सर्वस्वीं व्हावें रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥ रामास अर्पण व्हावें कोण्या रीती । त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥ प्रथम राखावें भगवंताचें अधिष्ठान । तेथें प्रयत्नांचा उगम ॥ अखंड राखावें अनुसंधान । येणें कर्म होईल सहज रामार्पण ॥ उपास्यदेवतेची करावी आठवण । मनानें जावें त्यास शरण ॥ सदगुरुसी झाला जो अनन्य । त्यास दुजें करणें नाहीं अन्य ॥ सदवृत्ति , सद्गुण , दुर्गुणादि विकार । हें सर्व करावें रामार्पण । त्यानेंच रामाचें होऊन राहणें जाण ॥ राजापोटीं पुत्र जन्मा आला । राजपद हातीं चालत आलें त्याला । तैसें आपण व्हावें रामार्पण । विषयाचा न लागे तेथें लाग जाण ॥ मनानें भगवंतास जावें शरण । व्यवहारांत दक्षता ठेवावी आपण ॥ अनन्य व्हावें रामास शरण । तुझेविण नाहीं मानणें कांहीं अन्य ॥ ठेवावा सदा मनीं ध्यास । दया येईल रामरायास ॥ जेव्हां मनासकट देह केला अर्पण । मग मरणाच्या भयाचें काय कारण ? ॥

परमार्थाचें मुख्य साधन । शक्यतों न चुकूं द्यावें अनुसंधान । मुखीं करावें नामस्मरण । ह्रदयीं भगवंताचें ध्यान । याविण नाहीं दुजा उपाय जाण ॥ सर्व कांहीं करीत जावें । परि व्यवहारीं न गुंतावें ॥ ऐसें राहावें प्रपंचांत । जसा पाहुणा वागे जगांत ॥ बाह्य सृष्टि विषयाकार । तेथें मन न गुंतूं द्यावें जाण ॥ देह लावावा प्रपंचीं । मन लावावें रामचरणीं ॥ लोभ्याचें चित्त पैशावरी । परि व्यवहार जैसा करी । तैसें मन ठेवावें रामावरी । प्रपंचांत असावी हुशारी ॥ चित्त एकाग्र न व्हायला कारण । विषय मानला आपला जाण ॥ घार फिरते आकाशांत । तैसें चित्त राहातें विषयांत ॥ म्हणून दृष्टि ठेवावी त्याचेवर । जें स्वाभाविक आहे स्थिर ॥ एकाग्रतेस करणें साधन । त्याला करणें जरुर नामस्मरण ॥ एकाग्रतेस उपाय एकच खरा । नामीं प्रेमा ठेवा पुरा ॥ निश्चितपणा राखावा । साधनांत जोर आणावा ॥ विषयापासून निवृत्ति । जडावी नामाची प्रीति । त्याला दूर नाहीं रघुपति ॥ व्यवहारांत असावी दक्षता । परि राम चिंतीत जावा सदा ॥ प्रपंचांत असावे लक्ष । तरी त्याचा चित्तीं घेऊं नये पक्ष ॥ परमात्म्यानें जें जें दिलें । तें तें त्याचें म्हणून सांभाळणें भलें । मुला -बाळांचें करावें जतन । रामानें दिलेलें हें जाणून । त्यांच्या लोभांत न गुंतवावें चित्त । हाच परमार्थ सत्य ॥ सर्व कांहीं करावें । मीपणानें न राहावें ॥ रामसेवा रामासाठीं । न जाणावी विषयासाठीं ॥ प्रपंच न मानावा सुखाचा ॥ तो असावा कर्तव्याचा ॥ सदा राहावें सावधचित्त । मनानें भजावा भगवंत ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास


ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari