"सकाळीं उठुनी - तोंड पाहिलं एकीचं !

- दारीं तुळशी सखीचं ! !"

*

"सकाळीं उठुनी - मला एक लाभ झाला !

तुळशीपुढं करंडा - कुंकवाचा सांपडला ! !"

*

"पहिली माझी ओवी - आईला गाईइली

बया माझी गवळण - तुळस र्‍हाइईली !

पहिली माझी ववी - मायबापाला गाती एक !

- गिरजा शंकराची लेक !"

*

"बापाजी माजा वडु - तीची पारुंची ठायीं ठायीं

- येल इस्तार बयाबाई

बापाजी मजा वडु - गेली पारुंबी बाऊ बाऊ

बयाच्या कुसव्याचा - झाला विस्तार गांवु गांवू !"

*

"बापाजी माझा वडु - वडाच्म पान रुंदु

- गार सांवली करवंदु !

"बापाजी माझा वडु - उभी वडाला टेकुइनी

- गार सांवली देकुइनी !"

*

"बापाजी माझा वडु - बया माझी गोंदाईन ।

काशीला गेली वाटु - दोन झाडांच्या मदईनं !"

*

"उभ्या मी गल्लीं जातें - पदराखालीं हातु,

बयाच्या कुसव्याची - लंकला गेली मातु !

उभ्या मी गल्लीं जातें - पदर डाव्या मुठीं

पित्या नानाला म्हनित्याती - कुन्या अशिलाची बेटी !

माजी जात कुळ - काई पुसशील वेडया नांव,

पित्या दौलत नाना माजा - सार्‍या जवारीला ठावं !

उभ्या मी गल्लीं जातें - खालीं बघून माजी चाली

पित्या माज्या दौलताला - सारी सभा नांवजली !

माजी जातकुळ - काय पुससी सांदिईचा

पित्या माज्या दालताचा - वाजे रुपया चांदिईचा !"

*

"उभ्या मी गल्लीं जातें - दंडभुजा झांकुइनी

भरील्या सबमंदीं - नांव पित्याचं राकुइनी !

उभ्या मी गल्लीं जातें - खडा हालंना भुईइचा

चावडी म्होरं सभा बोलं - योल शिताळ जाईइचा !

उभ्या मी गल्लीं जातें - खालीं बगुनी माजी चाली

भरील्या सबमंदी - माज्या काशीला नांवजली !

उभ्या मी गल्लीं जातें - माजी हालईना पापईनी,

- घरीं वाघाची जाचईनी !

उभ्या मी गल्लीं जातें - कोण काडिल माजं नांवू

माजं ती बाळराज - वागासारिक ऽ उमरावू !"

*

दुबळं माजं पनु - न्हाई दुबळी माजी काया

बापाजी बयाबाई - चुनगती माजा पाया !

दुबळं माजं पनु - न्हाई दुबळं माजं तोंड

बापाजी बयाबाई - चुनगती माजा पिंड !

*

शिजीच्या घरला गेलें - सहज मी बसायला

शिजी मागार्‍या बोलती - आली आसल उसन्याला !

शिजीचा शेजायारु - माजं आरदं म्हाइयारू,

शिजीच्या परवरु - हुबा र्‍हाऊंया खिनभरु !

चांगलं माजं पनु - जिववु माजी माता

बया गवळणी सारईक्‍या - धुरा जूडिल्या जातांजातां !

*

शीजी तूं आईबाई - उसनी द्यावी सूजी

- बाळ पावनी आली माजी !

शीजी तूं आईबाई - उसना द्यावा गुळू

- माज्या भैनाच्म आलं बाळू !

*

शीजी पशी गुजु - उपनिलें वारं

- माजं गुजाचं घर न्यारं ! -

*

शीजीचं उसईनं - आडसिरी पायइली

बयाच्या उसन्याची - याद कुणाला र्‍हाईइली !

शीजीचं उसईनं - तिच्या हुंबर्‍या पसईनं !

बयाचं उसईनं - माज्या जलमा पसईनं !

शीजीचं उसईनं - बाई मी फीडीन भाजीपाल्या

बयाचं उसईनं - मला फिटंना काशी गेल्या !

शीजीच्या उसन्याची - तिची जरुर वर्दी झाली

माज्या बयाच्या उसन्याची - तिची रिकामी वाटी दिली !

*

आठ धाइ धारा - पेलें मी कुण्यारंगं

बया माज्या द्वारकानं - केला मांडीचा चबरंग !

आठ ग धाई धारा - पेलें मी बसुइनी

- मांडीवर बयाच्या बसुईनी !

लेकीच्या आईईला - लेकी वाचुन गमईना

सारीवल्या भिंती - वर काडिल्या कामिईना !

*

शिंपिनी शीव चोळी - टाक उगच शिवदोरा

बाळ जातिया सासर्‍याला - जीव झालाया वाराहुरा !

सासर्‍याला जाते - धरनी मारिलया म्याटू

- बंधु मुराळी देतें उटू !

म्हायागरीची वाट - न्हाई लावित बगायाला

- बाळ धाडिती आणायाला !

बिन मुराळ्या वांचुईनी - बाळ उतरीना पायईरी

तानिबाईला किती सांगूं - चुलता सजतो भाइईरी !

*

सांगुन धाडीइती - यीनी मनाला दोन गोष्‍टी

- बाळ खेळुन माझी हुती !

सांगुन धाडिइती - यीनी माज्या ग सारजला

- माज्या संबाळ गिरजला !

सासुर एवडा वासु - नकु करुंस सासुबाई

- बाळ आनेवा जोगी न्हाई !

सासुर एवडा वासु - नकु करुंस सासईव

माज्या त्या बाळईच्या - डोळ्या भरलीं आसईवं !

*

नवास एवडं केलं - लेकी वालुच्या केसाईला

- दिस येरळ सासुईला ।

लेकाचं नवायासु - लेकी वालुला सारिल्यात

सिंगाळ बकईरं - तिच्या जावळा मारिल्यात !"

*

म्हायाराची वाटु - इसरली गोरी

तानीबाईच्या माज्या - हातीं पाळण्याची दोरी !

*

पांच ग उतरंडी - परुपरीचीं झांकईनीं

माजी ती तानीबाई - जावानंदांत देकईनी !

पांची ग उतरंडी - त्या का गेल्यात्या गंगनाला

माज्या त्या बाळईला - चौगी सुना चांगुणाला !---

*

सासू सुंदरीचा तिचा कुसवा वेलीं गेला

माजी तूं बाळाबाई हायत्या धाकल्या जावा तुला !

सासुसासईरा देवार्‍यावैल द्यावु

माजी तूं बाळाबाई तुमी जोडीनं फुलं वावुं

सासु सासईरा सोनियाचीं फुलं

त्येंच्या उजिडानं तुजीं वागत्यालीं मुलं !

जोडव्याचा पाय हळुं टाकावा गरतीबाई

सोप्यां बसले दादाभाई !

*

थोरला माजा दीर - म्हनीतु मुलीबाई,

- बसा चौरंगी धुते पाई !

थोरल्या जावईला - मी का म्हनीती बाई बाई,

- तुमच्या वडिलपनापाई !

*

जातं मी वडीइती - नखां बोटांच्या आगयारीं

काशीचं पेलें दूध - जशा मधाच्या घागइरी !

जातं मी वडीतांना - चोळी भिजून पदर वला

काशीचं प्याले दूध - आकरी दुधाला कढ आला !

जातं की वडीतांना - सोडी बाह्या ह्या मोकळ्या

- पडं पिटाच्या डिकइळ्या !

*

लाडक्या लेकीईचं - तिचं गांवांत सासईरं

आंदान दिल्या गाई - वाडया येत्याती वासईरं !

*

मायबापांची आशा थ्वारु - भावाची भय पुरीं

- भाच्या बाळाचीं लंका दुरीं !

बापाजीं म्हणइतु - लेकी नांदुनीं कर नांवु

तुझ्या घरला येऊं जाऊं - तुझ्या रांजनी पानी पिऊं !

समरत सोईइरा - बाई करनीसाठीं केला

माज्या तूं बंधुराया - सोयर्‍या येईना तुज्या तोला !

समरत सोईइरा - जसा भिंतीवईला चुना

उमराव माजा बंधु - खांब हवेलीचा जुना !

*

भूक लागली माज्या पोटा - येडी झालीस माज्या भुकंऽ

ह्या ग गांवांत न्हाई सखी - ती का र्‍हाइली दूरल्या लंकं ऽ !

भूक लागली माज्या पोटा - बाई मी निर्‍या देतें गांठी

- पित्या नानाच्या नांवासाठीं !

*

आगिणीच्या पुढं जळतं वलंचलं

माईबापावांचुनी कोण म्हणील काम केलं ?

*

खंडीभर गोत - वाया येरतीचा पाला

अंतःकरान भेटइलं - मनींचा शिणु गेला !

खंडीभर गोत - आळा पेंडीला बसईना

अंतःकरनावांचुइनी - अंतःकरान दिसईना !

खंडीभर गोत - माळावईलं गवायात

माजी ती बयाबाई - गार हराळी लवनांत !

अंतरींचं गुजु - बांध शेल्याच्या पदरांतु

माज्या तूं बाळराया - सोड बयाच्या हुरद्यांतु !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ओवी गीते : ऋणानुबंध


कविता संग्रह : संजय सावळे 4
माझी कविता
कविता संग्रह : संजय सावळे
कविता संग्रह
देवी आरती संग्रह
महाराष्ट्राचे शिल्पकार
काव्य रचना
ओवी गीते : स्त्रीजीवन
ओवी गीते : इतर
मनाचे पान
श्री..ची..कविता..
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : समाजदर्शन