आता उत्सव पुरा झाला; आता तुम्ही सर्वजण परत जाल, तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा; आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन, विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का? इथे साक्षात परमात्मा आले आहेत, त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे. तर मला वाटते याहून तुम्ही काही तरी जास्त करणे आवश्यक आहे. तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी: अभिमान इथे सोडावा, आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान तुम्हाला देता येईल का? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का? अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सुटत नाही. मागे एकदा असे झाले की, एकजण तीन वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता. मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे. एकदा त्याचे गुरु तिथून जात होते. त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले. म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की, ‘‘ तू इथे काय करतो आहेस? ” तर तो म्हणाला, “ मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधन करतो आहे. ” ते म्हणाले, “ वा ! वा ! फार चांगले ! तू आणखी तीनच दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आत्तापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल. ” तो तसे करु लागला. त्याला वाटले की, तीन वर्षे साधन केले, तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे, ते तर सहज करीन ! पण गंमत अशी की, त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे पाच मिनिटेसुद्धा बसवले नाही. त्याला आतून कोणीतरी फेकून देत आहे असे वाटू लागले, खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या, आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली. तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला. तो म्हणाला, “ मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करुन घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते. आपणच माझ्याकडून सर्व करुन घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले, नाहीतर होणे शक्य नाही. तर मी आपल्याला शरण आलो आहे. ” याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली. म्हणून, सात्त्विक अभिमानही उपयोगी नाही. एकवेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो; पण सात्त्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel