दारुड्यांच्या मेळाव्यात सारेच दारुच्या धुंदीत असतात. पण त्यांतला एखादा दारु न प्यालेला असला तर बाकीचे दारुडे त्याला ‘ हा शुध्दीवर नाही ’ असे म्हणत असतात. वास्तविक तोच एकटा शुध्दीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात. त्याप्रमाणे, आपण सर्वजण विषयात दंग असल्याकारणाने, जो नामात असतो त्याला आपण ‘ हा शुध्दीवर नाही ’ असे म्हणत असतो. वास्तविक पाहता, ‘ नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही ’ अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुध्दीवर असतो, आपण मात्र भ्रमात असतो. आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत. एक सद्विचार, दुसरा सत्संगती, आणि तिसरा नामस्मरण. भगवंताचा विचार हाच खरा सदविचार. एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये, तर त्याला येता येणार नाही, कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव हे असणारच; त्याचप्रमाणे नाम, संत, आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत, त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच. वासरु घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्यापमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच. आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत, मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का, असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल, तर त्याचे उत्तर सोपे आहे. असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे ‘ रामनाम. ’ हे यंत्र सर्वांना मिळू शकते, सर्वांना वापरता येते, शिवाय ते कधीच गंजत नाही.

भक्त, भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरुपच आहेत. जिथे नाम आहे तिथे भक्त आहे, आणि तिथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वांत श्रेष्ठ आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या. नाल्यातून, गटारातून पाणी वाहते, ते किती घाण असते ! पण ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते. सागर त्या सर्वांना सागररुप करुन टाकतो. तसे मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असू द्या, त्याने नाम-नदीची कास धरली की तो रामसागरुप झालाच म्हणुन समजा. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. अनाथ शब्द नाथावाचून नाही, आणि नाथाला अनाथावाचून नाथत्व नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात आपण राहू या. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दु:खे कस्पटाप्रमाणे वाटतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel