बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ॥

निद्रा करिं बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥बाळा॥धृ०॥

जन्मुनि मथुरेंत यदुकुळीं । आलासी वनमाळी ॥

पाळणा लांबविला गोकुळीं । धन्य केले गौळी ॥बाळा जो०॥

बंदीशाळेंत अवतरुनी । द्वारें मोकलुनी ॥

जनकशृखंला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥बाळा जो०॥

मार्गीं नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ॥

शेष धांवला तत्क्षणा । उंचावूनी फणा ॥बाळा जो०॥

रत्‍नजडित पालख । झळके अमोलिक ॥

वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥बाळा जो०॥

हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ॥

पुष्पें वर्षींलीं सुरवरीं । गर्जति जयजयकारीं ॥बाळा जो०॥

विश्वव्यापका यदुराया । निद्रा करिं बा सखया ॥

तुजवरी कुरवंडी करुनियां । सांडिन मी निज काया ॥बाळा॥

गर्ग येऊनि सत्वर । सांगे जन्मांतर ॥

कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार॥बाळा जो०॥

विश्वव्यापी हा बाळक । दुष्‍ट दैत्यांतक ॥

प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥बाळा जो०॥

वीष पाजाया पूतना । येतां घेईल प्राणा ॥

शकटासुरसी उताणा । पाडिल लाथें जाणा ॥बाळा जो०॥

उखळा बांधतां मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ॥

यमलार्जुनाचें उद्धरण । दावानळप्राशन॥बाळा जो०॥

गोधन राखितां अवलीळा । काळीया मर्दीला ॥

दावानळ वन्ही प्राशीला । दैत्यध्वंस केला ॥बाळा जो०॥

इंद्र कोपतां धांवून । उपटी गोवर्धन ॥

गाई गोपाळां रक्षून । केलें वनभोजन ॥बाळा जो०॥

कालिंदीतीरीं जगदीश । व्रजवनितांशीं रास ॥

खेळुनि मारील कंसास । मुष्‍टिक भूमीवर ॥

पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदीं स्थिर ॥बाळा जो०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to पाळणे