ज्याचे ‘ हवेपण ’ जास्त असते तो गरीब जाणावा , आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा . परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते , त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही . ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत . आमचा आधार पैशाचा ; तो आज आहे अन उद्या नाही . पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल ? श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये , याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी . खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा , हीच खरी श्रीमंती , हेच खरे भाग्य , आणि हेच खरे ऐश्वर्य होय . ज्याला समाधान जास्त , तो जास्त भाग्यवान समजावा . समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते , दुसरा कुणी ते आपल्याला देऊ शकत नाही . खरोखर , समाधानासारखे औषधच नाही . ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात . काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान , शांती आणि आनंद मिळतो . पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता , त्याला विचारले तर तो म्हणाला , " अहो , मला मधुमेह झाला आहे ; मी आतून पोखरला गेलो आहे ! त्यापेक्षा तुम्ही बरे . " खरोखर , त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणार्‍या ऐश्वर्याची अवस्था आहे . फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे . ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही , पण ते झोपडीमध्येही नसेल . असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे ! सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत . पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही . जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली ? व्यक्ती काय किंवा समाज काय , यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे . चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही . हल्लीचे तत्त्वज्ञान नुसते अभ्यासी आहे , अनुभवाचे नाही ; म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही .

खरोखर , प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे . भगवंताशिवाय जो राहतो त्याला सूखदुःख येते ; आणि सुख म्हणजे तरी काय , दुःखाची कमतरता ते सुख ! राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते ; म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे . पण कुणी असा विचार करीत नाही की , जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का ? याचे उत्तर ‘ नाही ’ असेच मिळते . ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे . बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे , भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे . हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari