४॥

स्पष्ट मम रुप न दिसे आच्छादित मीच योग मायेंत ॥

अव्यय अनादि मजला यास्तव नाहींत मूर्ख ओळखत ॥२५॥

मी जाणे जीवांना गेले होणार तेवि असणारे ॥

अर्जुना न ओळखतो मजला विश्‍वामधील कोणी रे ॥२६॥

भारत अरि ताप न या गोंधळती भूतमात्र मोहानें ॥

द्वेषेच्छेनें होतीं दुःख सुखें यांत जन्म-तो त्यानें ॥२७॥

पुण्यवान् पुरुषांचीं पापें लय पावती तेच मुक्‍त ॥

दोहोतुन ही होती दृढनिश्‍चयें होति तेच मम भक्‍त ॥२८॥

जरा मरण सुटणेला आश्रय माझा करुन जे झटती ॥

अध्यात्म सत्य ब्रह्मा कर्माचे पूर्ण जाणते होती ॥२९॥

मि अधिभूत अधि दैव अधि यज्ञहि मी असेच जाणति ते ॥

अनन्य चित्तें ऐसें प्राणांतीही आठविती माते ॥३०॥

सारांश

शा.वि.

सृष्टी ही सगळी घडे प्रकृतिनें माझ्याच हे अर्जुना ॥

आकाशांतील शब्द मी रसजलीं सर्वांत मी हें जना ॥

मायाबद्ध अशा न मी कळत जे ज्ञानी मला जाणती ॥

ते तापत्रय जिंकिती सतत जे चित्तीं मला चिंतिती ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel