नामस्मरणरुपी शेतास उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणार्‍या कुंपणासारखे आहे. म्हणून त्याचे महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, शुध्द अंत:करण. शुध्द अंत:करण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी, वगैरे काढून ती साफ करावी; म्हणजेच, अंत:करणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, वगैरे ठेवू नये. शुध्द अंत:करणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे; म्हणजे, नाम सकाम नसावे. उत्तम बी म्हणजे ‘ नामाकरिताच नाम ’ हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी, यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवतकृपा होय. भगवतकृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते; परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो.

नामस्मरणरुपी शेताचे एक वैशिष्ट आहे. ते हे की, त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे. म्हणून हे शेत भगवतकृपारुपी पाऊस खेचून घेऊन स्वत:वर पाडते, त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की, दोन शेतकरी आहेत; एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा, ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसर्‍याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार, त्याचा एकाला फायदा मिळेल; तो दुसर्‍याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच नियम परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुध्दी केली असेल, त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसर्‍याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत नि:पक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वत: करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरुन दिसते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel