प्रारब्धानुसार देहाची गति । तेथें न गुंतवावी आपली वृत्ति ॥ प्रारब्धाने देहाची स्थिति । आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥ देह प्रारब्धानें जातो । सुखदुःख भोगवितो ॥ जें जें काहीं केलें । तें तें फळाला आलें । म्हणून देहाची गति । ते पालटणें नाहीं कोणाचे हातीं ॥ पांडव परमात्म्याचे सखे झाले । तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥ सुदामा भगवंताचा भक्त झाला । पण दारिद्र्यांतच राहिला ॥ म्हणून देह प्रारब्धावर टाकावा । जें होईल तो आनंद मानावा ॥ जैसें दुःख येते प्रारब्धयोगें । सुख आहे त्याचे मागें ॥ दोहोंची न धरावी चाड । नामाची ठेवावी आवड ॥ चित्त ठेवावें भगवंतापायीं । प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं ॥ देहाचे भोग देहाचे माथां । कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥ प्रारब्धानें आलेलें कर्म करीत जावें । त्याचें फळ भगवंताकडे सोपवावें ॥ साधुसंत देवादिक । हे प्रारब्धांतून नाहीं सुटले देख ॥ जीवनांतील आघात प्रारब्धाचे अधीन । समाधान नसावें त्याचेवर अवलंबून । त्यांत रामाचें स्मरण देईल समाधान ॥ दुष्टाची संगति प्रारब्धानें जरी आली । तरी रामकृपेखालीं दूर गेली ॥
मुखीं असावें एक नाम । याहून दुजें पुण्य नसे जाण ॥ नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य । हा निश्चय ठेवावा मनांत । मन होईल निभ्रांत ॥ कर्तव्यीं असावें तत्पर । मुखीं नाम निरंतर ॥ नामाचें प्रेम करावें जतन । जैसा कृपण राखी धन । कारण नामच आपल्याला तारण ॥ मुखीं रामाचें नाम । बाह्य प्रपंचाचें काम । ऐसा राम जोडा मनीं । दुःखाचा लेश न आणावा मनीं ॥ आजवर राहिला वासनेचा आधार । आतां नामावर प्रेम ठेवा पुरेपूर ॥ असती पुण्याच्या गांठी । तरच नाम येईल कंठीं ॥ रामाचें नांव ज्याला न होईल सहन । त्याची गति नाहीं उत्तम जाण ॥ निर्हेतुक घ्यावें नाम । जेणें जोडेल आत्माराम ॥ नामाविण जें जें साधन । तें तें कष्टास मात्र कारण ॥ देह जरी नाशिवंत । सांगितलेंलें नाम आहे सत्य । बुद्धि करावीं स्थिर । नामीं असावें प्रेम अनिवार ॥ नामांत कसलेही विचार आले । तरी ते नामानें दूर सारावे भले ॥ नामस्मरणीं निदिध्यास । स्थूलाची न करावी आस ॥ अखंड राखावें समाधान । हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥ जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें । बाकी कितीजण आले गेले । मनावर त्याचा होऊं न द्यावा परिणाम ॥ परमार्थाला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel