अर्जुन उवाच

श्रद्धेने तुज भजती अज्ञाने शास्त्र विधिस सोडून ॥

ती भक्‍ति कोण कृष्णा सात्विक राजस तामस या मधुन ॥१॥

श्री भगवानुवाच

सात्विक राजस तामस श्रद्धा त्रिविधा मनास असतात ॥

स्वाभाविक जी त्यांची ऐके तू लक्षणे आदरे कांत ॥२॥

स्वभावास श्रद्धा स्वभाव भारत कसा तरी असतो ॥

श्रद्धा मय पुरुष असे श्रद्धा जैसी तसाच तो बनतो ॥३॥

देवा सात्विक भजती राजस ते यक्ष राक्षसा भजती ॥

प्रेत भूत गण पूजा तामसी इतर सर्व मनुज करिती ॥४॥

अहंकार दंभ काम आसक्‍ति बल या आश्रया घेती ॥

ऐसे पुरुष जगी या अशास्त्र असेच घोर तप तपती ॥५॥

शरीरस्थ इंद्रियाना अंतस्थ मजही त्रास ते देती ॥

ऐसे जन समजावे अविचारी आसुरीच की असती ॥६॥

आहार त्रिविध तैसे यज्ञ दान तपहि तीन जातीचे ॥

असती जगामधे या ऐके आता प्रकार जे त्यांचे ॥७॥

वृद्धी चित्त स्थैर्या प्रीती आरोग्य बल सुखा तैसे ॥

आयुष्याला देई जे स्निग्ध मनास तोष दाई असे ॥८॥अ

रसाळ स्थिर ऐशी अन्ने जी या जगामधे असती ॥

तीच नित्य आहारा सात्विक लोकास फार आवडती ॥८॥ब

आंबट खारट तिखटच अती उष्ण जळजळीत आहार ॥

सेवन रुक्ष जयांचे करिती देहास दाह जे फार ॥९॥अ

राजस वृत्तीचे जे त्यांना आहार हेच आवडती ॥

सेवन त्यांचे करिता दुःख शोक रोग हेच उद्‌भवती ॥९॥ब

प्रहर एक झालेले रसहीन शिळे तसेच उच्छिष्ट ॥

अन्न जे घाणेरडे तामस वृत्तीस अन्न ते इष्ट ॥१०॥

कर्तव्य कर्म समजुनि फल इच्छा रहित यज्ञ जे करिती ॥

ऐशाच्या त्या यज्ञा सात्विक ऐसेच नाव की देती ॥११॥

फलेच्छा मनी धरुनी भारत दंभार्थ यज्ञ जे यजिती ॥

ऐशांच्या यज्ञाला राजसी यज्ञ समज असे म्हणती ॥१२॥

शास्त्राज्ञा ज्यास नसे अन्न दान मंत्र दक्षिणा नाही ॥

तामसी नाव यज्ञाला श्रद्धा ज्या यजनात मुळी नाही ॥१३॥

देव ब्राह्मण गुरुजन विद्वत्पूजन शौच सरळही वृत्ती ॥

शरीर तप नाव तया ज्यात अहिंसा ब्रह्मचर्य असती ॥१४॥

उद्वेग कोणा न करी हितकारक प्रिय सत्य भाषण जे ॥

धर्मग्रंथ अध्ययन तप ते हे समज वाङमयाचे जें ॥१५॥

प्रसन्न मन मित भाषा शांति तसे संयमन मनाचे ॥

शुद्धि मनाची असणे लक्षणे ज्यात तेच तप मनाचे ॥१६॥

सोडून फलेच्छेला श्रद्धेने तप त्रिविध योगाने ॥

सात्त्विक तप नाव तया आचरिता या तपास पुरुषाने ॥१७॥

सत्कार मान पूजा यास्तव दंभे जयास आचरती ॥

क्षणिक निश्‍चये ते राजस तप हे तया तपा म्हणती ॥१८॥

मूढ ग्रहे स्वदेहा देती पीडा परार्थ नाशा या ॥

तपाचरण ऐसे जे शास्त्रात नाव तामसी तप या ॥१९॥

कर्तव्यास्तव करिती दाना उपकार भावना नाही ॥

स्थल योग्य काल पात्री संज्ञा दाना अशाच सात्विक ही ॥२०॥

उपकार फेड हेतू धरुन किंवा मनी फलेच्छेने ॥

ऐशा त्या दानाना ओळखती राजसीच नावाने ॥२१॥

सत्कार योग्य नसता अस्थानी अपात्रास जे दान ॥

अकाली दिले असता संज्ञा ऐशास तामसी म्हणून ॥२२॥

ॐ तत् सत् तीहीनी ब्रह्माच्या मूळ वर्णना केले ॥

त्यांच्या द्वारें ब्राह्मण यज्ञ वेद सर्व निर्मिले गेले ॥२३॥

ब्रह्मज्ञ पुरुष यास्तव आरंभ यज्ञदान तपादींचा ॥

विधियुक्‍त असा करिती प्रथम उच्चार या ॐ मंत्राचा ॥२४॥

मोक्षेच्छू तत् मंत्रे यज्ञ तपाच्या तशाच दानाच्या ॥

अनेक क्रिया करिती कासे न लागता फलेच्छेच्या ॥२५॥

सत्यत्वा साधुत्वासाठी सत्‌ शब्द योजना करिती ॥

सत्कर्मे ही पार्था सत् शब्दानें दर्शविली जाती ॥२६॥

यज्ञदान तपामधे तत्परता दर्शवितो शब्द सत् ॥

कर्मे तत्संबंधी दर्शविणे स्तव तोच योजितात ॥२७॥

हवन दान तप न कर्म अश्रद्धेने पार्थ जगी घडते ॥

असत्कर्म उपयोगी इहपर लोकीं मुळीं न ते होते ॥२८॥

सारांश

शा.वि.

शास्त्राज्ञा त्यजुनि मनी धरुनिया जे भावनेला सदा ॥

पूजेला करिती असा स्तव कथी कोण्या गुणाचा तदा ॥

यज्ञा दान तपादिकात असती अन्नात ही गुण ते ॥

ॐ मंत्रे सुरुवात कर्म कर तू मानी सदा शास्त्र ते ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel