त्या दिवशी त्याने बनवलेल्या यादीनुसार त्याला एका मंत्र्याचा जीव घेऊन त्याला नागलोकी धनंजयकडे पोहोचवायचे होते. ज्यावेळी प्रकाश त्याच्या निवासस्थानी पोहोचला तेव्हा त्याला तो मंत्री काही दिवसांपासून आजारी असून अंथरुणाला खिळल्याचे समजले. त्याच्या सेवेसाठी चोवीस तास एक डॉक्टर व दोन परिचारिका तिथेच राहतील अशाप्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. तो आजाराने इतका ग्रस्त झाला होता की, त्याच्या शरीरात आत हालचाल करण्याचेही त्राण उरले नव्हते. तसेही त्याने वयाची जवळपास सत्तरी गाठली होती. पण भ्रष्ट राजकारण अजूनही त्याच्या रक्तात तसेच शिल्लक होते. आजवर त्याने आपल्या पद, प्रतिष्ठेचा गैरवापर करून कित्येकांवर अन्याय अत्याचार करून त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेऊन स्वतःसाठी अब्जावधीची मालमत्ता गोळा केली होती. त्यामुळे आज प्रकाशच्या हातून त्याचा मृत्यू होणे निश्चित होते. पण त्या दिवशी त्याच्या आजूबाजूला बरीच माणसे असताना त्याला तेथुन घेऊन जाणे सोपे काम नव्हते. म्हणून प्रकाशने तेथील सर्व माणसांना आपल्या स्तंभन शक्तीने स्तंभित करून मंत्र्याला तेथुन घेऊन जाण्याचा विचार केला. पण तितक्यात आपला चेहरा झाकलेल्या दोन व्यक्ती आपल्यासोबत बंदुकी घेऊन मंत्री असलेल्या रुममध्ये शिरले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून तेथील डॉक्टर्स, परिचारिका आणि मंत्र्याच्या कुटुंबियांना तेथुन बाहेर जाण्यास सांगितले. प्रकाश मंत्र्याच्या घरात अदृश्य होऊन वावरत असल्यामुळे त्याची तेथील उपस्तिथी कोणालाही जाणवणारी नव्हती. तो शांतपणे हा सर्व प्रकार बघत होता. आणि तसाही तो सुद्धा त्या मंत्र्याला मृत्यूदंड देण्यासाठीच तिथे आला होता.

क्षणार्धात त्यांच्यापैकी एका व्यक्तीने त्या रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि दुसऱ्याने मंत्र्याच्या कपाळावर बंदूक ठेवली, "तू आत्तापर्यंत आमच्यासारख्या कित्येक सामान्य माणसांवर अत्याचार केलेले आहेस. पण आता तुझे दिवस भरले आहेत. त्यामुळे यापुढे तू कोणावरही अन्याय, अत्याचार करू शकणार नाहीस. आत्तापर्यंत आमच्या हाती तुझ्याविरुद्ध बरेच पुरावे लागले आहेत, त्यामुळे आम्ही तुला आता जरी मारले तरी तू एक नीच व्यक्ती होतास हे आम्हाला अगदी सहज सिद्ध करता येईल. पण तरीही आम्ही तुला एक शेवटची संधी देऊ इच्छितो. तेव्हा आता तरी आपले सर्व गुन्हे कबुल कर."

इतके बोलून त्या व्यक्तीने आपल्या चेहऱ्यावरील कपडा हटवला, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती एक स्त्री होती. प्रकाशने एक क्षण तिच्या डोळ्यात पहिले आणि तिचा भूतकाळ जाणून घेतला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel