शनिवार वाडा

शनिवार वाडा (बोली मराठीत शनवारवाडा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.

शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.

इमारत

शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे[ संदर्भ हवा ]. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.

दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.

एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो."

सांगलीचे कवी साधुदास यांनी केलेले शनिवारवाड्याचे वर्णन

शनिवारवाड्याचे वर्णन सांगलीचे प्रसिद्ध कवि साधुदास यांनी आपल्या ‘पौर्णिमा’ नामक कादंबरीत केले आहे. त्यावरून वाड्याचे समग्र चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. "सभोवार एक प्रचंड तट राखून वाड्याचे बांधकाम केले होते. वाड्याकरिता आणि भोवतालच्या बागेकरिता मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पाच दरवाजे होते. उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी (अल्लीबहाद्दराचा) दरवाजा, दक्षिणेकडे आग्नेय व नैर्ऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नावांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे.

"दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरूज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई. नैर्ऋत्येकडील चौकास मोतीचौक असे म्हणत. त्या चौकाला बाईंचा (गोपिकाबाई) चौक असेही म्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून त्याला हौदाचा चौक म्हणत.

"या मोठया चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यात आली होती. कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले होते.

"वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. त्त्यात सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे सर्व पाकळ्यांत मिळून दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावर पक्षी, फळे, वेलबुट्टी वगैरे चित्रे कोरलेली होती.. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपती महालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होते. त्यांत रामायण-महाभारतातील अनेक कथांची चित्रे होती. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हे चित्रकाम तयार करून घेण्यात आले होते. यावरून हा वाडा सजविण्यासाठी किती पैसा खर्च करण्यांत आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा."

खजिना

पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी लुटून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to महाराष्ट्राचे मानबिंदू