विक्षरला संदीपच्या घरी आलेल्या अनुभवानंतर त्याचा प्रकाशकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला होता. काही दिवसापूर्वी रात्री स्मशानात घडलेला प्रकार त्यानंतर तांत्रिक भद्रची आणि त्याची भेट आणि त्यानंतर त्याला प्रकाशचा आलेला हा आश्चर्यकारक अनुभव. या सर्व गोष्टींचा तो सतत आपल्या मनात विचार करू लागला होता. त्यामुळे हल्ली त्याचे त्याच्या वयातील इतर मुलांप्रमाणे खेळण्या बागडण्यात मन न रमता दुसऱ्याच कुठल्यातरी विचारांमध्ये अडकून पडले होते. अचानकपणे त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक अशा विचित्र घटना घडल्याने त्याचे असे वागणे स्वाभाविकच होते. भद्रने प्रकाशचे रूप धारण करून त्याला सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याच्या ज्ञानात बरीच भर पडली होती. तरी त्याला यातच समाधान मानायचे नव्ह्ते. आत आत्याचं मनात आपल्या पित्यासारख्या दिव्य शक्ती असलेल्या इतर जीवांबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा झाली होती. त्याच्या मनातील हीच इच्छा त्याला आता स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून हल्ली तो प्रकाशला अधून-मधून या गुढ गोष्टींविषयी विविध प्रश्न विचारून आपल्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न करू लागला होता. प्रकाशलाही विक्षरच्या वागण्यातील झालेला हा बदल आता जाणवू लागला होता. त्यामुळे तो चतुराईने त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु विक्षर काही माघार घेणाऱ्यातला नव्हता. तो त्याच्या मनाचे समाधान होत नाही, तोपर्यंत प्रकाशला विविध प्रश्न विचारून हैराण करू लागला. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन कंटाळलेला प्रकाश, विक्षरच्या अशा वागण्याने काही अंशी चिंतीत झाला होता. काहीही झाले तरी तो विक्षरवर आपल्या शक्तींचा वापर करणार नव्हता. म्हणून विक्षरच्या मनातून ह्या सर्व गोष्टींना हद्दपार कसे करावे ही त्याच्या समोरील सर्वात मोठी समस्या होऊन बसली होती. कारण विक्षरचे असे वागणे भविष्यात घडणाऱ्या कुठल्या घटनांचे संकेत देत होते, हे प्रकाशला चांगलेच ठाऊक होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.