प्रकाशची वाट बघून कंटाळलेला विक्षर शाळेतून एकटाच घरी येत होता. प्रकाशने त्याला ह्या जगातील रहस्यमयी गोष्टी सांगितल्यापासून त्याच्या मनात आपल्या पित्यासारख्या शक्ती प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाली होती. परंतु अशा अद्भूत शक्ती आपल्याला कशाप्रकारे प्राप्त करता येतील? ह्या गोष्टीचे त्याच्याकडे ज्ञान नव्हते. तो प्रकाशला घाबरत असल्यामुळे तो ह्या विषयी प्रकाशशी बोलू शकत नव्हता. आपल्यालाही आपल्या पित्यासारख्या शक्ती मिळाल्या तर किती मजा येईल? याच गोष्टीचा तो विचार करत असताना, अचानक भद्र त्याच्यासमोर आला. त्याला समोर पाहून विक्षर थोडासा भयभीत झाला होता. परंतु आज त्याने सर्वसामान्य माणसांप्रमाणे व्यवस्थित पोशाख परिधान केला होता. त्यामुळे आज तो तितकासा विचित्र दिसत नव्हता.

"मला पाहून घाबरू नकोस बाळ, तू समजतोस तितका वाईट नाही मी." भद्र अत्यंत नम्रतेने म्हणाला.

"मला तुमचे काहीही ऐकायचे नाही. मला माझ्या घरी जाऊ दे. नाहीतर मी आरडाओरड करेन." विक्षर रागाने म्हणाला.

"नको, तुला असे काहीही करण्याची गरज नाही. फक्त एकदाच मी काय सांगतो ते ऐक, मग मी इथून निघून जाईन." (भद्र)

"मला तुमचे काहीही ऐकायचे नाही." तो पुन्हा चिडून म्हणाला.

"बरं, ठीक आहे. मग निदान माझ्या एका प्रश्नाचे उत्तर तरी दे. तू कोण आहेस? तुझा पिता कोण आहे? तुला माहिती आहे का?" (भद्र)

"हो, माझे पिता एक अशी शक्ती आहे की, ज्याचा सामना तू कधीही करू शकत नाहीस, पण मी कोण आहे हे मला अजूनही ठाऊक नाही कदाचित मी देखील त्यांच्यासारखाच असू शकतो." विक्षरने उत्तर दिले.

"अगदी बरोबर, तुझे पिता खूप सामर्थ्यवान आहेत, अगदी तुझ्यासारखेच." भद्र उद्गारला. "काय? म्हणजे मी देखील त्यांच्या इतकाच सामर्थ्यवान आहे? नाही... हे सत्य असू शकत नाही. निदान मला तरी तसे काही वाटत नाही आणि आजवर मला तसा काही अनुभवही आलेला नाही." विक्षर उत्सुकतेने म्हणाला.

"येणारही नाही... तुझ्या पित्याला तसे होऊ द्यायचे नाही. कारण त्याला स्वतःलाच सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवायची आहेत." (भद्र)

"हे तुम्ही काय बोलत आहात? मी आता तुमचे काहीही ऐकून घेणार नाही." विक्षर रागाने म्हणाला. आपल्या पित्याबद्दल असे काहीही ऐकून घेण्यास तो तयार नव्हता.

"बरं, ठीक आहे. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर हरकत नाही. पण मला फक्त एक गोष्ट सांग, त्या दिवशी तू तुझ्या घरापासून त्या स्मशानापर्यंत कसा काय पोहोचलास?" त्याने विक्षरला प्रश्न केला.

"ते मला देखील माहित नाही." (विक्षर)

"हम्म, त्याचे उत्तर मी सांगतो. तुला तिथे प्रकाशच घेऊन आला होता. त्याने त्या दिवशी सुद्धा तुझ्यावर आपल्या शक्तीचा प्रयोग करून तुला भ्रमित केले असणार." (भद्र)

"त्या दिवशी पण... म्हणजे काय?" (विक्षर)

म्हणजे तो आजवर तुला भ्रमितच करत आला आहे. ज्या दिवशी तुला तुझी ओळख पटेल तो दिवस तुझा शेवटचा दिवस असेल." तितक्यात प्रकाश तिथे आला, त्याला बघतच भद्रने तेथुन पळ काढला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel