१७६

लेन्यालुगड्याची नार, सोड तालमीचं दार

बंधुजी चातुराला नवती झाली फार

१७७

मोठमोठं डोळं जसं बागेतलं लिंबू

बंधुला देखून कुन्या नारीनं दिला तंबू

१७८

नवतीची नार माझ्या दारावरन्म येती जाती

बंधु गावा गेलेला सांगू किती ?

१७९

शहरामंदी शहर, सातारा लवणी

साततळाच्या माडीची पडे बंधूला मोहनी

१८०

घोड्यावरचा स्वार उन्हानं आला जार,

बंधु आल्यागेला पुसतो, कुन्या पेठेला मोहना नार

१८१

पान्याला जाते नार इकडे कोणीकडे

ताईत बंधु माझं, चाफाचंदन दोन्हीकडे

१८२

काळी कळवतीण, नाचती परकारानं

खुबी केलीया बंधुजी सावकारानं

१८३

काळी कळवतीण, काय नाचणी झाली सुरू

माझ्या बंधुजीला मागते मोतीचुरू

१८४

नदीच्या पलीकडे अष्टीधोतर वाळत्यात

बंधुजी शिकार खेळत्यात

१८५

नदीपलीकडे वाळू उडती चटापटा ।

हौशा बंधु माझा हलगी लावुन खेळे पट्टा ॥

१८६

पाची उतरंडी पैलवानाचं खोबरं

माझ्या बंधुजीनं कुस्ती नेमिली जबर

१८७

गावीच्या माळावर कशाची धूळमाती

नटवा बंधुजी कुस्ती खेळून आला राती

१८८

माझ्या वाड्यावरनं पैलवानची जोडी गेली

ताईत बंधुजीनी नई तालीम कुठं केली

१८९

कुस्तीच्या फडावरी शिंग वाजे घाईघाई

पैलवानाला गडी न्हाई

१९०

आकडी दुधाचा तांब्या ठेवला आडभिंती

पैलवानाच्या मिनत्या किती

१९१

सकाळच्या पारी आकडी दुधाचा करते खवा

बंधुजीची कुस्ती नेमली परगावा

१९२

बंधुजी पाव्हना त्याच्या छत्रीला लाल पाती

बंधुजीला माझ्या तालीम सोभा देती

१९३

भरल्या बाजारांत भरणी आलीया बटव्याची

हौशा बंधुजीची सासु बोलावा नटव्याची

१९४

भरल्या बाजारांत भरणी आलीया चुनाळाची

हौशा बंधुजीची सासू बोलावा हिलाळाची

१९५

अंगड्या टोपड्याची भरणी आलीया तळेगावी

ताईत बंधुजी बाजाराला येई

१९६

भरला बाजार मला द्याया घ्यायाचं न्हाई काई

जाते बंधुच्या भेटीपाई

१९७

लुगडं घेतलं निरी पडते हजार

केला बंधुजीनं बाजार

१९८

भरला बाजार किती पाहुं दाटणीचा

माझ्या बंधुजीचा काच्या तो पैठणीचा

१९९

भरला बाजार भरून सारा रिता

ताईत बंधुजी, वाणी भरणीचा आला नव्हता

२००

भरल्या बाजारात किती पाहु नटव्याला

ताईत बंधुजीच्या गोंडं रेशमी बटव्याला

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel