समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की, ‘ आनंद म्हणजे काय? ’ तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की, ‘ हे पाहा, इथे आनंद आहे ! ’ इतकेच नव्हे, तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजराची पिले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणारे स्त्री-पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता, यांच्याकडे बोट दाखवून, ‘ इथे आनंद आहे ’ असे तुम्ही सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे. ‘ आनंदी वस्तू ’ कोणत्या आहेत, असा माझा प्रश्न नसून ‘ आनंद ’ मला दाखवा असे मी विचारले होते. आनंदी वस्तूमध्ये आनंद राहातो, म्हणून वस्तू हा काही ‘ आनंद ’ नव्हे. लहान मूल हेच जार आनंद असेल तर मोठे स्त्री-पुरुष आणि मांजरीची पिले आनंदयुक्त असणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे; कारण सर्व ठिकाणी आढळणार्‍या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. आपण जो जो माणूस पाहातो, तो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये ‘ मनुष्यपणा ’ आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो, आणि त्याचे अस्तित्व ‘ मनुष्य ’ या शब्दाने सांगता येते. ‘ मनुष्यपणा ’ हा शब्द आहे, हे नाव आहे; म्हणून रुपाला अस्तित्व नामामुळेच आहे. प्रत्येक वस्तूचे बाह्य रुप तिच्या नामामुळे टिकते.
आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहाणारा ‘ आनंद ’ एकच असतो. म्हणजे एकच नव्हे, तर अनेक रुपे आली आणि गेली, तरी ‘ नाम ’ आपले शिल्लक राहाते. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री-पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले, तरी ‘ मनुष्यपणा ’ आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की, चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण ‘ चांगलेपणा ’ कायम आहे; सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण ‘ सौंदर्य ’ कायम आहे; आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या, पण ‘ आनंद ’ कायम आहे; लाखो जीव आले आणि गेले, पण ‘ जीवन ’ कायम आहे. रुपे अनेक असली तरी नाम एकच असते. म्हणजे नाम हे अनेकांत एकत्वाने राहणारे असते. याचा अर्थ असा की, नाम हे रुपापेक्षा व्यापक असते. रुप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रुपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश-काल निमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे, आणि पुढेही तसेच राहील. नाम हे सतस्वरुप आहे. नामातून अनेक रुपे उत्पन्न होतात, आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरुपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel