आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे ’ आहे ते असू द्याच, आणि आणखीही मिळू द्या.’ असे वाट्णे. आपण सध्या या स्थितीत आहोत. पण सुरूवात म्हणून आपण असे म्हणावे की, " आहे ते असू द्या, आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागू या." म्हणजे, मिळाले तर ’भगवंताने दिले’, आणि न मिळाले तर ’त्याची इच्छा नाही’, अशी जाणीव होऊन ’ दाता परमात्मा आहे ’ ही भावना वाढू लागेल; आहे तेही त्याच्या इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल; आणि आसक्ती कमी होऊ लागली की ’ हवे - नको ’ कमी होऊन वासना ओसरू लागेल. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे; त्याली शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. याकरिता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल. एखाद्या बैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल, पणेखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकदे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल.

शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहाणे; याचाच अर्थ, आपण उपाधिरहित बनणे. तर मग आपण अशाच साधनाची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहीत आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम. काळ, वेळ, परिस्थिती, उच्चनीच भाव, स्त्री-पुरूष, विद्वत्ता-अडाणीपणा, श्रीमंती-गरिबी, प्रकृतीची सुस्थिती-दुःस्थिती, वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसेच, त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत. ते हृदयात सतत बाळगता येते. नामात वैराग्याचे कष्ट नाहीत, आणि कुठेही, केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयाची तदाकारवृत्ती सोडली पाहिजे. ’ भगवंत माझ्या मागे आहे ’ अशी श्रद्धा राखली की विषयाशी तदाकार होत नाही. मारूतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली, त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.

भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली. अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार ? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही; आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही. वसना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे, आणि हे मरण डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel