अर्जुन उवाच

ब्रह्मकाय पुरुषोत्तम अध्यात्महि काय कोणते कर्म ॥

अधिभूतहि अधिदैवहि कैसे हे सांग मजसि तूं मर्म ॥१॥

मधुसूदन कोण कुठें या देहांत अधि यज्ञही वसतो ॥

निग्रही इंद्रिया जो प्राणांती केवि तुजशि ओळखतो ॥२॥

अविनाशी सर्वोत्तम जे आहे ब्रह्म तेंच जाणावें

मूळ भाव वस्तूंचा अध्यात्म हेंच नांव तया द्यावें ॥३॥अ

सृष्टी जो क्रम योजुनि निर्मी सकल चराचर वस्तु गण ॥

क्रम जो ऐसा आहे म्हणती त्यालाच कर्म हे जाण ॥३॥ब

भूतांतिल जो नश्‍वर भाव तया अधि भूत असें नांव ॥

म्हणती ज्या अधि दैवत समजावे त्या वस्तुमधे जीव ॥४॥अ

नरश्रेष्ठी देही या यज्ञांचा अधिपती असा राहे ॥

यासाठीं जाणे तूं अधि यज्ञ नांव मज दिलें आहे ॥४॥ब

प्राणांतासी मजला आठवुनी त्यागि तोच देहाला ॥

निःसंशय तो नंतर पार्था येऊन मिळतसे मजला ॥५॥

कौंतेया आसक्‍ती असते त्याची स्मृतीच प्राणांती ॥

दुसरे जन्मीं यास्तव गति मिळते त्यास जीत आसक्‍ती ॥६॥

नेहमी मजला स्मरुनि युद्ध करी बुद्धि मनहि तूं मजला ॥

अर्पण केले असतां मज मिळशी स्थळ न यांत शंकेला ॥७॥

पार्था अभ्यासानें जो भजे परम पुरुष न अन्याला ॥

मनही जो स्थीर करी तो तो मिळतो त्याच परम ईशाला ॥८॥

ज्ञाता पुराण, नेता, सूक्ष्म अणूहून तेचि जगताला ॥

पावन कर्ता, अचिंत्य तेजाने साम्य जो भास्कराला ॥९॥

अज्ञानां-धाराच्या मर्यादे बाहय जो असे त्यास ॥

श्रेष्ठ स्वरुप ऐसे आहे ज्याचे तयाच दिव्यास ॥१०॥अ

प्राणांती योगानें रोखुनि भुवया मधेच प्राणास ॥

स्थीर मनें भक्‍तीनें स्मरे तोच मिळे त्याच दिव्यास ॥१०॥ब

वेद ज्ञाते अक्षर वदति यति विरक्‍त होऊनी मिळती ॥

ब्रह्मचारी जयाची करुन इच्छा व्रतस्थ राहाती ॥११॥अ

ब्रह्म तेच जाण बहू श्रेष्ठ असे तुज तयास मी पुढती ॥

कथितो ते न सविस्तर वर्णन परि आहे संक्षेप रिती ॥११॥ब

निरोधी इंद्रिय द्वारे स्थीर करी जो मनासही हृदयी ॥

समाधीहि मग लावी प्राणा ठेवोनि मस्तका ठायीं ॥१२॥

ॐ कारे मम चिंतन करीत असतांच सोडितो प्राणा ॥

पुरुष तोच देहांती परम गतीलाच पावतो जाणा ॥१३॥

चित्त न दुसरे ठायीं स्मरे नित्य मजविना न अन्यातें ॥

पार्थांमीं सुलभ असे नित्य तृप्‍त अशा कम योग्यातें ॥१४॥

माझ्या प्राप्‍ती योगे परमसिद्धि महात्मेच मिळवीती ॥

दुःखालय नश्‍वर या पुनर्जन्माला तेन कधी येती ॥१५॥

अर्जुना पुनर्जन्मा ब्रह्म लोकासह सर्वही देती ॥

कौंतेय तया नाहीं पुनर्जन्म जे मज प्रती येती ॥१६॥

चतुर्युग सहस्त्र होती दिवस एक ब्रह्म देवाचा ॥

रात्रीचा तितकाची काल म्हणति तज्ञ अहो रात्रीचा ॥१७॥

अव्यक्‍ता-तुन जन्मति व्यक्‍त वेध्याच्या दिवस उदयाला ॥

त्याच्या रात्री जाती अव्यक्‍तां मधें भक्‍त विलयाला ॥१८॥

पार्था भूतें जन्मा ब्रह्मयाचा दिवस उगवतां येती ॥

तैशीच रात्र होतां विलयाला न इच्छिता जाती ॥१९॥

अव्यक्‍ता पेक्षाही श्रेष्ठ तत्त्व अव्यक्‍त सनातन तें ॥

नाशा न कधी पावें जरि जाती भूत मात्र विलया तें ॥२०॥

अक्षर नांव तयाचे म्हणती परमा गतीच तत्त्वाया ॥

तेथुन कधी न परते जो पोचे श्रेष्ठ मम स्थानाया ॥२१॥

समावेश भूतांचा पार्था होतो सर्व व्यापी तो ॥

भक्‍तीविण इतरानें पुरुष श्रेष्ठ न कदापि ही मिळतो ॥२२॥

ज्या कालि देहाला योग्यानें टाकितां न परत येतो ॥

किंवा परते तोही भरतर्षभ काल मी तुला कथितो ॥२३॥

अग्नि जोत सितपक्षी दिवसास उदगयनांत षण्मासी ॥

ब्रह्मज्ञचि जाणारे पावतीच जन श्रेष्ठ ब्रह्मासी ॥२४॥

धूमी रात्री कृष्णे पक्षे दक्षिणायनी षण्मासी ॥

जाऊनी चंद्र लोकी योगीही येति मृत्यु लोकासी ॥२५॥

शुक्ल कृष्ण दोन असेअ जगताचे भाग जाण शाश्‍वतचे ॥

पहिला परत न सोडी अनुगामी परत येति दुसर्‍याचे ॥२६॥

मोहा न कधी पावे ज्ञाता योगीच दोन मार्गाचा ॥

यास्तव आश्रय घेई हे अर्जुन सतत कर्म योगाचा ॥२७॥

जाणोनी सर्वहि हें योगी बाजूस ठेवि वेदाचे ॥

दानाचें फल तैसे तप फल तैसेच जाण यज्ञाचे ॥२८॥अ

श्रेष्ठ असें सर्वाहूनि पुण्याला त्याच आश्रया करितो ॥

त्या योगानें योगी जें श्रेष्ठ आद्य स्थान पावे तो ॥२८॥ब

सारांश

जे माते भजनी मनें स्थिर अशा दूजा न जे चिंतिती ॥

त्यांना मी मम लोक देत असतो प्राणा जधी सोडिती ॥

पार्था यास्तव भक्‍ति युक्‍त असुनी घ्यावे मलाच सर्वदा ॥

मद्रूपी मिळशील तूं मग असा येशी न जन्मा कदा ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel