श्रीगणेशाय नमः
जयजयाजी वैकुंठाधीशा ॥ अलक्ष अगोचरा आदिपुरुषा ॥ पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा ॥ सनातना आदिमूर्ते ॥१॥
ऐसा स्वामी पंढरीअधीश ॥ बैसूनि मालूचे कवित्वपृष्ठीस ॥ भक्तिसारसुधारस ॥ निर्माण केला ग्रंथासी ॥२॥
तरी मागिले अध्यायीं कथन ॥ आनिफा पातला हेळापट्टण ॥ गोपीचंदाची भेटी घेऊन ॥ मैनावतीसी भेटला ॥३॥
तरी सिंहावलोकनीं तत्त्वतां ॥ मैनावती भेटूनि नाथा ॥ सकळ वृत्तांत सांगूनि सुता ॥ समाधानीं मिरविलें ॥४॥
असो गोपीचंद दुसरे दिनीं ॥ नाथाग्रहें शिबिरीं जाऊनि ॥ मौळी ठेवूनि नाथाचे चरणीं ॥ उभा राहिला सन्मुख ॥५॥
कानिफा पाहूनि राव दृष्टीं ॥ बोलता झाला स्ववाग्वटी ॥ श्रीजालिंदर महीपोटी ॥ कोठे घातला तो सांग पां ॥६॥
येरु म्हणे महाराजा ॥ ठाव दावितो चला ओजा ॥ तेव्हां म्हणे शिष्य माझा ॥ घेऊनि जावें सांगाती ॥७॥
ऐसी कानिफा बोलतां मात ॥ अवश्य म्हणे नृपनाथ ॥ मग सच्छिष्य घेऊनि सांगात ॥ तया ठायीं पातला ॥८॥
ठाव दाखवूनि सच्छिष्यासी ॥ पुन्हां आले शिबिरासी ॥ शिष्य म्हणती त्या ठायासी ॥ पाहूनि आलों महाराजा ॥९॥
मग रायासी म्हणे कानिफानाथ ॥ जालिंदर काढाया कोणती रीत ॥ येरु म्हणे तुम्ही समर्थ ॥ सकळ जाणते सर्वस्वीं ॥१०॥
बाळें आग्रहें करुं जाती ॥ परी तयांचा निर्णय कैशा रीतीं ॥ करावा हें तों नेणती निश्वतीं ॥ सर्व संगोपी माता ती ॥११॥
तेवीं माता पिता गुरु ॥ त्राता मारिता सर्वपारु ॥ तरी कैसे रीती हा विचारु ॥ आव्हानिजे महाराजा ॥१२॥
ऐसें बोलतां नृपनाथ ॥ मग बोलतां झाला गजकर्णसुत ॥ तुझे रक्षावया जीवित ॥ विचार माझा ऐकिजे ॥१३॥
कनक रौप्य ताम्रवर्ण ॥ पितळ लोहधातु पूर्ण ॥ पांच पुतळे करुनि आण ॥ तुजसमान हे राया ॥१४॥
ऐसी आज्ञा करितांचि नाथ ॥ प्रेरिले रायें ग्रामांत दूत ॥ हेमकार लोहकारासहित ॥ ताम्रकारका आणिलें ॥१५॥
जे परम कुशल अति निगुती ॥ लक्षूनि सोडिले हेराप्रती ॥ धातु ओपूनि तयांचे हातीं ॥ पुतळ्यांतें योजिलें ॥१६॥
मग ते आपुले धीकोटी ॥ पुतळे रचिती मेणावरती ॥ नाथालागीं दावूनि दृष्टी ॥ रसयंत्रीं ओतिले ॥१७॥
पाहोनि दिन अति सुदिन ॥ मग नृपासह पुतळे घेवोन ॥ पाहता झाला गुरुस्थान ॥ विशाळबुद्धी कानिफा ॥१८॥
गरतीकांठीं आपण बैसोन ॥ पुतळा ठेवोनि हेमवर्ण ॥ राजाहातीं कुदळ देवोन ॥ घाव घालीं म्हणतसे ॥१९॥
घाव घालितां परी लगबगां ॥ पुसतां स्वामी नांव सांगा ॥ सांगितल्यावरी अति वेगा ॥ गरतीबाहेर निघे कीं ॥२०॥
ऐसें सांगोनि प्रथम रायातें ॥ मग कुदळी दिधली हातातें ॥ उपरी चिरंजीवप्रयोगातें ॥ भाळीं चर्चिली विभूती ॥२१॥
पुतळा ठेवोनि मध्यगरतीं ॥ मागें उभा राहिला नृपती ॥ लवकर घाव घाली क्षितीं ॥ आंतूनि पुसे महाराज ॥२२॥
कोणी येवोनि घालिती घाव ॥ वेगीं वदे कां तयाचें नांव ॥ नृप म्हणे मी राणीव ॥ गोपीचंद असें कीं ॥२३॥
रायें सांगतांचि नाम ॥ निघाला होता गरतींतून ॥ श्रीजालिंदराचें शापवचन ॥ कणकप्रतिमे झगटले ॥२४॥
तीव्रशाप वैश्वानर ॥ व्यापिलें कनकपुतळ्याचें शरीर ॥ क्षण न लागतां महीवर ॥ भस्म होवोनि पडियेलें ॥२५॥
भस्म होतां कनकप्रतिमा ॥ दुसरा ठेविला उगमा ॥ तयाही मागें नरेंद्रोत्तमा ॥ पुन्हां गरतीं स्थापिलें ॥२६॥
रौप्यवर्णी पुतळ्यामागें ॥ राव उभा केला वेगें ॥ पुन्हा विचारिलें सिद्धियोगें ॥ कोण आहेस म्हणवोनि ॥२७॥
पुन्हां सांगे नृप नांव ॥ गरतीबाहेर वेगीं धांव ॥ जालिंदरशापगौरव ॥ जळ जळ खाक होवो कीं ॥२८॥
ऐसें वदतां शापोत्तर ॥ पुतळा पेटला वैश्वानरें ॥ तोही होवोनि भस्मपर ॥ महीलागीं मिरवला ॥२९॥
मग तिसरा लोहपुतळा पूर्ण ॥ तोही झाला शापें भस्म ॥ चवथा पांचवा गति दुर्गम ॥ त्याचिपरी पावला ॥३०॥
यावरी त्या नृपनाथा ॥ श्रीकानिफा झाला सांगता ॥ मातें वदोनि नाम सर्वथा ॥ नाथाप्रती सांगावें ॥३१॥
अवश्य म्हणोनि गौडपाळ ॥ लवकरी भेदी अति सबळ ॥ तो नाद ऐकूनि तपी केवळ ॥ विचार करीत मानसीं ॥३२॥
माझा क्रोध वडवानळ ॥ जाळूनि टाकील ब्रह्मांड समग्र ॥ तेथें वांचला त्रिलोचनकुमर ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३३॥
कृतांताचे दाढेआंत ॥ सांपडलिया सुटोनि जात ॥ न शिवे वैश्वानर मृत्य ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३४॥
महातक्षकानें दंश करुन ॥ वांचवूं शके कोणी प्राण ॥ केंवीं वांचला नृपनंदन ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३५॥
परम संकट पाहोनी ॥ प्राण उदित घेत हिरकणी ॥ तो वांचूनि मिरवे जनीं ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३६॥
उरग खगेंद्रा हातीं लागतां ॥ परी न मरे भक्षण करितां ॥ तेवीं झालें नृपनाथा ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३७॥
कीं मूषक सांपडल्या मुखांत ॥ त्यातें कदा न ये मृत्य ॥ तेवीं वांचला हा नृपनाथ ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३८॥
सहज उभा पर्वतानिकटी ॥ कडा तुटोनि पडला माथीं ॥ त्यांत वांचला ऐसें म्हणती ॥ हेंचि आश्चर्य वाटतसे ॥३९॥
ऐसा विचार मनांत ॥ करिता झाला जालिंदरनाथ ॥ चित्तीं म्हणे त्या भगवंत ॥ साह्य झाला रक्षणीं ॥४०॥
तरी आतां असो ऐसें ॥ वांचल्या अमर करुं त्यास ॥ ऐसें विचारुनि चित्तास ॥ मनीं गांठी दृढ धरिली ॥४१॥
येरीकडे कानिफनाथ ॥ हुंकार नृपासी देत ॥ तंव उभा स्वकरीं व्यक्त ॥ लवकरी मही भेदीतसे ॥४२॥
लवकरी घाव कानीं उठतां ॥ श्रीजालिंदर होय पुसता ॥ कोण आहेस अद्यापपर्यंत ॥ घाव घालिसी महीतें ॥४३॥
ऐकतां श्रीगुरुवचन ॥ रायाआधीं गजकर्णनंदन ॥ सांगूनि आपुलें नामाभिधान ॥ गोपीचंदाचें सांगतसे ॥४४॥
म्हणे महाराजा तपोजेठी ॥ मी बाळक कानिफा महीपाठी ॥ पहावया चरण दृष्टीं ॥ बहुत भुकेले चक्षू ते ॥४५॥
म्हणवोनि गोपीचंद नृपनाथ ॥ तुम्हां काढावया उदित ॥ ऐसी ऐकोनि सच्छिष्यमात ॥ म्हणे अद्यापि नृप वांचला ॥४६॥
तरी आतां चिरंजीव ॥ असो अर्कअवघी ठेव ॥ अमरकांती सदैव भाव ॥ जगामाजी मिरवो कां ॥४७॥
ऐसें वदोनि जालिंदरनाथ ॥ निजचक्षूनें पहावया सुत ॥ बोलता झाला अति तळमळत ॥ म्हणे महीतें विदारीं ॥४८॥
ऐसी आज्ञा होतांचि तेथें ॥ मग काढिते झाले वरील लिदीतें ॥ तंव ते मृत्तिका दशवर्षात ॥ महीव्यक्त झालीसे ॥४९॥
मग कामाठी लावूनि नृपती ॥ उकरिता झाला मही ती ॥ वरील प्रहार वज्रापती ॥ जावोनियां भेदलासे ॥५०॥
मग तो नाद ऐकूनि नाथ ॥ म्हणे आतां बसा स्वस्थ ॥ मग जल्पोनि शक्रास्त्र ॥ वज्रास्त्रातें काढिलें ॥५१॥
मग नाथ आणि गजकर्णनंदन ॥ पाहते झाले उभयवदन ॥ मग चित्तीं मोहाचें अपार जीवन ॥ चक्षुद्वारें लोटलें ॥५२॥
मग गरतीबाहेर येवोनि नाथ ॥ प्रेमें आलिंगला सुत ॥ म्हणे बा प्रसंगें होतासी येथ ॥ म्हणवोनि नृपनाथ वांचला ॥५३॥
परी गरतीबाहेर येतांचि नाथ ॥ चरणीं लोटला नृपनाथ ॥ मग त्यातें कवळोनि धरीत ॥ मौळीं हात ठेवीतसे ॥५४॥
म्हणे बाळा प्रळयाग्नी ॥ त्यांत निघालासी वांचुनी ॥ आतां जोंवरी शशितरणीं ॥ तोंवरी मिरवें महीतें ॥५५॥
यावरी त्रिलोचनकामिनी ॥ मैनावती लोटली चरणीं ॥ नेत्रीं अश्रुपात आणोनी ॥ स्वामीलागी बोलतसे ॥५६॥
म्हणे महाराजा एकादश वर्षात ॥ मातें लोटली महातभरात ॥ माझा अर्क गुरुनाथ ॥ अस्ताचळीं पातलासे ॥५७॥
मित्रकुमुदिनी दीनवाणी ॥ हुरहुर पाहे जैसी तरणी ॥ कीं मम बाळकाची जननी ॥ गेली कोठें कळेना ॥५८॥
कीं मम वत्साची गाउली ॥ कोणे रानीं दूर गेली ॥ समूळ वत्साची आशा सांडिली ॥ तिकडेचि गुंतली कैसोनि ॥५९॥
कां मम चकोराचा उड्डगणपती ॥ कैसा पावला अस्तगती ॥ कीं मज चातकाचे अर्थी ॥ ओस घन पडियेला ॥६०॥
सदा वाटे हुरहुर जीवा ॥ कीं लोभ्याचा चुकला द्रव्यठेवा ॥ कीं अंधाची शक्ती काठी टेकावा ॥ कोणें हरोनि नेलीसे ॥६१॥
ऐसे एकादश संवत्सर ॥ मास गेले महाविकार ॥ ऐसें बोलोनि नेत्रीं पूर ॥ अश्रुघन वर्षतसे ॥६२॥
मग तियेसी हदयीं धरोनि नाथ ॥ स्वकरें नेत्राश्रु पुसीत ॥ तीन्ही बाळकें धरोनि यथार्थ ॥ माय हेलवे त्यामाजी ॥६३॥
गोपीचंदाचें मुख कुरवाळून ॥ बोलता झाला अग्निनंदन ॥ बा रे तुझें काय मन ॥ इच्छीतसे मज सांगा ॥६४॥
राजवैभवा भोगावें ॥ कीं आत्मीं समयोग्यते मिरवावें ॥ कोणतें तुझें मनीं भावे ॥ तैसा योग घडेल बा ॥६५॥
अश्वाश्वत शाश्वत दोन पद ॥ राज्य वैराग्य मार्गभेद ॥ तरी तुज आवडे तोचि वृंद ॥ स्वीकारीं कां बाळका ॥६६॥
म्यां तूतें केलें अमरपणीं ॥ परी तैसें नाहीं राजमांडणी ॥ अनेक आलें अभ्र दाटोनी ॥ मृगजळासमान तें ॥६७॥
बा रे संपत्ती अमरां कैसी ॥ तेही आटेल काळवेळेसीं ॥ दिसतें तितुकें वैभवासी ॥ नाशिवंत आहे बा रे ॥६८॥
बा रे पूर्वी राज्य सांडून ॥ कित्येक बैसले योग्यांत येवोन ॥ परी तो योग सोडून ॥ राज्यवैभवा नातळला ॥६९॥
पाहें गाधिसुताचे वैभव ॥ महीलागीं केवढें नांव ॥ परी तो सोडूनि सकळ वैभव ॥ योगक्रिया आचरला ॥७०॥
उत्तानपाद महीवरती ॥ काय न्यून असे संपत्ती ॥ परी सुताची कामशक्ती ॥ वेगें जनीं दाटलीसे ॥७१॥
तस्मात् अशाश्वत ओळखून ॥ बा ते झाले सनातन ॥ तरी आतां केउतें मन ॥ इच्छितें तें मज सांगें ॥७२॥
गोपीचंद विचार करी मनांत ॥ राज्यवैभवीं सामर्थ्य गळित ॥ अहा योगी जालिंदरनाथ ॥ चिरंजीव मिरवतसे ॥७३॥
आज एकादश वर्षेपर्यंत ॥ गरतगलित पचला योगीनाथ ॥ जेणें यम शरणागत ॥ पायांतळीं लोळतसे ॥७४॥
जेणें कृत्तांत निर्बळ केला ॥ तो राज्य मेळवूनि खळ ठेला ॥ हेमकर्णे अशक्त झाला ॥ परीस लोहाकारणें ॥७५॥
सुरभी त्रैलोक्यकामना ॥ पूर्ण करील क्षुधार्तवचना ॥ ती स्वपोटा रानोंराना ॥ शोधील काय तृणातें ॥७६॥
ब्रह्मांडावरी जयाची सत्ता ॥ तो कोणे अर्थी दरिद्रता ॥ भोगील मनें ॥ ऐसा पश्चात्ताप दारुण ॥ चित्तामाजी डवरला ॥७८॥
मग म्हणे गुरुमहाराज ॥ इंधनीं अग्नि होतां सज्ज ॥ तेवीं विधानचि तैसे विराजे ॥ पावका स्पर्श झालिया ॥७९॥
तरी आतां सरतें पुरतें ॥ आपुल्यासमान करा मातें ॥ आळीभृंगन्यायमतें ॥ करुनि मिरवें महीसी ॥८०॥
ऐकोनि दृढोत्तर वचन ॥ श्रीगुरु स्वकरातें उचलोन ॥ पृष्ठी थापटी वाचे वचन ॥ गाजी गाजी म्हणतसे ॥८१॥
मग वरदहस्त स्पर्शोनि मौळी ॥ सकळ देहातें कृपें न्याहाळी ॥ कर्णी ओपूनि मंत्रावळी ॥ स्वनाथ मार्गी मिरवला ॥८२॥
ऐसें होता अंग लिप्त ॥ मग दिसून आलें अशाश्वत ॥ काया माया दृश्य पदार्थ ॥ विनय चित्तीं मिरवले ॥८३॥
मग वटतरुचें दुग्ध काढून ॥ जटा वळी राजनंदन ॥ त्रिसट कौपीन परिधानून ॥ कर्णी मुद्रा परिधानी ॥८४॥
शैली कंथा परिधानूनी ॥ शिंगीनाद गाजवी भुवनीं ॥ कुबडी फावडी कवळूनि पाणी ॥ नाथपणीं मिरविला ॥८५॥
भस्मझोळी कवळूनि कक्षेंत ॥ आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ ॥ हातीं कवळूनि नाथनाथ ॥ जगामाजी मिरवला ॥८६॥
परी हा वृत्तांत सकळ गांवांत ॥ अंतःपुरादिकीं झाला श्रुत ॥ श्रुत होतांचि अपरिमित ॥ शोकसिंधू उचंबळला ॥८७॥
एकचि झाला हाहाकार ॥ रुदन करितां लोटला पूर ॥ स्त्रिया धरणीसी टाकिती शरीर ॥ मुखीं मृत्तिका घालिती ॥८८॥
मैनावतीसी शिव्या देत ॥ म्हणती हिनेचि केला सर्वस्वीं घात ॥ अहा अहा नृपनाथ ॥ महीं कोठें पहावा ॥८९॥
आठवूनि रायाचें विशाळ गुण ॥ भूमीवरी लोळती रुदन करुन ॥ मूर्छागत होऊनि प्राण ॥ सोडूं पाहती रुदनांत ॥९०॥
अहा हें राज्यवैभव ॥ कैसी आली विवशी माव ॥ अहा सुखाचा सकळ अर्णव ॥ वडवानळें प्राशिला ॥९१॥
अहा रायाचें बोलणें कैसें ॥ कधीं दुखविलें नाहीं मानस ॥ आमुचे वाटेल जें इच्छेस ॥ राव पुरवी आवडीनें ॥९२॥
एक म्हणे सांगू काय ॥ रायें वेष्टिलें चित्त मोहें ॥ म्लानवदन पाहोनि राय ॥ हदयी कवळी मोहाने ॥९३॥
म्हणे बाई मुखातें कुरवाळून ॥ परम प्रीतीनें घेत चुंबन ॥ अति स्नेहानें अर्थ पुरवून ॥ मनोरथ पुरवी माझें गे ॥९४॥
ऐसें म्हणूनि आरंबळत ॥ एकसरां शब्द करीत ॥ एक म्हणे वो बाई मात ॥ काय परी सांगूं रायाची ॥९५॥
अगे वत्सालागीं जैशी गाय ॥ क्षणिक विसंबूं कदा न पावे ॥ तेवीं क्षणक्षणां येऊनि राय ॥ वदन पाहे माझें गें ॥९६॥
एक म्हणे अर्थ पोटीं ॥ किती सांगू राजदृष्टी ॥ वांकुडा केश कबरीथाटी ॥ पडतां सावरी हस्तानें ॥९७॥
अगे कुंकुमरेषा वांकडी होत ॥ ती सांवरी नृपनाथ ॥ मायेहूनि अधिक आतिथ्य ॥ माझें करीत होता गे ॥९८॥
ऐसें म्हणूनि धरणी अंग ॥ धडाडूनि टाकिती सुभाग्य ॥ म्हणती विधात्या बरवा भांग ॥ निजभाळीं रेखिला की ॥९९॥
मस्तक धरणीवरी आपटिती ॥ धडाधडां हस्तें हदय पिटिती ॥ महीं गडबडूनि पुन्हां उठती ॥ पुन्हां सांडिती शरीरातें ॥१००॥
म्हणती राया तुजविण ॥ आतां कोण करील संगोपन ॥ आतां आमुचे सकळ प्राण ॥ परत्र देशांत जातील हो ॥१॥
ऐसे म्हणूनि आरंबळती ॥ अट्टाहासे हदय पिटिती ॥ मृत्तिका घेऊनि मुखीं घालिती ॥ केश तोडिती तटातटां ॥२॥
म्हणती अहा राया तीन वेळ ॥ शय्येहूनि उठूनि पाजिसी जळ ॥ ऐसा कनवाळू असूनि निर्मळ ॥ सोडूनि कैसा जासी रे ॥३॥
अहा राया शयनीं निजता ॥ उदर चापसी आपुल्या हाता ॥ रिक्त लागतां उठोनि तत्त्वतां ॥ भोजन घालीत होतासी ॥४॥
ऐसा कनवाळू तूं मनीं ॥ आतां कैसा जासी सोडूनि ॥ ऐसें म्हणोनि शरीर धरणीं ॥ धडाडूनि टाकिलें ॥५॥
म्हणे रायाचें स्वरुप ॥ पहातांचि पुरतसे कंदर्प ॥ तरी त्या स्वरुपाचा झाला लोप ॥ कोठें पाहूं महाराजा ॥६॥
एक म्हणे नोहे भर्ता ॥ प्रत्यक्ष होती आमुची माता ॥ कैसी सांडूनि जात आतां ॥ निढळवाणी पाडसा ॥७॥
एक म्हणे माझी हरिणी ॥ कैसी पाडसा जात सोडूनी ॥ एक म्हणे माझी कूर्मिणी ॥ कृपादृष्टी आवगतली ॥८॥
एक म्हणे मज मीनाचें जळ ॥ कैसे आटलें अब्धीचें जळ ॥ दुःखार्काची झळाळ ॥ साहवेना वो माये ॥९॥
एक म्हणे माउली माझी ॥ स्नेहाचा पान्हा पाजी ॥ वियोगकाननीं चुकर आजी ॥ कैसी झाली दैवानें ॥११०॥
एक म्हणे आमुची पक्षिणी ॥ अंडजासमान पाळिलें धरणी ॥ आतां चंचुस्नेहें करोनी ॥ कोण ओपील ग्रासातें ॥११॥
एक म्हणे मज चातकाकारण ॥ भरतां नोहे गे अंबुदस्थान ॥ परम स्नेहाचें पाजितां जीवन ॥ आजि ओस कैसा झाला गे ॥१२॥
ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ एकमेकींचे गळां पडती ॥ रडती पडती पुन्हां उठती ॥ आरंबळती आक्रोशें ॥१३॥
ऐसा आकांत अंतःपुरांत ॥ येरीकडे जालिंदरनाथ ॥ राया गोपीचंदा सांगत ॥ तपालागीं जाई कां ॥१४॥
परी राया ऐक मात ॥ सुरत्नपणाचा पाहों हेत ॥ तुझ्या स्त्रिया अठरा शत ॥ भिक्षा मागे तयांपासी ॥१५॥
आलक्ष आदेश निरंजन ॥ ऐसा सवाल मुखें वदोन ॥ अंतःपुरांत संचार करोन ॥ भिक्षा मागें बाळका तूं ॥१६॥
शिंगीनाद वाजवूनि हातीं ॥ भिक्षा दे माई ॥ वदोनि उक्ती ॥ ऐशापरी भेटोनि युवती ॥ तपालागीं जाई कां ॥१७॥
मग अवश्य म्हणोनि नृपनाथ ॥ संचार करी अंतःपुरांत ॥ अलक्ष निरंजन मुखे वदत ॥ माई भिक्षा दे म्हणतसे ॥१८॥
तें पाहूनि त्या युवती ॥ महाशोकाब्धींत उडी घालिती ॥ एकचि कोल्हाळ झाला क्षितीं ॥ नाद ब्रह्मांडीं आदळतसे ॥१९॥
एक हातें तोडिती केशांतें ॥ एक मृत्तिका घालिती मुखांत ॥ एक म्हणे दाही दिशा ओस दिसत ॥ दाही विभाग झाल्यानें ॥१२०॥
एक धुळींत लोळती ॥ एक उठूनि पुन्हां पडती ॥ एक हदय पिटोनि हस्तीं ॥ आदळिती मस्तकें ॥२१॥
एक पाहोनि रायाचें स्वरुप ॥ म्हणती अहाहा कैसा भूप ॥ सवितारुपी झाला दीप खद्योतपणी दिसतसे ॥२२॥
अहाहा राव वैभवार्णव ॥ कैसा दिसतो दीनभाव ॥ कीं मेरुमांदार सोडूनि सर्व ॥ मशक दृष्टीं ठसावला ॥२३॥
अहा राय हस्तेंकरुन ॥ अपार याचकां वांटी धन ॥ आतां कक्षेंत झोळी घालून ॥ मागे कण घरोघरीं ॥२४॥
ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ धरणीवरी अंग टाकिती ॥ पुन्हां उठोनि अवलोकिती ॥ म्हणती अहा काय झालें ॥२५॥
असो नृप तो अंतःपुरांगणीं ॥ आदेश निरंजन वदे वाणी ॥ मुख्य नायिका लोमावती राणी ॥ रायापासीं पातली ॥२६॥
मुखचंद्र गळे बोलूनी ॥ नयनी अश्रु अपार जीवनीं ॥ रायालागीं पाळा घालूनी ॥ वेष्टुनियां बोलती त्या ॥२७॥
तिचे मागें चंपिका कारंती ॥ उठोनि येतात मागें समस्तीं ॥ राजस्त्रिया अट्टहास करिती ॥ धांव घेती मागें लगबगां ॥२८॥
म्हणती राया असो कैसे ॥ घडूनि आले ईश्वरसत्तेसें ॥ परी येथेंचि राहूनी पूर्ण योगास ॥ संपादिजे महाराजा ॥२९॥
आम्हां दरिद्रियांचें स्वरुपमांदुस ॥ लोपवूं नका सहसा महीस ॥ आम्ही तुम्हांविण दिसतों ओस ॥ प्राणाविण शरीर जैसे ॥१३०॥
हे राया आम्ही स्त्रिया कोटी ॥ परम अंध महींपाठीं ॥ तरी आमुची सबळ काठी ॥ टेंका हरूं नका जी ॥३१॥
तरी येथोंचि योग आचरावा ॥ आम्ही न छळूं विषयभावा ॥ परी तव स्वरुपाचचि ठेवा ॥ पाहूनि तो शांत करुं कीं ॥३२॥
जैसें जीर्ण कडतर ॥ परी म्हणाया वैभवी थोर छत्र ॥ तेवीं तव आश्रयीं सर्व पवित्र ॥ वैभवमंडण आम्हांसी ॥३३॥
तरी मानेल तेथें पर्णकुटिका ॥ बांधूनि देऊं जडितहाटका ॥ आम्ही बारा सोळा शत बायका ॥ सेवा करुं आदरानें ॥३४॥
सुवर्णे शिंगीं देऊं मढवून ॥ आणि रत्नबिकी शैल्य परिधानून ॥ कनकचिरी कंथा घालून ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३५॥
मुक्तरत्नें हिरे माणिक ॥ संगीत करुनि हाटकीं देख ॥ त्यातें भूषणमुद्रा अलौलिक ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३६॥
लोड तिवासे मंचक सुगम ॥ गादी तोषक अति गुल्म ॥ तरी भस्म सन्निधीकरुन ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३७॥
भिक्षातुकडे सूक्ष्म कठिण ॥ त्यजूनि सेवीं षड्रसान्न ॥ घृत दुग्ध दधि सेवीं पक्कान्न ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥३८॥
एकट सेवीं त्यजीं कानन ॥ दासदासी सेवकजन ॥ सेवा करितां षोडशोपचारान ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥३९॥
चुवा चंदन अर्गजासुवास ॥ मार्जन करुं तव देहास ॥ तरी धिक्कारुनि तृणासनास ॥ सुखसंपन्न भोगावें ॥१४०॥
हत्ती घोडे शिबिका सदन ॥ टाकूनि कराल तीर्थाटण ॥ परी चालाल तें दुःख त्यजून ॥ सुखसंपन्न भोगावें ॥४१॥
महाल चौकट संगीत रंगीत ॥ ते सांडूनि विपिनीं पडाल दुःखित ॥ तरी तें त्यजूनि रहा येथ ॥ हे सुखसंपन्न भोगावें ॥४२॥
छत्र चामरें प्रजा अंकित ॥ त्यजूनि फिराल अरण्यांत ॥ एकटपणीं त्यजूनि रहा येथ ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४३॥
मृगाक्षा खंजीर पदमनयनी ॥ पद चुरती कोमल पाणी ॥ तरी तृणांकुरशयन त्यजूनी ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४४॥
चंद्राननी गजगामिनी ॥ बोलती संवाद रसाळ वाणी ॥ तरी यांचा त्याग करोनी ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४५॥
ऐशा स्त्रिया संवादती ॥ परी कोप चढला तयाच्या चित्तीं ॥ दूर हो लंडी म्हणोनि उक्ती ॥ धिक्कारीत तयांतें ॥४६॥
परी त्या मोहें वेष्टूनि बोलत ॥ राया एकटें पडावें अरण्यांत ॥ तुम्हांसवें बातचीत ॥ कोण करील महाराजा ॥४७॥
येरी म्हणे अरण्यपोटीं ॥ सिंगी सारंगी करील गोष्टी ॥ स्त्रिया म्हणती आसनदृष्टी ॥ वपन कैंचें हो तेथें ॥४८॥
राव म्हणे मही आसन ॥ अंबरासारखें असे ओढवण ॥ स्त्रिया म्हणती शयनीं कोण ॥ निजेल तुमच्या सांगातीं ॥४९॥
येरी म्हणे कुबडी फावडी ॥ शयन करितील दोन्ही थडी ॥ स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी ॥ कोण निवारी सांगावें ॥१५०॥
येरी म्हणे अचळ धुनी ॥ पेटवा घेईल पंचाग्नी ॥ ते सबळ शीतनिवारणीं ॥ होतील योग साधावया ॥५१॥
स्त्रिया म्हणती अलौलिक ॥ तेथें कोठें परिचारक लोक ॥ राज्यासनीं पदार्थ कवतुक ॥ देत होते आणूनियां ॥५२॥
येरी म्हणे व्याघ्रांबर ॥ आसन विराजूं वज्रापर ॥ मग धांव घेती नारीनर ॥ कौतुकपदार्थ मिरवावया ॥५३॥
स्त्रिया म्हणती मोहव्यक्त ॥ कोणतीं असतीं मायावंत ॥ माय बाप भगिनी सुत ॥ अरण्यांत कैंची हीं ॥५४॥
येरी म्हणे विश्वरुप ॥ घरघर आई घरघर बाप ॥ इष्टमित्र भगिनी गोतरुप ॥ शिष्य साधक मिरवती ॥५५॥
स्त्रिया म्हणतीं षड्रसादि अन्न ॥ विपिनीं मिळतील कोठून ॥ येरी म्हणे जीं फळें सुगम ॥ षड्रसादि असती तीं ॥५६॥
स्त्रिया म्हणती वेंचाया साधन ॥ विपिनीं मिळेल जी कोठून ॥ येरी म्हणे ब्रह्मरुपानें ॥ घेऊं देऊं वेव्हारासी ॥५७॥
स्त्रिया म्हणती फाटल्या कौपीन ॥ पुनः मिळेल ती कोठून ॥ येरु म्हणे इंद्रियदमन ॥ विषयीं कांसोटी घालूं कीं ॥५८॥
स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा ॥ ते कोठूनि मिळेल जी समर्था ॥ येरु म्हणे योग आचरतां ॥ दिव्य कंथा होईल ॥५९॥
स्त्रिया म्हणती सिंगी सारंगा ॥ फुटूनि गेलिया प्रसंगी ॥ मग गोष्टी करावयाची तरंगी ॥ कोण आहे तुम्हांपाशी ॥१६०॥
येरी म्हणे सगुण निर्गुण ॥ शिंगी सारंगी असती दोन ॥ आगमानिगमाचे तंतू ओंवून ॥ सुखसंवाद करीन मी ॥६१॥
स्त्रिया म्हणती कुबडी फावडी ॥ जीर्ण झालिया लागती देशोधडी ॥ मग सुखशयनीं निद्रापहुडी ॥ कोण सांगेन करील जी ॥६२॥
येरी म्हणे खेचरी भूचरी उभय ॥ आदेय विदेह प्रकाश स्वरुपमय ॥ वाम दक्षिण घेऊनि तन्मय ॥ डोळां लावीन निरंजनीं ॥६३॥
स्त्रिया म्हणती शैल्य तुटून ॥ गेल्या पुन्हां आणाल कोठून ॥ येरी म्हणे मोक्षयुक्तिसमान ॥ शैल्यभूषण मिरवीन गे ॥६४॥
स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका ॥ हरपोनि गेल्या नरपाळका ॥ मग काय करशील वनीं देखा ॥ नाथपंथी मिरवावया ॥६५॥
येरु म्हणे वो खेचरी भूचरी ॥ लुप्तमुद्रा कर्णद्वारीं ॥ अलक्ष चाचरी अगोचरी ॥ लेवविल्या गुरुनाथें ॥६६॥
ऐसें बोलतां उत्तरोत्तर ॥ म्हणे माई भिक्षा देई सत्वर ॥ तंव त्या धांवती धरावया कर ॥ कंठीं मिठी घालावया ॥६७॥
ऐसें चांचल्यगुणयुक्त ॥ दृष्टीं पाहूनियां नृपनाथ ॥ कुबडी फावडी उगारीत ॥ दूर होई लंडी म्हणतसे ॥६८॥
तें गुप्त पाहोनि मैनावती ॥ सिद्धार्थ अन्न घेऊनि हातीं ॥ शीघ्र येऊनि पुत्राप्रती ॥ म्हणे भिक्षा घे नाथा ॥६९॥
मग भिक्षा घेऊनि झोळीं ॥ मातेपदीं अर्पी मौळी ॥ मग तेथूनि निघूनि तये वेळीं ॥ नाथापाशीं पातला ॥१७०॥
मग जो झाला स्त्रियांत वेव्हार ॥ तो सकळ सांगितला वागुत्तर ॥ मैनावती येऊनि तत्पर ॥ तीही वदे वृत्तांतासी ॥७१॥
असो उभयतांचा वृत्तांत ऐकून ॥ मान तुकावी अग्निनंदन ॥ मग तीन रात्री रायासी ठेवून ॥ बहुतां अर्थी उपदेशिला ॥७२॥
मग लोमावतीचा उदरव्यक्त ॥ गोपीचंदाचा होता सुत ॥ मुक्तचंद नाम त्याचें ॥ राज्यासनीं वाहिला ॥७३॥
स्वयें जालिंदरें कौतुक ॥ राज्यपटीं केला अभिषेक ॥ मंत्री प्रजा सेवक लोक ॥ तयाहातीं ओपिलें ॥७४॥
राया गोपीचंदा सांगे वचन ॥ बा रे पाहें बद्रिकाश्रम ॥ बद्रिकेदारालागीं नमून ॥ तपालागीं तूं बैसें कां ॥७५॥
लोहकंटकीं चरणांगुष्ठ ॥ देऊनि तपाचें दावीं कष्ट ॥ द्वादश वरुषें नेम स्पष्ट ॥ एकाग्रीं रक्षावा ॥७६॥
ऐसें सांगूनि तयातें ॥ मग प्रजा लोकादि समस्तें ॥ निघाले रायासी बोळवायातें ॥ कानिफासुद्धां जालिंदर ॥७७॥
परी प्रजेचे लोक शोक करिती ॥ राया गोपीचंदाचे गुण आठविती ॥ नेत्रीं ढाळूनि अश्रुपातीं ॥ रुदन करिती अट्टहास्यें ॥७८॥
म्हणती अहा सांगों कायी ॥ नृप नव्हे होती आमुची आई ॥ वक्षाखाली सकळ मही ॥ संबोधीतसे महाराजा ॥७९॥
ऐसे वर्णूनि तयाचे गुण ॥ आक्रंदती प्रजाजन ॥ परी आतां पुरे करा विघ्न ॥ शोकमांदार खोंचला ॥१८०॥
तृणपाषाणादि तरु ॥ पक्षी पशु जाती अपारु ॥ राया नृपाकरितां समग्र ॥ शोकाकुलित मिरवले ॥८१॥
मग एक कोस बोळवून ॥ समस्त आणिले अग्निनंदनें ॥ जेथील तेथे संबोखून ॥ आश्वासीत सकळांसी ॥८२॥
परी राया जातां ठायीं ठायीं ॥ धांवूनि पाहतां उंच मही ॥ म्हणती सोडूनि गेलीस आई ॥ कधी भेटसी माघारां ॥८३॥
घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करुन ॥ पहाती रायाचें वदन ॥ कोणी मागें जाती धांवून ॥ वदन पाहूनि येताती ॥८४॥
ऐसा राजा जातां दोन कोश ॥ मग सकळ मिरवले एक निराश ॥ मग मागें उलटूनि संभारास ॥ ग्रामामाजी संचरले ॥८५॥
राजसदनीं येऊनि समस्त ॥ सकळ बैसले दीनवंत ॥ जैसें शरीर प्राणरहित ॥ एकसरां मिरवले ॥८६॥
मग श्रीजालिंदर राजसदनीं ॥ मुक्तचंदा विराजूनि राज्यासनीं ॥ मंत्रियातें पाचारुनी ॥ वस्त्रेंभूषणें आणविलीं ॥८७॥
मग जैसें महत्त्व पाहून ॥ तयालागीं भूषणें देऊन ॥ प्रेमें गौरवूनि प्रजाजन ॥ बोळविले स्वस्थाना ॥८८॥
याउपरी अंतःपुरीं जाऊन ॥ सर्व स्त्रियांचें केलें समाधान ॥ मैनावतीचे करीं ओपून ॥ समाधानीं मिरविलें ॥८९॥
मुक्तचंद ओपूनि तियेचे करीं ॥ म्हणे हा गोपीचंदचि मानीं ॥ हा शिलार्थ तयाचे परी ॥ मनोरथ पुरवील तुमचे ॥१९०॥
ऐसे करोनि समधान ॥ राज्यासनीं पुन्हां येऊनि ॥ मुक्तचंदाचे हस्तेंकरुन ॥ याचकां धन वांटिले ॥९१॥
जालिंदर कानिफा कटकासहित ॥ षण्मास राहिले पट्टणांत ॥ अर्थाअर्थी सकळ अर्थ ॥ निजदृष्टीं पाहती ॥९२॥
श्रीजालिंदराचा प्रताप सघन ॥ कोण करुं पाहती विघ्न ॥ येरीकडे गोपीचंदरत्न ॥ भगिनीग्रामा चालिला ॥९३॥
तेथें कथा होईल अपूर्व ॥ ते पुढील अध्यायीं ऐका सर्व ॥ अवधानपात्रीं घन भाव ॥ कथा स्वीकार श्रोते हो ॥९४॥
नरहरीवंशीं धुंडीसुत ॥ मालू संतांचा शरणागत ॥ तयाचे रसनेस धरुनि हेत ॥ अवधान पात्रीं मिरवावें ॥९५॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत चतुर ॥ सप्तदशाध्याय गोड हा ॥१९६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥१७॥ ओव्या ॥१९६॥
॥ नवनाथभक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त ॥