बाळा जो जो रे । झोप घेई आता ! माझ्या सोनुल्या गोष्ट मी सार्‍या ।

कथिल्या तुला, जो.॥१॥

झोपला राघु । झोपली मैना । झोप घेई रे । माझ्या नंदना जो. ॥२॥

झोपले इवले । पानांचे बाळ । नको वाजवू । तुझ हा चाळ, जो. ॥३॥

वारा गातो बघ । तुजला अंगाई । म्हणतो हळूच । करी गाई गाई, जो. ॥४॥

इवलासा हत्ती झोपला कसा । आणिक डोळे । मिटतो ससा , जो ॥५॥

खेळणी तुझी । सारी झोपली । निद्रेच्या राज्या । दंग जाहली, जो.॥६॥

चांदोमामा बघ । वर झोपला । स्वप्न पाळणा हळू हलला , जो. ॥७॥

कितीक पर्‍या । नेतील तुला । दावतील त्या सुख सोहळा , जो.॥८॥

गातिल आणि सुरेख गाणी । बाळा हा माझ्या । घेई ऎकुनी, जो.॥९॥

झोपली धरणी । निळ आकाश माझ्या सोनुल्या । निज तू शांत, जो.॥१०॥

झोपले बाळ । मिटे पापणी । ठेव सुखी देवा । हीच विनवणी, जो.॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel