रात्रीचे दहा वाजले होते. घरातील टेलिफोनची रिंग वाजू लागली. संदीपने फोन उचलला. दोन मिनिटे फोनवर बोलून, त्याने फोन ठेवला. त्याने लगेच शैलाला हाक मारली. ती आतल्या खोलीत रियाला जेवण भरवत होती. संदिपने तिला दरवाजा लावून घेण्यास सांगितले आणि तो, तिला काहीही न सांगताच घराबाहेर निघून गेला. त्यावेळी वसंतराव घरी नव्हते. त्यांना सुद्धा घराबाहेर जाऊन, बराच वेळ झाला होता. लताच्या मृत्युनंतर आज वसंतराव पहिल्यांदाच घराबाहेर गेले होते. त्यामुळे ते नेमके कुठे गेले असतील या गोष्टीचा विचार शैला करू लागली.

काही वेळाने वसंतराव घरी आले. संदीप घरी नाही या गोष्टीची जाणीव होताच त्यांनी शैलाकडे त्याची विचारपूस केली. तेव्हा “दहा मिनिटांत येतो.” असे सांगून संदीप घराबाहेर कुठेतरी गेल्याचे तिने सांगितले. शैलाचे बोलणे ऐकून वसंतला प्रकाशची आठवण झाली. त्या दिवशी सुद्धा प्रकाश असाच, काहीही न सांगता रात्री घराबाहेर पडला होता. शैलाने वसंतला जेवायला वाढू का? म्हणून विचारले. त्यावर नेहमीप्रमाणे, “नाही, नको. माझी इच्छा नाही, मला भूक नाहीये.” असे उत्तर वसंतकडून मिळेल असा तिचा अंदाज होता. पण त्यादिवशी वसंतने ‘हो’ म्हणून उत्तर दिले होते. वसंतचे वागणे आज नक्कीच बदलले आहे हे शैलाच्या लक्षात आले होते. तिने वसंतला जेवायला वाढले. त्यादिवशी वसंत पोटभर जेवला होता आणि लगेचच झोपूनही गेला होता. त्याच्या अशा वागण्याचे शैलाला आश्चर्य वाटले होते.

संदीप अजूनही घरी आला नव्हता. त्यामुळे चिंतीत असलेल्या शैलाच्या मनात नको ते विचार येऊ लागले. तिने घाबरून वसंतरावांना हाक मारली. आत्तापर्यंत ते गाढ झोपी गेले होते. तीन-चार वेळा हाक मारल्यानंतर त्यांना कुठे जाग आली. उठताच क्षणी ते, “काय... फालतू...गिरी... आहे...” असे तुटक तुटक बोलू लागले. शेवटी शैलाचा त्यांच्यावरील संशय खरा ठरला. त्या दिवशी त्यांनी भरपूर दारू घेतली होती. त्यामुळेच त्यांचे वागणे आज थोडे विचित्र वाटत होते. तरीही शैलाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, संदीप अजूनही घरी न आल्याचे वसंतला सांगितले. शैलाचे बोलणे ऐकून वसंतराव थोडे भानावर आले होते. त्यांनी घड्याळाकडे बघितले, रात्रीचे बारा वाजले होते. संदीप न जेवताच घराबाहेर पडला होता, त्यामुळे त्याची वाट बघत असलेली शैलाही अजून जेवलेली नव्हती हे तिच्या बोलण्यातून वसंतरावांच्या लक्षात आले होते.

संदीपला बाहेर जाऊन बराच वेळ झाला होता. त्यामुळे वसंतला आता त्याची चिंता वाटू लागली होती. त्याला शोधण्यासाठी बाहेर जातो असे शैलाला सांगून तो घराबाहेर पडला. त्याच्या घराजवळील व्हरांड्यात तो चप्पल घालत उभा होता. तितक्यात कोणीतरी जिने चढून वर येत असल्याची, त्याला चाहूल लागली. माणसांच्या पावलांचे आवाज त्याला ऐकू येत होते. त्यामुळे कोण येत आहे? हे पाहण्यासाठी तो तिथेच थांबला. तितक्यात खालचा जिना चढून वर आलेल्या दोन व्यक्ती त्याच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे त्यांचा भाऊ संदीप आणि दुसरी व्यक्ती म्हणजे त्यांचा आठ दिवसांपासून बेपत्ता असलेला मुलगा... ‘प्रकाश’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel