तुम्ही सर्व भाविकजन । ऐकावे माझे वचन ॥ माझे भेटी सदा राहावे । मुखाने रामनाम घ्यावे ॥ जो नामात राहिला । तो अखंड माझ्या दर्शनात बसला ॥ जेथे नामाचे स्मरण । ते माझे वसतिस्थान ॥ जेथे रामाचे नाव । तेथे माझा ठाव । हे आणून चित्ती । सुखे राहावे प्रपंचाप्रति ॥ नामात ठेवा मन । हेच माझे खरे दर्शन ॥ नेहमी रामाचा ध्यास । हाच माझा सहवास ॥ तुम्ही सुज्ञ माझे प्राण । नाम करा तेवढे जतन ॥ नामात ठेवावे प्रेम । तेथे माझी वसति जाण ॥ ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे । त्याने नाम कधी न सोडावे वाचे ॥ एवढे देईल जो नामदान । त्याला अर्पण करुन घेईन जाण ॥ जेथे नाम । तेथे माझे धाम ॥ नामापरते न मानी सुख । तेथेच माझे राहणे देख ॥ तुम्ही शक्य तितके राहावे नामात । हेच माझे सांगणे तुम्हांस ॥ शक्य तो नामस्मरण करावे । म्हणजे मी तुमचेजवळ अखंड आहे असे समजावे ॥ जेथे परमात्म्याचे नाव । तेथे माझा आहे ठाव ॥ जेथे नाम तेथेच मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥

नाही केले वेदपठण । शास्त्राचे नाही झाले ज्ञान । श्रुतिस्मृति उपनिषदे यांची नाही ओळखण । असा मी अज्ञान जाण ॥ तरी एक भजावे रघुनाथासी । अर्पण होऊन जावे त्यासी । ऐसे जाणून चित्ती । खंड नाही समाधानवृत्ति ॥ मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार । न सोडावा आता धीर ॥ ठेवावा एक विश्वास । मी आहे तुम्हाजवळ खास ॥ श्रीदासबोध नामस्मरण । याचे असावे वाचन । मी त्यातच मानावे जाण । कृपा करील रघुनंदन ॥ मी तेथे आहे हे नक्की समजावे । राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे ॥ उपाधिरहित मी तुमचेजवळ सतत आहे ॥ मी नाही अशी कल्पना करु नये । तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे ॥ मी नाही सोडून गेलो कोणाला दूर । माझी वसति तुमच्या शेजारी जाण ॥ माझे येणे जाणे तुमचे हाती । तुम्हा सर्वांहून नाही परती ॥ रामापरता मी । जैसा प्राणापरता देह जाण ॥ सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥ त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥ जे जे करणे आणिले मनी । रामकृपे पावलो जनी ॥ आता पाहा मला रामात । आनंद मानावा नामात ॥ सर्वांनी राखावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥ माझे ऐकावे सर्वांनी । सदा राहावे समाधानी ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari