वरखाली पाहूं किती तुजला ? माझा पिकला ऊर ।
हाड फासुळ्याचा चुना सजणा रघत साहिना उर ॥धृ०॥
सख्या मशिं बोला, काल गेला होता रात्रीं कुठें ? ।
विषय प्रीत झाली मजला, कपाळावरी घर्म सुटे ।
आतां कां हो कण्हतां ? हळूच म्हणतां, कशी पडली तूट ।
आसी करनी करी घाटशिखरीं जाउं पाहातां दुर ॥१॥
याच्या काळजीनें शिरा हिरव्या पिवळ्या झाल्या माझ्या ।
आता जवळ बसते लाजिरवाणी गोडींत काहीं तरी माझ्या ।
थोराघरचं केनं पदरीं पडल आशा कीर्ती तुझ्या ।
माझी लाज आबरू ठेवा, नका ठेवूं, तुमच्या चरणीं शिर ॥२॥
सख्या तरफडते, बरबडते, माझ्या ज्वानीचा पीळ ।
रती मास गुज खिळल रोग, फुटल मुरमाची खिळ ।
सूक्ष्म होऊन निजून राहाल जगीं नासली नीळ ।
सत्यवचनाची सगुणसाची दृष्ट द्या दूरवर ॥३॥
लिंबलोण उतरी सुगर सुकरीं सखा पोटाशीं धरी ।
प्रेमें मोहो आला, आनंद झाला, दिला शालू जरी ।
मुख कुरवाळून सखा ओवाळून नेला सेजेवरी ।
खुण हीच शाईरी कृपा असावी सगनभाऊवर ।४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel