एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
       या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
      " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.
       सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
        जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.
       या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
       भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
       एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.
       चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
       पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
       हे पाहून भीम चक्रावून गेला.
      नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.
       जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.
       पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
      खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.
      तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.
      हे पाहून नकूल गोंधळून गेला.
      सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
      ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
      यावेळी सहदेवही चकीत झाला.
      या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
      श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
     "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
      कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
      श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
      कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
       कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

      
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel