'मनातले जीवन...' च्या यशानंतर 'नागमणी एक रहस्य' हे माझे द्वितीय पुस्तक वाचकांच्या हाती देताना फार आनंद होत आहे. पहिल्या पुस्तकाच्या वितरणासंबंधीच्या बऱ्या-वाईट अनुभवानंतर पुन्हा त्याच पारंपारिक पद्धतीने हे पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे माझे पुढील पुस्तक सहजरीत्या अधिकाधीक वाचकांपर्यंत पोहोचविण्याकरीता शक्यतो विनामुल्य, ई-पुस्तक स्वरुपात प्रकाशित करायचे हे मनोमन ठरवले होते.
    
ह्या पुस्तकाच्या कामात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मला ज्यांचे सहाय्य लाभले त्या सर्वांचा मी ऋणी आहे. लेखक श्री. अभिषेक ठमके व कु. पंकज कुंभार यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार केले आहे तसेच श्री. बाळासाहेब गुंजाळ सरांनी प्रुफ रिडींग, सौ. सई विचारे यांनी अल्पदरात ते टंकलिखित करून दिले. त्याचप्रमाणे कवी श्री. मनीष पांचाळ व रंगकर्मी श्री. सुहास कामात यांचा अभिप्राय... वजा मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल मी या सर्वांचे विशेष आभार मानतो.

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे. त्याचप्रमाणे ती आपल्यालाही पसंतीस उतरेल अशी आशा करून इथेच आपले मनोगत थांबवतो.

आपलाच,
प्रसाद शिर्के
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel