नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो ; त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे . परमेश्वराचे स्वरुप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरुर आहे . संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे . संतांजवळ निर्विषय चित्त असते . रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात . तसे साधुसंत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात . आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ति तपासतात . एका बाईला मूल झाले . पण त्याला आकडी येऊ लागली ते पाळण्यात उगीच निपचित पडून असायचे . ते मूल बरोबर वाढेना , चांगले हसेना , खेळेना . मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे . अगदी तसेच संतांना वाटते . शिष्य केला खरा , पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते ; शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वत : च्या प्रेमापोटीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील . संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही . त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक त्यांना नावे ठेवतात . संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरिता सांगितले नसून , त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही . त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत .

संतांजवळ राहणार्‍या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात . त्यांपैकी तोटे असे की , एक , वेदान्त बोलायला तेवढा उत्तम येतो ; दोन , संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो ; आणि तीन , ‘ ते , म्हणजे संत , सर्व पाहून घेतील ’ या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो . आता फायदे पाहू . पहिला म्हणजे , तो जर खर्‍या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच , काही साधन न करतासुध्दा , त्याचा परमार्थ साधेल ; दुसरा , त्याला मान मिळेल , पण तो स्वत : मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील ; आणि तिसरा , वेदान्त त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल . म्हणून संतांजवळ राहणार्‍याने ते सांगतील तसे वागावे , मानाची अपेक्षा करु नये आणि फारसा वेदान्त बोलू नये . तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे . संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचीती येण्याचे साधन आहे . व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात , हे ओळखून आपण त्यांची संगत करावी . तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही , त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel